अबुधाबी (वृत्तसंस्था) : टी-ट्वेन्टी वर्ल्डकपच्या सुपर-१२ फेरीत दक्षिण आफ्रिकेने बांगलादेशचा विकेट राखून पराभव करताना ग्रुप-१ मध्ये दुसरे स्थान मिळवले. कगिसो रबाडा आणि अॅन्रिच नॉर्टजे (प्रत्येकी ३ विकेट) ही वेगवान दुकली विजयाची शिल्पकार ठरली. आफ्रिकेच्या विजयाने ऑस्ट्रेलियाचा उपांत्य फेरीचा मार्ग खडतर झाला आहे.
बांगलादेशचे ८६ धावांचे आव्हान द. आफ्रिकेने १३.३ षटकांत ४ विकेटच्या बदल्यात पार केले. सलामीवीर रीझा हेन्ड्रिक्ससह (४ धावा) आयडन मर्करमने (० धावा) निराशा केली तरी कर्णधार टेम्बा बवुमाने (नाबाद ३१ धावा) रॉसी वॅन डरच्या (२२ धावा) मदतीने विजय नोंदवला. अन्य सलामीवीर क्विंटन डी कॉकला (१६ धावा) मोठी खेळी करण्यात अपयश आले.
मोहम्मद नईम आणि लिटन दास यांनी संघाला सावध सुरुवात करून दिली. मात्र संघाच्या २२ धावा असताना मोहम्मद नईम ९ धावा करून बाद झाला. रबाडाच्या गोलंदाजीवर रीझा हेन्ड्रिक्सने झेल घेतला. त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर सौम्या सरकार पायचीत होऊन तंबूत परतला. त्याला खातेही उघडता आले नाही. त्यानंतर मुशफिकूर रहिमही शून्यावर बाद झाला. त्यानंतर महमदुल्लाह (३ धावा) मैदानावर तग धरू शकला नाही. अफिफ होसैनही खाते उघडू शकला नाही. लिटन दास २४ धावा करून माघारी परतला. शमिम हसन ११, महेदी हसन २७ धावा करून बाद झाले, तर तस्कीन अहमद ३ धावांवर असताना धावचीत झाला. नसुम अहमद हिट विकेट होत शून्यावर बाद झाला. रबाडा आणि नॉर्टजेने प्रत्येकी ३ विकेट घेतल्या. तबरेज शम्सीने २ आणि ड्वेन प्रीटोरिअसने एक विकेट घेतली.
दक्षिण आफ्रिकेने बांगलादेशला नमवत उपांत्य फेरीतील आव्हान कायम ठेवले. आता उपांत्य फेरीसाठी दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात चुरस आहे. दक्षिण आफ्रिकेची धावगती चांगली असल्याने आता ऑस्ट्रेलियाचा चांगलाच कस लागणार आहे. दक्षिण आफ्रिकेचा शेवटचा सामना इंग्लंडविरुद्ध आहे, तर ऑस्ट्रेलियाचे उर्वरित दोन सामने बांगलादेश आणि वेस्ट इंडिजविरुद्ध आहेत.