
मुंबई (प्रतिनिधी): बारामती, पुणे आणि मुंबईसह राज्यभरातील अन्य ठिकाणी प्राप्तीकर विभागाने (इन्कमटॅक्स विभाग) टाकलेल्या छाप्यांमध्ये १८४ कोटी रुपयांची बेहिशेबी मालमत्ता आढळून आल्याची माहिती विभागाच्या वतीने देण्यात आली आहे. ७० ठिकाणी टाकलेल्या छाप्यात ही बेहिशेबी मालमत्ता जप्त केल्याचे सांगण्यात आले आहे.
राज्यातील एका बड्या राजकीय घराण्याशी संबंधित हे छापे असल्याची माहिती प्राप्तीकर विभागाने दिली असून टॅक्स विभागाचा अप्रत्यक्ष रोख उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे असल्याचे स्पष्ट आहे. ७ ऑक्टोबर रोजी प्राप्तीकर विभागाने ७० ठिकाणी छापे टाकले होते. यात अजित पवारांच्या निकटवर्तीयांचाही समावेश होता. प्राप्तीकर विभागाच्या माहितीनुसार, ७ ऑक्टोबर रोजी मुंबई, पुणे, बारामती, गोवा, जयपूर या शहरात ७० ठिकाणी हे छापे टाकण्यात आले होते. या छाप्यात बेकायदेशीर रित्या रक्कम फिरवण्यात आल्याचे प्राप्तीकरला आढळून आले आहे.
राज्यातील एका बड्या राजघराण्याचा संबंध असल्याचा प्राप्तीकरच्या प्रसिद्धीपत्रकात उल्लेखकरण्यात आला आहे. ही रक्कम मुंबईत मोक्याच्या जागी कार्यालयाची इमारत खरेदी करण्यासाठी, दिल्लीतील उच्चभ्रू वस्तीत फ्लॅट खरेदी करण्यासाठी, गोव्यात रिसॉर्ट खरेदी, राज्यात विविध ठिकाणी शेत जमीन खरेदी करण्यासाठी आणि साखर कारखान्यांमध्ये गुंतवण्यात आल्याची माहितीही प्राप्तीकर खात्याने दिली आहे.
यासाठी १७० कोटी रुपये वापरण्यात आल्याचीही माहिती प्राप्तीकर खात्यातर्फे देण्यात आली आहे. या छाप्यांमध्ये २ कोटी १३ लाख रुपयांची बेहिशेबी रोख रक्कम आणि ४ कोटी ३२ लाख रुपयांचे बेहिशेबी दागिनेही जप्त करण्यात आल्याचेही प्राप्तीकर खात्यातर्फे सांगण्यात आले आहे.