शारजा (वृत्तसंस्था) : यूएईत सुरू असलेल्या टी-ट्वेन्टी वर्ल्डकपमध्ये सुपर १२ फेरीतील ग्रुप १मधील शुक्रवारच्या (३० ऑक्टोबर) पहिल्या लढतीत दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंका आमनेसामने आहेत. गटवार साखळीत गुणतालिकेत तिसऱ्या आणि चौथ्या स्थानी असलेल्या संघांना पुनरागमनाची संधी आहे.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या अपयशी सुरुवातीनंतर दक्षिण आफ्रिकेने गतविजेता वेस्ट इंडिजला हरवत स्वत:ला सावरले. श्रीलंकेने बांगलादेशला हरवत आश्वासक सुरुवात केली. मात्र, ऑस्ट्रेलियाला थोपवण्यात अपयश आले. दोन सामन्यांनंतर एका विजयासह दोन्ही संघांच्या खात्यात प्रत्येकी दोन गुण आहेत. त्यात सरस रनरेटवर दक्षिण आफ्रिकेने तिसरे स्थान राखले आहे. उभय संघांचे अद्याप तीन सामने शिल्लक आहेत. त्यात तिन्ही सामने जिंकणारा संघ आघाडीवर असलेल्या इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाला उपांत्य फेरी गाठण्यादृष्टीने चुरस देऊ शकतो. त्यामुळे शुक्रवारच्या लढतीच्या निकालावर दोन्ही संघांची आगेकूच अवलंबून आहे. परिणामी, दोन्ही देशांच्या चाहत्यांना चुरशीची लढत अपेक्षित आहे.
मागील पाच टी-ट्वेन्टी लढतींचा रिझल्ट पाहता दक्षिण आफ्रिकेने (५-०) प्रतिस्पर्ध्यांवर निर्विवाद वर्चस्व मिळवले आहे. त्यामुळे शुक्रवारी पुन्हा श्रीलंकेचा कस लागेल. दक्षिण आफ्रिकेच्या कामगिरीचा आढावा घेतल्यास गोलंदाजी ओके आहे. मात्र, फलंदाजांनी निराश केले आहे. वेगवान दुकली अॅन्रिच नॉर्टजे, ड्वायेन प्रीटोरियस तसेच फिरकीपटू केशव महाराजने चांगली करताना वेस्ट इंडिजविरुद्धच्या विजयात मोलाचे योगदान दिले. फलंदाजी अपेक्षेप्रमाणे झालेली नाही. दोन सामन्यांत केवळ आघाडी फळीतील आयडन मर्करमला अर्धशतकी मजल मारता आली आहे. क्विंटन डी कॉकसह डेव्हिड मिलर तसेच कर्णधार टेम्बा बवुमाला फलंदाजीत चमक दाखवता आलेली नाही. त्यामुळे सर्व आघाड्यांवर कामगिरी बहरली तरच दक्षिण आफ्रिकेला प्रतिस्पर्धी संघावर वर्चस्व राखताना उपांत्य फेरी गाठण्याची आशा बाळगता येईल.
श्रीलंकेला ऑस्ट्रेलियाने रोखले तरी बांगलादेशविरुद्धची कामगिरी फारशी वाईट नाही. चरिथ असलंका तसेच भानुका राजपक्षने फलंदाजीत चांगले योगदान दिले आहे. अन्य सहकाऱ्यांना सूर गवसल्यास लंकेची फलंदाजी आणखी मजबूत होईल. श्रीलंकेची गोलंदाजी तितकी प्रभावी नसली तरी वहिंदु हसरंगाने छाप पाडली आहे. त्याला अन्य सहकाऱ्यांची साथ अपेक्षित आहे.
वेळ : दु. ३.३० वा.
डी कॉक पुन्हा संघात परतेल?
वर्णद्वेषी मोहिमेमध्ये सहभागी होण्यास नकार दिल्याने डी कॉकने विंडिजविरुद्ध अंग काढून घेतले. मात्र, त्याच्या अनुपस्थितीत संघ जिंकला. माफी मागताना डी कॉकने प्रकरण संपवले असले तरी त्याला संघात पुन्हा स्थान मिळेल का, याची उत्सुकता आहे.