कोरोना महामारीच्या भीषण संकटामुळे संपूर्ण जग थिजून गेले होते. कोरोनाचा फैलाव मोठ्या प्रमाणात होऊ नये म्हणून वाहतूक व्यवस्था बंद ठेवण्यात आल्याने सारेच व्यवहार ठप्प झाले होते. तसेच शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडा क्षेत्रातही कमालीची शिथिलता आली होती. सर्वत्र नकारात्मकता पसरली होती. कोरोना अदृश्य व जीवघेणा व अनेक बळी त्याने घेतले असल्याने सर्वत्र त्याची दहशत पसरली होती. अशा कोरोनाशी दोन हात करणे किंवा त्याला रोखणे हे पहिले उद्दिष्ट असल्याने त्याचा संसर्ग होऊ नये याची दक्षता घेण्याला अग्रक्रम होता. त्यामुळेच अनेक ठिकाणी वेगवेगळे निर्बंध लागू करण्यात आल्याने सारे काही थिजून गेले. रोजी – रोटीसह उद्योग – व्यवसाय बंद झाल्याने जगण्याचा मोठा प्रश्न सर्वांपुढे निर्माण झाला होता. आपण सर्व बेसावध असताना मार्च – एप्रिल २०२० मध्ये कोरोनाची पहिली लाट आली होती. त्यानंतर डिसेंबर – जानेवारी २०२१च्या सुमारास ही लाट ओसरू लागली आहे, असे समजून लोकांनी बिनधास्तपणे आपापले व्यवहार, पर्यटन, विवाह सोहळ्यांसारखे कार्यक्रम बिनबोभाट सुरू केल्याने अचानक कोरोनाची दुसरी लाट अवतरली आणि अनेकांना त्याचा फटका बसला. या दुसऱ्या लाटेने अनेक तरुणांचा बळी घेतल्याने त्याची दाहकता वाढली होती व पुन्हा सर्व व्यवहारांवर निर्बंध आणले गेले. त्यातच संशोधकांनी काेरोनावरील लस शोधून काढल्या आणि कोरोनाला रोखता येणे शक्य आहे, यावर शिक्कामोर्तब झाले.
लसीकरण आणि लोकांकडून कोरोना नियमांचे यथायोग्य पालन करण्यात आल्याने हळूहळू कोरोना आटोक्यात येऊ लागला आणि एक एक करून व्यवहारही सुरळीत होऊ लागले. राज्यात कोरोना नियंत्रणात आल्याने निर्बंध शिथिल केले गेले आहेत. बस, रिक्षा, टॅक्सी आदी सार्वजनिक खासगी वाहतूक व्यवस्था निर्बंधांसह सुरू झाल्या. नंतर रेल्वेची लोकल वाहतूक प्रथम अत्यावश्यक सेवांसाठी आणि नंतर लसीकरण झालेल्यांसाठी सुरू झाली आहे. नंतर दुकाने, बाजारपेठा, मॉल्स, शाळा, महाविद्यालये टप्प्याटप्प्याने सुरू झाले असून मंदिरे, थिएटर्स, नाट्यगृहेही उघडू लागली आहेत. कोरोना काळात सांस्कृतिक आणि कला क्षेत्रातील विविध कलाकार आणि रंगमंच कामगारांची आर्थिक परिस्थिती बेताची बनली होती. ही बाब ध्यानी घेऊन गर्दी टाळण्यासाठी शासनाकडून खबरदारी घेतली गेली आणि विविध निर्बंधांसह ५० टक्के क्षमतेने थिएटर्स, नाट्यगृहे सुरू करण्यात आली आहेत. मात्र कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे देशात लॉकडाऊन लागू होता. सुमारे दीड वर्षांपर्यंत कला विभागामार्फत सादर करण्यात येणारे कार्यक्रम स्थगित होते. परिणामी संघटित आणि असंघटित कला प्रकारातील विविध कलाकारांना उत्पन्नापासून वंचित राहावे लागले होते. आता परिस्थितीत फार मोठा बदल झाल्याने आणि तिसरी लाट येण्याची शक्यता मावळल्याने पुन्हा विविध थेत्रांत उत्साह दिसू लागला आहे. सध्या सर्वांचाच आवडता दिवाळी सण धुमधडाक्यात साजरा होताना दिसत आहे. दिवाळीनिमत्त मुंबई, ठाणे, कल्याण, पालघर, पुणे, नाशिक, नागपूर अशा प्रमुख शहरांतील महत्त्वाच्या बाजारापेठांमध्ये लोकांनी खरेदीसाठी प्रचंड गर्दी केली होती. मुंबईतील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या दादर मार्केट आणि प्लाझा शॉपिंग, लालबाग, परळ, भांडुप, मुलुंड अशा अनेक ठकाणी दिवाळी खरेदीसाठी तुफान गर्दी झाली होती व अद्याप गर्दी होत आहे.
दिवाळीच्या दिवसांत शासनाने विशेष काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. दिवाळीनंतर कोरोना रुग्णांची संख्या वाढण्याचे संकेत देण्यात आले आहेत. मात्र दिवाळीच्या खरेदीसाठी बाहेर पडलेल्या मुंबई, ठाणे, पुणेकरांची गर्दी पाहिली असता कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला आमंत्रण मिळणार असे दिसत आहे. कारण कोरोना निर्बंध बऱ्याच प्रमाणात शिथिल झाल्यानंतर व कोरोना निर्बंध शिथिल झाल्यानंतर साजरी होणारी पहिली दिवाळी असल्याने खरेदीचा आनंद लुटताना नियमांचे पालन करण्याचे आवाहन वारंवार करण्यात आले असले तरी अनेकजण सगळे नियम धाब्यावर बसवून खरेदीचा आनंद घेताना दिसत आहेत. तसेच आता शाळा, महाविद्यालये, मंदिरे, नाट्यगृह, सिनेमागृह, लोकल वाहतूक अशा सर्वच बाबी पूर्वपदावर येत असताना सर्वांनी आणखी काही दिवस तरी सावधगिरी बाळगलीच पाहिजे व कोरोना निर्बंधांचे पालन हे केलेच पाहिजे. कारण आता पुन्हा कोरोनाची लाट आल्यास त्याचे फार मोठे विपरित व गंभीर परिणाम सर्वांनाच भोगावे लागतील. तसे झाल्यास त्यातून सावरणे सर्वांनाच कठीण जाईल ही गोष्ट लक्षात ठेवायला हवी.
कोरोनाची जनी असलेल्या चीनमध्ये पुन्हा काेरोनाचा उद्रेक झाल्याचे वृत्त आहे. तसेच रशिया, बेल्जियम, इजिप्त अशा काही देशांमध्वे काेरोनाचा प्रदुर्भाव पुन्हा वाढू लागल्याच्या बातम्या येत असून त्या पाहताच पुन्हा धडकी भरते. आता पुन्हा कोरोना नको रे बाबा, असेच सर्वांनी म्हटले पाहिजे आणि निर्बंधांचे पालन करून कोरोनाला हद्दपार करण्यासाठी सर्वांनी कंबर कसली पाहिजे. म्हणूनच सध्याचा सर्वात मोठा दिवाळी सण सुरू असून याच सणाचा पाडवा आणि त्यानंतर येणारी भाऊबीज हे दोन्ही साजरे करताना आपण योग्य ती काळजी बाळगलीच पाहिजे. नव्हे ते तर प्रत्येकाचे कर्तव्यच आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. दिवाळी सणानंतर कोरोनाची स्थिती गंभीर बनली नाही आणि सर्व व्यवहार सुरळीत सुरूच राहिले, तर आपण अर्धी लढाई जिंकली आहे असेच म्हणावे लागेल. त्यामुळे आपापल्या तब्येतीची काळजी घेत सर्वांनी कोरोनाला दूर ठेवले तरच सर्व काही पूर्ववत होऊन पुन्हा एकदा जगरहाटी सुरू होईल, याची खात्री बाळगायला हरकत नाही.