कंगनाला दोन चित्रपटांसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : तामिळ, हिंदी, कन्नड आणि मल्याळम या भाषांमध्ये अभिनय करून प्रेक्षकांना आपलंसं करणारे लोकप्रिय अभिनेते शिवाजीराव गायकवाड म्हणजेच रजनीकांत यांचा आज २५ ऑक्टोबर २०२१ रोजी दादासाहेब फाळके पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. भारतीय चित्रपटसृष्टीतील रजनीकांत यांचं अमूल्य योगदान लक्षात घेऊन २०१९ साली त्यांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला होता. परंतु, कोरोना महामारीच्या काळात पुरस्कार समारंभ न होऊ शकल्याने आता या पुरस्काराचे वाटप करण्यात आले. दादासाहेब फाळके पुरस्कार हा चित्रपटसृष्टीतील सर्वोत्कृष्ट पुरस्कार मानला जातो. चित्रपटसृष्टीसाठी बहुमूल्य कामगिरी करणाऱ्या कलाकाराला हा पुरस्कार देण्यात येतो. या पुरस्कारात एक शाल, सन्मानचिन्ह आणि एक लाख रुपये बक्षीस म्हणून दिले जातात. रजनीकांत यांचा गौरव स्वतः देशाचे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी केला.
रजनीकांत यांनी आपल्या मनोगतातून त्यांच्या आजवरच्या चित्रपटसृष्टीतील प्रवासाचा आढावा घेतला. त्यामध्ये त्यांनी आपले चाहते, नातेवाईक यांचे आभार मानले. आजवरच्या प्रवासात आपल्याला त्यांचा सर्वात मोठा पाठिंबा मिळाल्याचं त्यांनी याप्रसंगी सांगितलं. रजनीकांत यांना पुरस्कार प्रदान करतेवेळी प्रेक्षकांमध्ये रजनीकांत यांच्या परिवारातील सदस्यही उपस्थित होते.
६७व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराचा वितरण सोहळा सोमवारी पार पडला आहे. उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते उपस्थित व्यक्तींना हे पुरस्कार प्रदान करण्यात आले. अभिनेत्री कंगना रनौतला दोन चित्रपटांसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे, तर हिंदी चित्रपट विभागात दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या ‘छिछोरे’ या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपट हा पुरस्कार मिळाला.
यावेळी कंगनाला ‘मणिकर्णिका’ आणि ‘पंगा’ या चित्रपटातील अभिनयासाठी राष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात आले. तसेच अक्षय कुमारच्या केसरी या चित्रपटातील ‘तेरी मिट्टी’ या गाण्याचे पार्श्वगायक बी प्राक यांना या गाण्यासाठी सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक हा राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला.
या सोहळ्यादरम्यान अभिनेते रजनीकांत यांना उपस्थितांनी उभे राहून मानवंदना देत सन्मानित केले. तसेच अभिनेते मनोज बाजपेयी आणि दाक्षिणात्य अभिनेता धनूष या दोघांना विभागून सर्वोत्कृष्ट अभिनेता हा राष्ट्रीय पुरस्कार देण्यात आला.