दुबई (वृत्तसंस्था) : टी-ट्वेन्टी वर्ल्डकपमधील सुपर १२ फेरीतील ग्रुप १मधील मंगळवारच्या (२६ ऑक्टोबर) पहिल्या सामन्यात द. आफ्रिका आणि वेस्ट इंडिज संघ आमनेसामने आहेत. अपयशी सलामीनंतर उभय संघांना पहिल्या विजयाची प्रतीक्षा आहे.
सलामीला वेस्ट इंडिजला इंग्लंडकडून ६ विकेटनी पराभूत व्हावे लागले. प्रतिस्पर्धी संघातील लेगस्पिनर अदिल रशीदसह मोईन अली, टायमल मिल्सच्या प्रभावी माऱ्यासमोर गतविजेत्यांची वाताहत झाली. कीरॉन पोलार्डचा संघ १४.२ षटकांत ५५ धावांमध्ये आटोपला. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध त्यांच्यासमोर फलंदाजी उंचावण्याचे आव्हान आहे. मागील चुका टाळताना ख्रिस गेल, लेंडल सिमन्स, इविन लेविस, कर्णधार पोलार्ड, ड्वायेन ब्राव्हो तसेच शिमरॉन हेटमायरने फलंदाजी केल्यास वेस्ट इंडिज प्रतिस्पर्ध्यांसमोर चांगले आव्हान उभे करू शकते. पहिल्या सामन्यात फलंदाजांनी निराशा केली तरी अकील होसीन आणि रवी रामपॉलने अचूक मारा करताना सामन्यात रंगत आणली. द. आफ्रिकेविरुद्ध विंडिजच्या अन्य गोलंदाजांनाही सूर गवसेल, अशी चाहत्यांना आशा आहे.
वेस्ट इंडिजप्रमाणे दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांना वर्ल्डकपमध्ये अपेक्षित सुरुवात करता आली नाही. ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्यांची मजल ९ बाद ११८ धावांपर्यंत गेली. आयडन मर्करमने खेळपट्टीवर थांबण्याची तसदी घेतली तरी कर्णधार टेम्बा बवुमा, क्विंटन डी कॉक, रॉसी वॅन डर ड्युसेनसह हेन्रिच क्लासेन आणि डेव्हिड मिलरने निराशा केली. फलकावर कमी धावा असूनही अॅन्रिच नॉर्टजेसह कॅगिसो रबाडा, केशव महाराज आणि तबरेझ शम्सीने चांगला प्रतिकार केला. मात्र, अपयशी सलामीनंतर स्पर्धेतील आव्हान कायम राखण्यादृष्टीने त्यांना खेळ उंचवावा लागेल.
आफ्रिकेकडे आघाडी
उभय संघांमधील मागील पाच टी-ट्वेन्टी सामन्यांचा निकाल पाहता दक्षिण आफ्रिकेने वेस्ट इंडिजवर ३-२ अशी आघाडी घेतली आहे. जून-जुलैमध्ये वेस्ट इंडिज दौऱ्यात झालेल्या पाच सामन्यांच्या मालिकेतील ही आकडेवारी आहे.
वेळ : दु. ३.३० वा.