
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : इस्रायलच्या एनएसओ कंपनीच्या पेगॅसस सॉफ्टवेअरचा वापर करून भारतात अनेकांवर हेरगिरी केल्याच्या आरोपांवरील याचिकांची सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी मोठा निर्णय घेतला. आता या प्रकरणातील सत्य बाहेर येणार आहे.
पेगॅसस हेरगिरी प्रकरणाची चौकशी करण्यासाठी तज्ज्ञांची विशेष समिती गठीत करण्यात येणार आहे. हीच समिती या प्रकरणाचे सत्य समोर आणेल. सरन्यायाधीश एन. व्ही. रमण यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठ पेगॅससप्रकरणी ३ वेगळ्या खटल्यांची सुनावणी करत आहे. या सुनावणीत न्यायालयाने कोणत्याही व्यक्तीवर अशा प्रकारची हेरगिरी करण्यास परवानगी देता येणार नाही, असेही स्पष्ट केले.