नवी मुंबई (प्रतिनिधी) : मनपा वाहन विभागाने उद्यान विभागाच्या ताफ्यात अडीच कोटी खर्च करून २३ मीटरपर्यंत वाढणाऱ्या वृक्षांची छाटणी योग्य प्रकारे करता येईल, अशी चार वाहने खरेदी केली आहेत. या वाहनांचा दुसरा मोठा फायदा म्हणजे दुर्दैवाने एखादी आगीसारखी घटना घडली, तर आगीवर नियंत्रणही आणता येऊ शकते. तसेच आगीच्या तडाक्यात सापडलेल्या सहाव्या माळ्यापर्यंत वास्तव्यास असणाऱ्या नागरिकांना वाचविण्यात यश देखील येऊ शकते.
नवी मुंबई महानगरपालिका पालिका क्षेत्रात दिवसेंदिवस वृक्षांच्या झालेल्या वाढीमुळे उपलब्ध असणाऱ्या वाहनाद्वारे छाटणी करण्यास प्रतिबंध येत होते. त्यामुळे वृक्षांची वाढ जोरदारपणे होत होती; परंतु वादलासारख्या परिस्थितीमध्ये उंच वाढलेले वृक्ष कोलमडून वनराईचा ऱ्हास होत होता.
आधुनिक शहराचा मान मिळालेल्या नवी मुंबई मनपाच्या उद्यान विभागात पावसाळापूर्व वृक्ष छाटणीसाठी तीन वाहने होती. या वाहनांची क्षमता १३ मीटरपर्यंत वाढणाऱ्या वृक्षांची छाटणीसाठी करता येत होती; परंतु त्यापेक्षा वाढलेली वृक्ष छाटणी करण्यास अनंत अडचणीला तोंड द्यावे लागत होते. याचा दुष्परिणाम मागील वर्षी झालेल्या निसर्ग वादळात आला होता. वृक्षांची वाढ अनियमित झाली. त्यामुळे ३ जून २०२० रोजी आलेल्या वादळामुळे शेकडो वृक्ष उन्मळून पडले. यामुळे वनराईचा फार मोठा ऱ्हास पर्यावरणप्रेमींना पाहायला मिळाला होता.
या समस्यांचा विचार करत मनपा आयुक्त अभिजित बांगर यांनी उद्यान विभागाकरिता अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित वाहन खरेदी करण्यास परवानगी दिली. त्यानंतर वाहन विभागाचे उपायुक्त मनोज महाले यांनी आयुक्तांच्या आदेशाचे पालन करत चार अत्याधुनिक वाहने खरेदी केली. या नव्या वाहनांद्वारे २३ मीटरपर्यंत धोकादायक वाढलेल्या वृक्षांची छाटणी करता येणार आहे. त्यामुळे हे वाहनाद्वारे अरुंद जागेतही नेऊन अनियमित वाढ झालेल्या वृक्षांची छाटणी अगदी सहजरीत्या करता येणार आहे.
आधुनिक शहरात मनपाची स्थापना होऊन तीन दशके झाली. या प्रकारची वाहने आधीच खरेदी केली असती, तर निसर्ग वादळात वृक्षांची हानी झाली नसती. – दीपक काळे, पर्यावरण प्रेमी, दिघा