Thursday, September 18, 2025

गोव्यातील शिवसेना उपाध्यक्षाने दस-यालाच ठोकला राजीनामा

गोव्यातील शिवसेना उपाध्यक्षाने दस-यालाच ठोकला राजीनामा

पणजी : इकडे शिवसेना आपला दसरा मेळावा साजरा करत असताना तिकडे गोव्यात मात्र सेनेला मोठा धक्का बसला. ऐन दसऱ्याच्या दिवशीच गोव्यातील शिवसेनेच्या उपाध्यक्षा आणि पक्ष प्रवक्त्या राखी प्रभूदेसाई नाईक यांनी राजीनामा दिला आहे. शिवसेनेसाठी गोव्याच्या राजकारणात हा मोठा धक्का मानला जात आहे. फक्त राजीनामा देऊन स्वस्थ न बसता राखी नाईक यांनी शिवसेनेच्या नेत्यावर गंभीर आरोप केल्याने राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगल्या आहेत.

राखी नाईक म्हणाल्या की, गोव्याच्या प्रश्नात शिवसेनेच्या नेत्यांना रसच नाही. गोव्यातील नागरिकांच्या प्रश्नांसंदर्भात शिवसेना तळमळ दाखवेल, अशी अपेक्षा असल्यामुळेच आपण पक्षात प्रवेश केला होता. मात्र प्रत्यक्षात स्थिती तशी दिसली नाही, अशी टीका त्यांनी शिवसेनेवर केली आहे.

गोव्यात पक्षाची वाढ व्हायची असेल, तर गोवेकरांच्या स्थानिक प्रश्नांमध्ये लक्ष घालणे गरजेचे आहे. मात्र गेल्या काही वर्षात शिवसेना नेते नुसते गोव्यात पर्यटनासाठी येतात. खातात, पितात आणि निघून जातात. मात्र प्रत्यक्षात जनतेच्या प्रश्नावर काहीच हालचाल होत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. गोव्यातील जनतेप्रति आपली जबाबदारी असून पक्षापेक्षा जनता अधिक महत्त्वाची असल्याचे नाईक म्हणाल्या.

कुठल्या पक्षात प्रवेश घेण्याबाबत सकारात्मक किंवा नकारात्मक असा कुठलाही विचार सध्या नसून जनतेची कामं करण्यावर आपला भर असेल्याचेही त्या म्हणाल्या.

Comments
Add Comment