विलास खानोलकर
खान अब्दुल करीमखाँ हे गायनातील, संगीतातील गानतपस्वी होते. चोवीस तास ते कबिरासारखे ईश्वर सेवेत म्हणजेच अल्लाच्या गुणगायनात मग्न असत. ते संगीतातील किराणा घराण्याचे संगीतमहर्षी होते. अमळनेरला प्रतापशेठ नावाच्या एका ईश्वरभक्ताच्या घरी मैफल गाजविली, तेव्हा त्यांना साईभक्तांकडून साईंची महती कळली व त्यांना केव्हा एकदा साईंच्या मशिदीत अल्लाचे दर्शन घेतो व आपली सेवा रुजू करतो, असे झाले. तेथूनच ते आपली पत्नी, तोहराबाई व सुंदर मुलगी; परंतु आजारी गुलबकावली व इतर १५-२० जणांच्या काफिलासह वाजंत्री-गाजंत्री घेऊन ते शिर्डीत हजर होतात. बाबांच्या चरणी आपली गानसेवा, १५ दिवस सादर करतात. बाबा ही खूष होतात. त्यांची रागदारी, अल्लाची सुफीसंतांची गाणी, काबा मशिदीतील गाणी, कबिराची गाणी, हिंदू देवदेवतांची गाणी सर्वच उत्कृष्टरीत्या बाबांच्या मशिदीमध्ये मैफलीत सादर करतात.
खाँसाहेबांच्या रागदारीतून निथळणारी अमृतमयी भक्तिधारा यांनी शिरडी परिसरातील लोक चिंब न्हावून निघतात. शरद पौर्णिमा, कोजागिरी पौर्णिमा गाजविल्या जातात. साईबाबा, तात्याकोते पाटील, माधवराव देशपांडे (शामा), श्रीमंत बुटीसाहेब सर्वच खूष होतात. आनंदाने माना डोलावतात. बाबांनाही संगीत प्रिय. ही मेजवानी मिळाल्यामुळे बाबा त्यांचा सत्कार करतात. बाबांचे आध्यात्मिक सामर्थ्य व बाबांची साईलीला पाहून व दरबारातील गर्दी तसेच चमत्कार पाहून खाँसाहेब भारावून जातात. बाबांच्या पायावर डोके ठेवून, फुले, फळे व ५ रुपये दक्षिणा ठेवतात. बाबा पुन्हा त्यांना २ रुपये परत देऊन तुम्हाला दुप्पट आयुष्य मिळेल, असे सांगतात. पंचमहाभुते तुम्हांला प्रसन्न होतील, असा आशीर्वाद देतात. खाँसाहेब सांगतात, माझी मुलगी गुलबकावली आजारी आहे, तिला अल्लाच्या कृपेने बरी, धडधाकट करा, अशी विनवणी करतात. साईबाबा मुलीच्या मस्तकी उदी लावतात, गुळाचा खडा व श्रीफळाचा प्रसाद देतात. तू लवकर बरी होशील, असे म्हणून पाठीवर शाबासकी देतात. साईबाबा सर्वांच्या व्यथा, वेदना जाणत असत व आपल्या आत्मिक सामर्थ्याने त्यावर उपाय सांगून अनेकजणांना बरे करीत. साऱ्यांची दुःखे बाबा स्वत:च्या अंगावर घेत, पण भक्तांना बरे करीत असत. साईबाबांच्या कृपेने करीमखाँ साहेबांची आजारी मुलगी बरी झाली. विदर्भाकडे जाताना ते म्हणाले,
साईनाथ महाराज की जय।