शारजा (वृत्तसंस्था) : टी-ट्वेन्टी वर्ल्डकपमधील शुक्रवारच्या पहिल्या सामन्यात (ग्रुप-२) न्यूझीलंडविरुद्ध नामिबियाच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष आहे. दोन विजय मिळवलेल्या किवींना उपांत्य फेरीची दावेदारी पेश करायची असल्यास उर्वरित दोन्ही लढती जिंकाव्या लागतील.
पाकिस्तानवर वर्चस्व राखता आले नसले तरी न्यूझीलंडने माजी विजेता भारतासह स्कॉटलंडला हरवून ग्रुप-२मध्ये पहिल्या दोन संघांत स्थान मिळवण्याच्या दृष्टीने आगेकूच केली आहे. अफगाणिस्तान आणि त्यांच्यात दुसऱ्या स्थानासाठी चुरस असली तरी किवींचे पारडे जड आहे.
न्यूझीलंडची सर्व आघाड्यांवरील कामगिरी सर्वोत्तम नसली तरी फलंदाजीत अनुभवी मार्टिन गप्टिल, डॅरिल मिचेल, कर्णधार केन विल्यमसन तसेच फिलिप्सने चांगले योगदान दिले आहे. गोलंदाजीत फिरकीपटू ईश सोढी आणि डावखुरा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्टने छाप पाडली आहे. विजयी कामगिरीत सातत्य राखायचे असेल तर किवींच्या सर्वच प्रमुख क्रिकेटपटूंना खेळ उंचवावा लागेल.
नामिबियाला तीन सामन्यांतून केवळ स्कॉटलंडवर विजय मिळवता आलेला आहे. अनुभवी संघांविरुद्ध त्यांचा अनुभव कमी पडत आहे. मात्र, प्रतिस्पर्धी संघाच्या चुका शोधल्यास ते सामन्यात चुरस निर्माण करू शकतात.
वेळ : दु. ३.३० वा.