अबुधाबी (वृत्तसंस्था) : टी-ट्वेन्टी वर्ल्डकपमधील सुपर-१२ फेरीमध्ये मंगळवारी (२ नोव्हेंबर) दक्षिण आफ्रिकेची गाठ बांगलादेशशी पडेल. प्रतिस्पर्ध्यांवर वर्चस्व राखताना आफ्रिकन संघ अव्वल दोन संघांतील स्थान राखण्यास उत्सुक आहे.
दक्षिण आफ्रिकेने तीनपैकी दोन सामने जिंकताना ४ गुणांसह ग्रुप १मध्ये दुसरे स्थान राखले आहे. वास्तविक पाहता ऑस्ट्रेलियाचेही चार गुण आहेत. मात्र, सरस धावगतीवर आफ्रिकन संघाने वरचे स्थान मिळवले आहे. या संघांमध्येच गटातून दुसऱ्या स्थानासाठी झुंज आहे. त्यामुळे कमकुवत बांगलादेशला हरवून आफ्रिका संघ सातत्य राखण्यासह दुसरे स्थान आणखी मजबूत करण्यास उत्सुक आहे.
दक्षिण आफ्रिकेची दोन्ही आघाड्यांवरील कामगिरी फारशी उल्लेखनीय नाही. मात्र, प्रत्येक क्रिकेटपटूने खेळ उंचावण्यात मोलाचे योगदान दिले आहे. त्यांच्याकडून केवळ आघाडीच्या फळीतील आयडन मर्करमला अर्धशतकी मजल मारता आली आहे. सलामीवीर क्विंटन डी कॉक हा फॉर्मसाठी झगडत आहे. कर्णधार टेंबा बवुमा, डेव्हिड मिलर यांनीही निराशा केली आहे. गोलंदाजीत ड्वायेन प्रीटोरियसने छाप पाडली आहे. वेगवान गोलंदाज अॅन्रिच नॉर्टजेची कामगिरी बरी असली तरी तबरेझ शम्सी, केशव महाराजला प्रतिस्पर्धी फलंदाजांना अडचणीत आणता आलेले नाही.
बांगलादेशने सुपर-१२ फेरीत प्रवेश केला तरी अपेक्षित खेळ करण्यात त्यांना अपयश आले. सुरुवातीच्या तिन्ही पराभवांमुळे त्यांचे आव्हान संपल्यात जमा आहे. मात्र, उर्वरित सामन्यांत खेळ उंचावून त्यांना चुरस निर्माण करण्याला वाव आहे. बांगलादेशने कामगिरी उंचावली तर सामना रंगतदार होऊ शकते.
वेळ : दु. ३.३० वा.
पाकिस्तान विजयाचा चौकार लगावेल?
अबुधाबी (वृत्तसंस्था) : मंगळवारच्या दुसऱ्या सामन्यात सलग तीन सामने जिंकलेल्या पाकिस्तानला सातत्य राखताना नामिबियाविरुद्ध विजयाचा चौकार लगावण्याची संधी आहे. परंपरागत प्रतिस्पर्धी भारतासह न्यूझीलंडनंतर अफगाणिस्तानला हरवताना पाकिस्तानने जबरदस्त फॉर्म राखला आहे. इंग्लंडनंतर केवळ त्यांनाच सलग तीन सामने जिंकता आलेत. पाकिस्तानचा उपांत्य फेरीतील प्रवेश नक्की आहे. केवळ औपचारिकता शिल्लक आहे. मात्र, पाचही सामने जिंकण्याचा त्यांचा इरादा आहे. कर्णधार बाबर आझमने दोन अर्धशतके ठोकताना सातत्य राखले आहे. त्याला अन्य सलामीवीर मोहम्मद रिझवानसह फखर झमन आणि शोएब मलिकची चांगली साथ लाभली आहे. वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदीसह हॅरिस रौफने बॉलिंगचा भार सक्षमपणे वाहिला आहे. इमाद वासिमसह हसन अली यांची त्यांना चांगली साथ लाभली आहे.
नामिबियाने स्कॉटलंडला हरवून विजयी सुरुवात केली तरी त्यांना सातत्य राखण्यात अपयश आले. पाकिस्तानसारखा कडवा प्रतिस्पर्धी पाहता त्यांचा कस लागेल.
वेळ : सायं. ७.३० वा.