वलास खानोलकर
साईबाबा शिर्डीत येऊन राहू लागले तेव्हापासून शिर्डीचे वैभव, पावित्र्य, महत्त्व आणि कीर्ती उत्तरोत्तर वाढतच गेली. भक्तमंडळी दूरवरून बाबांच्या दर्शनास येऊ लागली आणि अशा प्रकारे शिर्डीला धार्मिक व आध्यात्मिक महत्व प्राप्त झाले. बाबांचा जन्मच परोपकारासाठी होता. त्यांनी आयुष्यभर लोकांचे कल्याणच केले. बाबा सगळ्यांचे मायबाप होते. दीन, दुबळ्या, आर्त, दुःखी जनांचा विसावा होते. कोणी आशेने बाबांपाशी गेला आणि रिक्तहस्ते परतला असे कदापि घडले नाही आणि यापुढेही घडणार नाही.
बाबांनी आपल्या आयुष्यात हा हिंदू, तो मुसलमान, हा ख्रिश्चन, तो पारसी, हा आपला, तो परका असा कोणताही भेदभाव कधीच केला नाही. मनुष्य असो वा मूक प्राणी, गरीब असो वा श्रीमंत, विद्वान असो वा अशिक्षित, ते सर्वांशी प्रेमाने, आपुलकीने व एकात्मभावाने वागत. प्रत्येकाच्या सुखदुःखात सहभागी होत, संकटात त्यांच्या पाठीशी उभे राहत. सदुपदेश करून त्यांना मार्गदर्शन करीत. त्यांचे रागावणेही भक्तांच्या कल्याणासाठीच असायचे. म्हणूनच सर्वांना ते आपले वाटायचे.
अशा प्रकारे भक्तांच्या हृदयावर विराजमान झालेल्या या थोर महात्म्याने इ.स. १९१८मध्ये विजयादशमीच्या पावन दिनी देह ठेवला. बाबांनी आपले समाधीस्थान अगोदरच निश्चित केलेले होते. त्यामुळे भक्त बुट्टींच्या वाड्यातच बाबांच्या देहाला यथाविधी सद्गती देण्यात आली आणि बाबांच्या सुंदर मूर्तीची प्राणप्रतिष्ठाही करण्यात आली. बाबांच्या समाधीमुळे बुट्टींच्या वाड्याला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले. त्या वाड्याला साईबाबांच्या दरबाराचे स्वरूप प्राप्त झाले. बाबांमुळेच त्या वास्तूला त्रैलोक्यात मानाचे स्थान प्राप्त झाले.
बाबांनी जरी समाधी घेतली असली तरी, आजही त्यांची चिरंतन ज्योती समाधीस्थानी जागृत आहे. श्रद्धावंत भाविकांना आजही त्यांच्या अस्तित्वाची, त्याच्या कृपेची अनुभूती येते. म्हणूनच ज्या कोणाला या जन्ममरणाच्या यातायातीतून सुटका व्हावी, असे वाटते त्याने बाबांची भक्ती करावी, त्यांची पदासक्ती जोडावी, त्यांच्या उपदेशपर वचनांना अनुसरून वागावे आणि सर्वार्थाने श्री साईबाबांनाच शरण जावे.
वारा न उडवी यास,
पाणी ना भिजवी यास
अग्नि न जाळी यास,
बाबा भक्तांचे ईश्वर व्यास
बाबा सर्वांचे साईबाबा,
बाबा भक्तांचेच आईबाबा
साऱ्या निसर्गावर बाबांचाच
अति प्रेमळ ताबा
शिर्डीचे साईबाबा मंदिर,
भक्तांसाठी मशीद काबा
।। समर्थ सदगुरू श्री साईनाथ महाराज की जय।।