Thursday, April 24, 2025
Homeमहत्वाची बातमीनगरमध्ये ११ कोरोना रुग्णांचा होरपळून मृत्यू

नगरमध्ये ११ कोरोना रुग्णांचा होरपळून मृत्यू

जिल्हा रुग्णालयाला आग

अहमदनगर (वार्ताहर) : राज्यभरात सर्वत्र दिवाळीचा सण साजरा होत असताना, अहमदनगरमध्ये शनिवारी अतिशय मोठी दुर्घटना घडली. येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसीयू कोरोना कक्षाला शनिवारी सकाळी दहाच्या सुमारास आग लागली. या आगीत होरपळून ११ जणांचा मृत्यू झाला. मृत्यूमुखी पडलेले सर्वजण ५० ते ८५ वयोगटातील आहेत. या विभागात एकूण १७ रुग्ण उपचार घेत होते. ही आग शॉर्टसर्किटने लागल्याचा अंदाज व्यक्त होत आहे.

जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिलेल्या माहितीनुसार, अतिदक्षता विभागात १७ रुग्ण उपचार घेत होते. या विभागातील एसीमधून धूर येण्यास सुरुवात झाली. त्यानंतर आगीने उग्र रूप धारण केले.

बचावकार्यादरम्यान विभागातला ऑक्सिजन पुरवठा बंद करण्यात आला. त्यामुळे तसेच आगीमुळेही गुदमरून काही जणांचा मृत्यू झाला असावा असा प्राथमिक अंदाज आहे.

आगीत मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाखांच्या मदतीची घोषणा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केली आहे.

तर, नाशिक येथे झालेल्या गॅस गळतीच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर अहमदनगर जिल्हा रुग्णालयाचे फायर ऑडिट करण्यात आले होते. मात्र तरीही दुर्दैवी घटना घडली आहे. याबाबतची चौकशी करण्यासाठी मुख्य अग्निशमन अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे, अशी माहिती डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिली.

दरम्यान, अहमदनगर जिल्हा रुग्णालयात लागलेल्या आगीत लोकांच्या मृत्यूची बातमी अत्यंत दु:खद आहे. मी शोकाकुल कुटुंबांप्रति संवेदना व्यक्त करतो तसेच दुर्घटनेत जखमी झालेल्या लोकांसाठी लवकरात लवकर बरे होण्याची कामना करतो, असे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी म्हटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील मृतांबद्दल शोकसंवेदना व्यक्त केली आहे.

कठोर कारवाई गरजेची

अहमदनगर येथे जिल्हा रुग्णालयाच्या आयसीयू कक्षात लागलेल्या भीषण आगीची घटना अतिशय धक्कादायक आणि मनाला व्यथित करणारी आहे. या घटनेत मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांसोबत माझ्या शोकसंवेदना आहेत. त्यांच्या दु:खात मी सहभागी आहे. जखमींना लवकर बरे वाटावे, अशी मी प्रार्थना करतो, अशा शब्दांमध्ये फडणवीस यांनी या घटनेवर दुःख व्यक्त केले आहे.

या घटनेची सखोल चौकशी करण्यात यावी आणि दोषींविरुद्ध कठोरातील कठोर कारवाई करण्यात यावी, अशी आमची मागणी आहे, असे देखील फडणवीस यांनी म्हटले आहे.

आरोग्य मंत्र्यांची हकालपट्टी करा

भंडारा, विरार, कोल्हापूरच्या घटनेनंतरही सरकारला जाग आली नाही. नगरच्या सिव्हिल हॅास्पिटलच्या आगीत १० रुग्णांचा होरपळून मृत्यू झाला. फायर ॲाडिट केले आहे का? यावर श्वेतपत्रिका जारी करा. राज्यात रुग्णालये मृत्यूचे सापळे बनत आहेत. आरोग्यमंत्र्यांच्या कामाचेच ॲाडिट करून हकालपट्टी करा, असे भाजपच्या उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी म्हटले आहे.

सखोल चौकशीचे आदेश

आगीची घटना कळताच मुख्यमंत्र्यांनी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्याशी तसेच मुख्य सचिव यांच्याशी बोलून, तातडीने उपाचारधीन रुग्णांना उपचार मिळण्यात काही अडचणी येणार नाही ते पाहण्यास सांगितले. तसेच, जिल्हाधिकाऱ्यांनी या दुर्घटनेची सखोल चौकशी करून अहवाल सादर करावा असे निर्देश दिले आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -