Share

स्वाती पाटणकर

ती मला खूप आवडली. तिनं लग्नालाही होकार दिला आणि आम्ही लग्न ठरवलं, पण तितक्यात हा शिंच्या कोरोना आला. लग्न लांबणीवर टाकावं लागलं. खूप वाईट वाटलं. तिच्या भेटीसाठी तळमळत होतो. साधी भेटही होऊ शकत नव्हती. सगळे रोमँटिक मनसुबे मनातच रािहले होते.

अशातच लॉकडाऊन थोडा शिथिल झाला आिण आम्ही लग्नाची लगेचचीच तारीख काढली. अगदी थोड्या लाेकांच्या उपस्थितीत लग्न करायचं ठरवलं. मनाला मुरड घातली. लवकरात लवकर ती आता बाहुपाशी हवी होती.

‘सगळ्या चालीरितीला फाटा द्या. साधेपणानं आपण लग्न करू’ मी फर्मान काढलं.
पण, माझं ऐकतील, तर ते माझे नातेवाईक कसले?
‘‘अरे! लग्न एकदाच होतं. आवश्यक विधी तरी करायला पाहिजेत. याबाबतीत तू पडू नकोस. आमच्यावर सगळं साेपव.’’
‘‘ठीक आहे’’ म्हणण्याशिवाय मला पर्याय नव्हता.
‘‘पण मी घोड्यावर वगैरे अजिबात बसणार नाही. मला आवडत नाही. आपण आपल्या कारमधून जाऊ,’’ मीही निक्षून सांगितलं.
माझ्या सगळ्या सूचना, हट्टांना केराची टोपली मिळाली होती.
मम्मी, पप्पा आिण माझे दोस्त एकदम जोशात होते.
लग्नाच्या आदल्या रात्री घरीच पार्टी आिण भरपेट दारू ढोसून झाली.
‘‘यापुढे तुला अशी निवांत दारू ढोसता येणार नाही. आज पिऊन घे.’’ या प्रेमळ आग्रहामुळे भरपूर अपेयपान झालं.
दुसऱ्या दिवशी मी लवकरच उठलो.
खरं तर रात्रभर अजिबात झोप नव्हती. ‘‘सुहाग रात’’ मनात कधीची उमलली होती. लवकर हा दिवस जावा आिण रात्र यावी, हीच इच्छा होती.
मला जरा पोटाचा त्रास आहे, म्हणून सगळी खबरदारी घेतली. िमत्र आले हाेतेच.
शेरवानी, सलवार, जॅकेट, दुपट्टा, दािगने, थोडासा मेकअप करून मी तयार झालो.
वास्तविक कपडे खूप टाईट आहेत. काय करू? ‘‘संज्या एक नंबर इब्लिस आहे.’’
‘‘राजा मुद्दाम टाईट आणले आहेत, जरा कमी दिसशील. जरा वेळ सहन कर!’’
‘‘अरे! पण माझं पोट खूप आवळलं गेलं आहे रे!’’
‘‘जाऊ दे! फेटा बांधून घे.’’
‘‘फेटा? माझं डोकं दुखतं!’’
‘‘ओ! त्याचं काय ऐकता? मस्त तुरा काढा.’’
‘‘फेटा बांधा… फेटा बांधा…’’
मी असहाय्यपणे फेटाही बांधून घेतला.
‘‘संज्या! गाडी कोण चालवणार आहे?’’
‘‘राजा! खूपजण आहेत. चला खाली उतरूया’’
आम्ही घरातून खाली उतरायला लागलो आणि ढोल-ताशांचा जोरात आवाज सुरू झाला. अंगात झिंग चढल्यागत सारेजण नाचायला लागले.
बिल्डिंगच्या दाराशी आलो. बिल्डिंगमधल्या अनेक उत्सुक नजरा माझ्यावर खिळल्या होत्या आणि समोरून सजवलेला घोडा येताना मला दिसला.
‘‘मम्मी! हा घोडा कशाला आणला?’’
‘‘मी नाही सांगितलं होतं ना! मी बसणार नाही’’
अर्थात हे माझं बाेलणं माझ्याशिवाय कुणालाही ऐकू आलं नाही. ढोल-ताशे बडवण्याचाच आवाज होता ना!
आिण दीदी, जिजू, काका, काकी, मामा, मामी सारेजण आपल्याच नादात होते. मम्मी-पप्पा तर माझ्या नजरेसही पडले नव्हते.
जिजू पुढे आले. ‘‘राजा, चल घोड्यावर बस. घोडा मुद्दाम मागवलाय’’
‘‘जिजू, मला नाही बसायचं!’’
‘‘अरे, इथून सोसायटीच्या दारापर्यंत घोड्यावरून जायचं. नंतर आपली गाडी आहेच.’’
‘‘नको नको नको! मला घोड्यावर बसता येत नाही.’’
‘‘अरे! तो घोड्याचा मालक आलाय ना! तो बसवेल तुला.’’
बापरे! माझ्यापुढे अनवस्था प्रसंग होता. भरल्यापोटी टाईट कपड्यांत गच्च आवळलेला फेटा घेऊन घोड्यावर बसायचं!
‘‘अरे, लवकर बस. पाऊस थांबलाय तोवर आपण घोडा नाचवून घेऊया!’’ कुणाची तरी सूचना.
मी नाही, नाही म्हणत असतानाही मला बळेबळे घोड्यावर बसवलं आणि टांग टाकताना एक भयानक आवाज आला, जो फक्त मला समजला. कारण इतरांच्या कानाचे पडदे ढोल-ताशांमुळे फाटलेले होते.
हाय! घात झाला ना! माझी सलवार मोक्याच्या जागी टरकली होती.
मी खाणाखुणा करून संज्याला जवळ बोलावलं.
‘‘संज्या! दोस्ता! मला कपडे बदलायचे आहेत.’’
‘‘का? काय झालं?’’
‘सलवार मध्यभागी फाटलीय!’ हे वाक्य मी त्याला दहा वेळा सांगितलं. पण त्याला ऐकूच येत नव्हतं. ओरडून माझा घसा बसला.
मी घोड्यावरून उतरू लागलो, तर लांबून पप्पा धावून आले. ‘राजा, घोड्यावरून उतरायचं नाही. ५ मिनिटं थांब.’ अर्थात, हा सगळा संवाद खाणाखुणांसह सुरू होता.
‘अहो, माझी सलवार फाटलीय!’ मी जोरात ओरडलो. नेमकं त्याच क्षणी वाजवणारे ढोल-ताशे ताल बदलण्यासाठी थांबले आणि माझी गर्जना सर्वदूर पोहोचली.
‘‘असा कसा रे तू वेंधळा? तुझे इतर कपडे कार्यालयात आहेत. तेव्हा असाच बस. कुणाला समजणार आहे?’ दीदी बोलली.
इतक्यात माझ्या मागे चिकूला बसवण्यात आलं, करवली म्हणून. छोट्याशा चिकूच्या डोक्यावर कळशी दिली गेली, तीही पाण्यानं भरलेली.
आधीच तो घोडा अस्थिर होता, त्यात फाटक्या सलवारीनीशी मी अवघडलेला आणि आता ही चिकू! घोड्यानं पाऊल पुढे टाकलं आणि चिकूच्या कळशीतलं पाणी झर्रकन् आमच्या दोघांच्याही अंगावर पडलं. पावसाळी दिवस, गार वारा आणि गार पाणी. एक थंडगार शिरशिरी नको नको तिथून गेली. चिकू रडायला लागली. दीदीनं तिला उतरवली. मीसुद्धा आता उतरतो.
नो! नो! नो!
संज्या, विज्याला बोलवत होतो, पण ते येत नव्हते. गाडीच्या मागे पेग लावत होते. राजाच्या लग्नात नाचायची पूर्वतयारी म्हणून!
इकडे स्त्री वर्ग लोळणारे गाऊन संभाळत नाचण्यासाठी प्रयत्न करत होते. फेर धरायचा का? जोडीनं नाचायचं की, गणपती डान्स करायचा? त्यांचं काहीच ठरत नव्हतं. मी घोड्यावर बसून हताशपणे बघत होतो. मनात विचार होते रात्रीचेच! इतक्यात कुणीतरी किंचाळलं.
काय झालं? काय झालं? आमच्या एका बहिणीच्या पाठीला घोड्यानं धडक दिली.
अहो, त्या घोड्याच्या आसपास नाचत होत्या अन् घोड्याने तोंडानं ढुशी दिली असावी, त्यात इतकं गगनभेदी किंचाळायचं काय कारण? या सगळ्या राज्यात ढोल-ताशा वाजवणारे सॉलिड पेटले होतेच.
पाच मिनिटांसाठी मी घोड्यावर स्वार झाले होतो. आता १५ मिनिटं झाली होती अाणि घोडा फक्त १० पावलं चालला असेल. या घोड्यांना जे अलंकार घालतात ना! बेक्कार असतात. माझ्या फाटलेल्या सलवारीतून मला काहीतरी जबरदस्त टोचत होतं, पण सांगणार कोणाला? मला काळजी रात्रीचीच होती.
‘‘तू आवर रे लवकर!’’ मी बेंबीच्या देठापासून बोंबललो, कारण वाजवणारे बडवत होते. मोठ-मोठ्या आकाराच्या महिला डुलत होत्या. हा, पण आता घोड्यापासून त्या खूप लांब होत्या. घोडा म्हणे लंपट होता!
पप्पा-मम्मी सामानात गुंतले होते. मित्रमंडळींचं पवित्र कार्य सुरू होतं!
‘अरे, माझं लग्न आहे, जरा माझ्याकडे लक्ष द्या. मला घोड्यावरून उतरवा.’
संज्या, विज्याची फौज तर्र होऊन माझ्याकडे आली. ‘दोस्ता, तुझं लग्न आहे, एक पेग घेतो का? दोस्तीखातर?’
‘ए, गप बसा रे. आज मला नको. मला खाली उतरवा. माझे पाय फाकलेले आहेत रे. आता दुखायला लागलेत.’
‘असं का? असू दे, असू दे. जरा प्रॅक्टिस कर!’
या साऱ्या मित्रांना कुठेतरी डुबवायला हवं! संज्या, विज्या घोड्याच्या मालकाशी हुज्जत घालत होते. त्यांचं बोलणं ऐकून मी गर्भगळीत झालो.
‘ए, घोडे को नचाओ!’
‘नचाओ, कशाला?’
‘छे, छे, आमची बोली झाली आहे. घोडा नाचवा.’
‘बापरे! संज्या मी खाली उतरतो. आपण सगळेजण बघू या.’
‘राजा, पागल है क्या? तू घोड्यावरच बस. बघा कसा तो नाचवेल.’
‘ए, मला नाही करायचं!’
‘नाही, नाही! काही झालं तर माझी रात्र खराब होईल रे!’
‘ए, राज्या, काय होत नाही. यू नीड प्रॅक्टिस! बघ कशी गंमत येते ते!’
आता घोडा नाचवणार म्हटल्यावर सगळ्यांनीच माझ्याभोवती कोंडाळं केली. टाळ्या वाजू लागल्या, वाद्य कडकडत होती. लोकांमध्ये उन्माद होता, माझ्या मनात भीती! मी पडलो तर…? तेही एकवेळ चालेल, पण अवघड जागी फाटलेल्या सलवारीतून विश्वदर्शन नको!
इतक्यात घोड्यानं मागचे दोन पाय उचलले व मी त्याला मिठी मारली आणि मग पुढची पाच मिनिटं घोड्यानं माझ्यासकट विविध प्रकारचे नाच दाखवले.
पाय भरून आले होतेच. आता पाठही दुखायला लागली होती. चिकूच्या कळशीतलं पाणी पडल्यामुळे जॅकेटचा लाल रंग शेरवानीला लागला होता. आता तर माझ्या पोटातही गडबड सुरू झाली होती. हे असं घडलं, तर मी रात्री काय करू? माझी अगतिकता कुणालाच समजत नव्हती.
मित्र बेरकी, इरसाल. उन्माद झाल्यासारखे, माझी फजिती एन्जॉय करत होते. या सगळ्या नाचकामात प्रचंड दुर्गंधी येऊ लागली होती आणि मग समजलं घोड्यानं त्याचं कार्यक्रम उरकला होता. माझं वजन त्याला झेपलं नाही.
‘ए, घोड्यानं लीद टाकलेय. उचला ती आधी. खूप घाण वास येतोय. सोसायटीवाले चिडतील.’
तो मालक म्हणाला, ‘मी कुठं उचलू? कशी टाकू? एवढं वजन त्याच्यावर टाकल्यावर तो हागणारच.’
‘ए, गप रे. ते उचलून टाका.’ शेवटी कुणीतरी कॅरीबॅग दिली. त्यांनी कशीतरी ती उचलून टाकली, पण मला इतका घाण वास येत होता ना! शेवटी जीजूंनी परफ्यूमचा स्प्रे आणला आणि माझ्या अंगावर, घोड्यावर आणि आजूबाजूला उडवला.
जरा सुसह्य झालं! ती दुर्गंधी कमी झाली, पण मला एकदम दणका बसला. घोडा परत नाचायला लागला.
‘काय झालं? घोडा बिथरला का? काहीच समजेना. मालकही हताश झाला होता. आमच्यावर उखडला होता. तो संतापून म्हणाला, ‘सेंट कुठे उडवतात? अहो, घोड्याच्या ढुंगणावर उडवलंत ना? त्याला झोंबलं असेल. म्हणून ते बिथरलं आहे. पाणी आणा, पाणी आणा.’
घोड्याच्या पाठीवरून उडत-उडत मी बघत होतो हताशपणे, कारण आता माझं माकडहाडही ठणकायला लागलं होतं.
आता मी रात्री काय करू?’ तेवढ्यात कुणीतरी पाण्याची बाटली आणली. घोड्याची शेपटी वर उचलणार इतक्यात कुणीतरी पचकलं, ‘पाणी आहे का सोडा? ते चेक करा. नाहीतर अजून वांधे!’
‘पिऊन बघा, पाणीच आहे.’
‘ओके ओके. मालकांनी पाणी ओतलं. तरी ते घोडं थांबायचं नाव घेईना.’
मुर्खांनो, इतक्या थंडीत चिल्ड पाण्यानं काय त्याला धुवायचं? साधं पाणी घाला.’
साधारणपणे ५ ते १० मिनिटांनी तो थोडा शांत झाला.
‘मम्मी, लग्नाची वेळ टळून जाईल आता. मला खाली उतरवा. नाहीतर मी पळून जाईल.’
‘थांब रे बेटा. दीदी लवकर दादाला ओवाळ. मग त्याला गाडीत बसवू.
माझ्या जीवात जीव आला. लांबून दीदी चालत येत होती. ओवाळणीचे साहित्य घेऊन. इतर साळकाया-माळकाया होत्याच, त्यातच ढोल-ताशाची मंडळी. पुढची पाच मिनिटं निरांजन पेटावण्यात गेली आणि आता ती मला ओवाळणार, इतक्यात पाऊस सुरू झाला! सगळेजण आडोशाला पळाले. मला आणि घोड्याला एका भिंतीच्या आडोशाला उभं केलं. स्टँड नसलेल्या सायकली नाही का, आपण भिंतीवर सोडतो? तसंच!
जोरात सर येऊन गेली. मी आणि घोडा निथळत होतो. परत एकदा निरांजन ओवाळणी इत्यादी पाच मिनिटं तशीच! फायनली, दीदीने मला ओवाळलं आणि मला घोड्यावरून पायउतार व्हायला सांगितलं.
पण मंडळी आता मात्र फार मोठा धोका होता, फोटोग्राफरचा! फोटोग्राफर फार इब्लिस होता. त्यांनी माझे शंभर एक फोटो टिपले होते, मी नको म्हणत असतानाही. या फोटोग्राफरचाही मी कार्यक्रम करणार आहे. त्या फोटोग्राफरला बाजूला घ्या, मग मी उतरेन.
थकल्या शरीरानं, भिजलेल्या कपड्यांनी आणि मनातल्या संतापानं मी खाली उतरलो. माझा पार्श्वभाग लपवत! घोड्यावरून उतरल्यावरची माझी दैना काय वर्णावी?
तासभर पाय फाकलेले राहिल्यामुळे पाय जवळ येत नव्हते. पाठ दुखत होती. माकडहाड दुखत होतं. पोटात गडबड होती. तिला बघायचं होतं आणि स्वप्नरंजन करायचं होतं.
कसाबसा गाडीत बसलो. शेजारी संज्या आणि विज्या! नालायकांनो, माझी वाट लावून तुम्हाला काय मिळालं?
दोस्ता, लग्नाची सुरुवात अशीच असते रे! हे सर्व तू सहन करू शकलास, तर यश तुझंच आहे!
आता यावर काय बोलू? काय करू?
या क्षणाला तरी हे घोडापुराण विसरून जायला हवं आहे, कारण मला ‘तिला बघायचं आहे’…!

rayatechadarbar@gmail.com

Recent Posts

Weather Update : महाराष्ट्रासह ‘या’ राज्यांना पुढील तीन दिवस महत्त्वाचे!

हवामान विभागाने दिला अतिवृष्टीचा इशारा मुंबई : महाराष्ट्रासह (Maharashtra Rain) संपूर्ण देशभरात पावसाने चांगलीच हजेरी…

1 hour ago

Water Shortage : पुण्यात पाणी कुठेतरी मुरतंय; पाण्याच्या प्रत्येक थेंबाचा हिशोब घेणार

आमदार धंगेकरांच्या प्रश्नावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विधानसभेत उत्तर मुंबई : समान पाणी वाटपाची योजना…

1 hour ago

Manoj Jarange Patil : मराठा बांधव पुन्हा आक्रमक; छत्रपती संभाजीनगरमध्ये सुरु केले ‘रास्ता रोको’ आंदोलन!

परिसरात मोठी वाहतूक कोंडी छत्रपती संभाजीनगर : मराठा आरक्षण (Maratha Reservation) आंदोलक मनोज जरांगे (Manoj…

2 hours ago

Hathras Stampede : हाथरस दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना २ लाख तर जखमींना ५० हजार रूपयांची मदत

हाथरस : उत्तर प्रदेशचे (Uttar pradesh) मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (CM Yogi Adityanath) यांनी हाथरस येथील…

3 hours ago

SSC-HSC Exam : दहावी-बारावी विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी! पुरवणी परीक्षेची तारीख जाहीर

मुंबई : दहावी आणि बारावीच्या (SSC-HSC Exam) परीक्षेत अनुत्तीर्ण (Fail) झालेल्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची माहिती समोर…

4 hours ago

Nutrition Food : OMG! शालेय पोषण आहारात आढळले सापाचे पिल्लू

चिमुकल्यांसह पालकांमध्ये भीतीचे वातावरण सांगली : शालेय विद्यार्थ्यांना शाळेची गोडी लागावी यासाठी शालेय पोषण आहार…

5 hours ago