मुंबई : क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरण गाजत असतानाच नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या मुंबई झोनल युनिटने आज मुंबई विमानतळाजवळच्या कार्गो कॉम्प्लेक्स येथून ४ कोटी रुपये किमतीचे हेरॉइन जप्त केले असून गुजरातमधील एका व्यक्तीला याप्रकरणी अटक केली आहे.
सहार येथील इंटरनॅशनल कुरियर टर्मिनलवर पार्सलद्वारे ड्रग्ज येणार असल्याची पक्की खबर एनसीबीच्या मुंबई झोनल युनिटला मिळाली होती. त्याआधारे छापा टाकून तपासणी करण्यात आली. यात कार्गो कॉम्प्लेक्समधील कॉन्फरन्स हॉलमध्ये एका पार्सलमध्ये सफेद पावडरचे पाकीट आढळून आले. हे हेरॉइन असल्याचे स्पष्ट झाले असून त्याची किंमत अंदाजे ४ कोटी रुपये असल्याची माहिती एनसीबीच्या अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे.
एनसीबीने याप्रकरणी एनडीपीएस कायद्याखाली गुन्हा दाखल केला आहे. हे पार्सल गुजरातमधील वडोदरा येथील कृष्णमुरारी प्रसाद याचे असल्याचे स्पष्ट झाले आहे. एनसीबीच्या मुंबई कार्यालयात त्याचा जबाब नोंदवून घेण्यात आल्यानंतर त्याला अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी अधिक तपास सुरू करण्यात आला असून यात आणखी कुणी गुंतले आहे का, याचा शोध घेण्यात येत आहे.