Thursday, April 24, 2025
Homeमहत्वाची बातमीदेशमुख यांच्या बेनामी २७ कंपन्यांचा ईडीकडून तपास सुरू

देशमुख यांच्या बेनामी २७ कंपन्यांचा ईडीकडून तपास सुरू

मुंबई (प्रतििनधी) : शंभर कोटींच्या वसुली प्रकरणी ईडीने अटक केलेले माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या निकटवर्तीयांच्या विविध २७ कंपन्या असून वसुलीतील रक्कम हवालामार्फत त्यात वळविल्याचा संशय ईडीच्या अधिकाऱ्यांना आहे. यातील बहुतांश कंपन्यांचा वापर काळा पैसा व्यवहारात आणण्यासाठी केल्याचे गृहीत धरून तपास सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. अनिल देशमुख यांचा २७ कंपन्यांशी थेट संबंध नसला तरी त्यांच्यामुळे या कंपन्यांमध्ये आर्थिक गुंतवणूक झाली आहे. या आर्थिक व्यवहारांची माहिती मिळविण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले. देशमुख यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावाने १३ आणि नातेवाइकांच्या तसेच मित्रांच्या नावे १४ कंपन्या आहेत. मात्र, यातील अनेक कंपन्यांमध्ये काहीही व्यवसाय झालेला नाही. मात्र या कंपन्यांचे अस्तित्व दाखवून काळा पैसा व्यवहारात आणल्याचा ईडीच्या अधिकाऱ्यांना संशय आहे.

ईडीच्या रडारवर असलेल्या काही कंपन्यांमध्ये ‘मेसर्स राबिया लॉजिस्टिक प्रा. लि., मेसर्स ब्लॅक स्टोन लॉजिस्टिक प्रा. लि., मेसर्स काँक्रीट एंटरप्राइज प्रा. लि., मेसर्स नॉटिकल वेअरहाऊसिंग प्रा. लि., मेसर्स पॅराबोला वेअरहाऊसिंग प्रा. लि., मेसर्स बायो-नॅचरल ऑरगॅनिक प्रा. लि., मेसर्स काटोल एनर्जी प्रा. लि., मेसर्स सब्लाइम वेअरहाऊसिंग प्रा, लि., मेसर्स विश्वेश लॉजिस्टिक प्रा. लि., मेसर्स अरोमा एंटरप्राइजेस प्रा. लि., मेसर्स मिन्ट्री प्रीमियर लाइफस्टाइल अँड ब्युटी प्रा. लि., मेसर्स मृगतृष्णा ट्रेडिंग प्रा. लि. आणि ट्रॅव्होटेल्स हॉटेल यांचा समावेश आहे.

ईडीच्या म्हणण्यानुसार मेसर्स रिलायबल फायनान्स कॉर्पोरेशन प्रा. लि., मेसर्स व्हीए रियल कॉन प्रा. लि., मेसर्स उत्सव सिक्युरिटीज प्रा. लि. आणि मेसर्स सीतल लीजिंग अँड फायनान्स प्रा. लि. या चार कंपन्या फक्त कागदावरच अस्तित्वात आहेत. ज्या केवळ व्यवहारांसाठी तयार करण्यात आल्या होत्या. या चार कंपन्यांचे सुरेंद्र कुमार जैन आणि वीरेंद्र जैन हे बनावट संचालक होते.अनिल देशमुख यांचा मुलगा हृषिकेश देशमुख याने काळा पैसा पांढरा करण्याचा मार्ग शोधला आहे. तो अशा एका व्यक्तीच्या शोधात होता जो देणगी किंवा कर्जाच्या स्वरूपात रोख रक्कम ट्रस्टच्या खात्यात जमा करेल. असे सुरेंद्र कुमार जैन आणि वीरेंद्र जैन या दोघांकडे करण्यात आलेल्या चौकशीत समोर आले आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -