दुबई : अपयशी सलामीनंतर भारताचा संघ यूएईत सुरू झालेल्या आयसीसी टी-ट्वेन्टी वर्ल्डकपमध्ये जेतेपदासाठी प्रबळ दावेदार आहे, असे ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज ब्रेट ली याला वाटते.
सलामीला भारतापेक्षा पाकिस्तानची सर्वच आघाड्यांवर चांगली कामगिरी झाली. भारताने तीन स्पिनर्ससह खेळवायला हवे होते. मात्र, अनुभवी भुवनेश्वर कुमार आणि मोहम्मद शमीसारखे असताना तीन वेगवान गोलंदाजांसह खेळणे पसंत केले. त्यांना अपेक्षित गोलंदाजी करता आली नाही. त्यांच्या खराब कामगिरीपेक्षा पाकिस्तानच्या बॉलर्सनी अप्रतिम मारा केला. त्यांना विजयाचे क्रेडिट जाते. शाहीन शाह आफ्रिदीसह पाकिस्तानच्या सर्वच गोलंदाजांनी तिखट मारा केला तरी कर्णधार विराट कोहलीने खेळपट्टीवर टिकून राहताना शानदार अर्धशतक झळकावले. लोकेश राहुलला चेंडू अजिबात कळला नाही. रोहित शर्माने थोडा संयम दाखवायला हवा होता. फलंदाजांचे अपयश समजता येऊ शकते. मात्र, गोलंदाजांचे अपयश जिव्हारी लागले. मात्र, अजून चार सामने आहेत. त्यात खेळ उंचावून भारत पुन्हा एकदा जेतेपदाची ट्रॉफी उंचावेल, असा विश्वास ब्रेट लीने व्यक्त केला.
उर्वरित सामन्यांत दडपड झुगारून खेळल्यास भारताची वाटचाल सोपी होईल. कारण त्यांच्याकडे चांगले क्रिकेटपटू आहेत. फायनलबाबतचे भाकीत वर्तवणे कठीण आहे. मात्र, भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये अंतिम सामना व्हावा, असे ब्रेट ली याला वाटते.