स्वाती पेशवे
एका क्लेशदायी वर्षाचा अस्ताकडील प्रवास सुरू झाला असताना सामोऱ्या आलेल्या प्रकाशपर्वाचं पायघड्यांनी स्वागत करायला हवं. मागील दिवाळी तणावग्रस्त अवस्थेत साजरी करताना प्रत्येकाच्या मनात आशेच्या दीपमाळा फुलल्या होत्या. नवीन संवत्सरात तरी कोरोनानामक आगंतुकाचा विळखा सैलावेल आणि जीवनचक्र मुळपदावर येईल, अशी आशा प्रत्येकाच्याच मनात होती, मात्र दिवाळीनंतरच्या पर्वानं तर निराशेचं मळभ अधिकच गहिरं केलं आणि दुसऱ्या लाटेचा विळखा कमालीचा आवळला. तेव्हापासून आतापर्यंतच्या काळानं आपल्याला खूप काही दाखवलं आहे. पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलं आहे. मागच्या अनेक पिढ्यांनी अनुभवला नसेल इतका आर्थिक, भावनिक प्रलय घराघरानं बघितला आणि झेलला आहे. म्हणूनच मनामनांतल्या जखमा भळभळत्या असताना, गमावलेल्या आप्तेष्टांच्या आठवणींचे लोट आटलेले नसताना, हसऱ्या घरांच्या भिंती अचानक आलेल्या मुकेपणाला सरावलेल्या नसताना सामोरं आलेलं हे प्रकाशपर्व नेहमीपेक्षा अधिक संयमानं, शहाणपणानं आणि संवेदनशीलतेनं साजरं करण्याची गरज आहे.
तमाकडून-तेजाकडे नेते ती दिवाळी, राव-रंकांच्या अंगणांमध्ये प्रकाशाची फुलझाडं फुलवते ती दिवाळी, आबाल-वृद्धांच्या आकांक्षांवर तृप्तीची फुंकर घालते ती दिवाळी… हा वर्षभरातला सर्वाधिक बहुप्रतिक्षित सण. वाढत्या स्पर्धेमुळे जगण्यातली व्यस्तता आणि व्याप वाढत असताना क्षणोक्षणी विखुरणारे सुखाचे क्षण गोळा करण्याची ती एक सुवर्णसंधी होती. केवळ फेसबुक, व्हॉट्सअॅपसारख्या समाजमाध्यमांमध्ये अडकणाऱ्या अलीकडच्या समाजाला रू-ब-रू होण्याची संधी दिली, ती अलीकडच्या दीपावलीने. म्हणजेच एकीकडे दिवाळीचं पूर्वीचं साधं पण राजस रूप अलीकडे पालटलेलं दिसलं असलं तरी सणाचं हे बदलतं रूपही कौतुकानं पाहावं आणि आनंदानं अनुभवावं असंच होतं. प्रत्येक दिवाळी दिसा-मासानं मोठ्या होणाऱ्या घरातल्या युवापिढीसाठी अनुभूतीचं एक दालन उघडून जात असते. साजऱ्या केलेल्या प्रत्येक दिवाळीचा एक साज त्याच्या स्मृतींच्या कोंदणात जडत जातो आणि आठवणींचा हा लखलखता हार पुढे बहुमूल्य ठेवा ठरतो. म्हणूनच दरवर्षी दिवाळी साजरी होत असली, तरी प्रत्येक वर्षी तिचे संदर्भ वेगळे असतात. तिच्याशी संबंधित आठवणींचे धागे वेगळे असतात.
दुर्दैवानं यंदाच्या दिवाळीला निराशेची किनार आहे. पाठीला पाठ लावून आलेल्या आपत्तींनी समाजाला इतकं झोडपून काढलं आहे की, ‘महापुरे झाडे जाती, तिथे लव्हाळे वाचती’ असं म्हणण्याचीही सोय राहिलेली नाही, कारण लव्हाळासारखं आयुष्य कंठणाऱ्या अनेक निरागस, निष्पाप, शालीन जीवांनाही या काळाने आपल्या उदरात सामावून घेतलं आहे. कोरोना अन् त्यानंतरच्या जीवघेण्या बुरशीची दहशत, विध्वंसक चक्रीवादळं, जणू परिसराचा घोट घेईल की काय अशी भीती उत्पन्न करणारी अतिवृष्टी अन् या सर्वात मंदावलेलं अर्थचक्र आणि सैरभैर झालेली मनोवस्था… एखाद्या दैत्यानं संपूर्ण सृष्टी वेठीस धरावी आणि हतबलतेनं त्याला शरण जाण्याखेरीज जनलोकांपुढे मार्ग राहू नये, अशी पुराणकथांमधून कानी पडणारी स्थिती गतकाळात आपल्यातल्या प्रत्येकाने अनुभवली. या काळात दहशत, नैराश्य, भीती, अगतिकता, क्षणभंगूरता आदी परिचित शब्दांचा अर्थ खऱ्या अर्थानं समजला. या काळात अकाली झालेली अपरिमीत पानगळ प्रत्येकाच्या मनातल्या जीवनेच्छेला दणदणीत तडाखा देऊन गेली. आता कुठे आपण या सगळ्यातून बाहेर येत आहोत. संहारानंतरच्या दुरवस्थेचं मोजमाप करत आहोत. आठवणींचे अनिवार उमाळे सहन करत नव्याने जगण्याचा प्रयत्न करत आहोत. मनस्थितीपासून आर्थिकघडीपर्यंत सर्वकाही उद्ध्वस्त झालं असताना, त्यातून सावरत जमेल तसं पुढे जाण्याचा प्रयत्न करत आहोत. शेवटी म्हणतात तसं, जग नेहमीच जित्यांचं असतं. त्यानुसार जीव वाचलेला प्रत्येकजण आता जगाकडे वेगळ्या नजरेनं पाहतो आहे. उमगलेल्या नव्या जाणिवेनिशी जगण्याला सामोरा जात आहे. पुढे सरसावणारी प्रकाशवाट त्या प्रत्येक पांथस्थासाठी महत्त्वाची आहे.
सर्वार्थानं बदललेल्या या संदर्भानिशी यंदाची दिवाळी साजरी होत असताना भावना आणि संवेदनांच्या पातळीवर आपण सर्वांनी अनेक योजनं पुढे जाण्याची नितांत आवश्यकता आहे. आतापर्यंत हा उत्सव घरातला होता, मात्र आता तो संपूर्ण समाजाचा व्हायला हवा. कारण, मधल्या काळानं ही सीमारेषा बऱ्याच अंशी पुसट केली आहे. आपल्या अडचणीच्या काळात दाराला डबा लावून जाणारे आपल्या रक्ताचे नव्हते, सगळे कुटुंबीय कोरोनाच्या विळख्यात सापडले असताना न सांगता आर्थिक भार हलका करणारे सगळेच आपल्या नात्याचे नव्हते, घराघरांवर यमदूताचा कडा पहारा असताना, गेलेल्या प्रत्येक जीवाची व्यवस्था करणारे आणि उरलेल्या प्रत्येक जीवाची आस्थेनं विचारपूस करणारे सगळेच आपल्या ओळखीचे नव्हते. त्या कसोटीच्या काळात अनेक अपरिचितांनी स्वयंस्फूर्तीने आपल्या जीवाची पर्वा न करता झोकून देऊन कठीण काम केलं. आरोग्यालयं ओसंडून वाहत असताना वैद्यकीय क्षेत्रातले लोक देवासारखे धावून आले. तासांची गणती न करता अविरत काम करून त्यांनी अनेकांना जीवनदान दिलं. अशा देवदूतांमुळेच आज अनेकजण हे प्रकाशपर्व पाहू शकत आहेत, हे सत्य नाकारण्यात अर्थ नाही. त्यामुळेच यानिमित्ताने या सर्वांप्रती कृतज्ञता व्यक्त करणं, ही आपली जबाबदारी आहे.
ही दिवाळी आपल्या घरात साजरी करावी तसंच त्या अनाथांबरोबर साजरी करावी, ज्या लहानग्यांनी आपले पालक गमावले आहेत. त्यांच्याबरोबर साजरी करावी, ज्या म्हाताऱ्या खोडांदेखत घरातले बहरते वृक्ष कोसळले आहेत त्यांच्यासोबत अन् खरंतर मुकपणे आवंढे गिळणाऱ्या प्रत्येकासोबत साजरी करायला हवी, अशी ही दिवाळी आहे. फराळात एखादा जिन्नस करण्यासाठी वेळ कमी पडला तरी चालेल; पण अशांबरोबर वेळ घालवावा, जे एकटेपणाच्या पिंजऱ्यात अडकून पडले आहेत. तब्बल दीड-दोन वर्ष सक्तीच्या बंदिवासात राहिल्यानंतर आपल्यापैकी प्रत्येकाला अन्नाची, कपड्यालत्त्याची, चैनीची नेमकी गरज आणि त्याची खरी किंमत समजली आहे. म्हणूनच ही दिवाळी आभासातून वास्तवात येण्याचा एक साकव आहे, असंही आपण म्हणू शकतो. दिवाळीची पहाट आपल्याबरोबरच गरजूंच्या जगण्यात नव्या प्रकाशकिरणांची रुजवात करणारी असायला हवी. यंदाही अभ्यंगस्नान होईल, पण त्यामुळे आलेली शुचिर्भूत अवस्था आता तनाबरोबरच आपल्या मनापर्यंत पोहोचायला हवी. मनात साठलेलं किल्मिष दूर करून तेजोनिधीला अवताण देण्याची ही संधी कोणीही सोडू नये, अशीच आहे.
या नव्या अर्थानिशी जगण्याची सुरूवात करण्याचा, नव्या जाणीवांनिशी श्रीगणेशा करण्याचा दिवाळीखेरीज अन्य कोणता सुमंगल मुहूर्त असू शकतो? निश्चितच जगणं आनंददायी आहे, आश्वासक आहे. म्हणूनच त्याचा सन्मान करुया. सर्व कलांचा मनमुराद आस्वाद घेऊया. उत्तम वाचूया, उत्तम ऐकूया. जीवन समृद्ध बनवणं, हे केवळ आणि केवळ आपल्या हाती आहे, हे समजून घेऊन समृद्धीच्या दिशेने दमदार पावलं टाकूया.