Sunday, July 14, 2024
Homeक्रीडाभारताचा इंग्लंडविरुद्धचा सराव सामना रद्द

भारताचा इंग्लंडविरुद्धचा सराव सामना रद्द

दुबई (वृत्तसंस्था) : टी-ट्वेन्टी वर्ल्डकपपूर्वीच्या भारताच्या सराव सामन्यांमध्ये बदल करण्यात आला आहे. जुन्या वेळापत्रकानुसार, विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणारा भारतीय संघ १८ ऑक्टोबरला इंग्लंडविरुद्ध तसेच २० ऑक्टोबर रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळणार होता. मात्र, इंग्लंडविरुद्धचा सामना रद्द करण्यात आले आहे.

नवीन वेळापत्रकानुसार, टीम इंडिया आता १८ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी साडेसात वाजता (भारतीय वेळेनुसार) ऑस्ट्रेलियाविरुद्ध सराव सामना खेळेल. दुबईतील आयसीसी अकादमी मैदानावर हा सामना होईल. भारतीय क्रिकेट संघाचा दुसरा सराव सामना २० ऑक्टोबर रोजी दुबईमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होईल. हा सामना संध्याकाळी साडेसात वाजता सुरू होईल.

आधीच्या वेळापत्रकानुसार दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम भारताच्या दोन्ही सराव सामन्यांचे आयोजन करण्यासाठी तयार होते. मात्र, आता सामने दुबईतील आयसीसी अकादमी मैदानावर होणार आहेत. दरम्यान, इंग्लंड क्रिकेट संघ आता आपला पहिला सराव सामना पाकिस्तानविरुद्ध १८ ऑक्टोबर रोजी अबुधाबी येथील शेख झायेद स्टेडियम नर्सरी १ मध्ये खेळणार आहे. त्यांचा दुसरा सराव सामना २० ऑक्टोबर रोजी अबुधाबीमध्ये न्यूझीलंडविरुद्ध होईल.

आठ संघांच्या पात्रता फेरीने ओमान आणि युएईतील टी-ट्वेन्टी वर्ल्डकपला सुरुवात होईल. पात्रता फेरी १७ ऑक्टोबरपासून ओमानमध्ये खेळली जाणार आहे. प्राथमिक फेरीतील आठ संघांमध्ये बांगलादेश, श्रीलंका, आयर्लंड, नेदरलँड, स्कॉटलंड, नामिबिया, ओमान आणि पापुआ न्यू गिनी यांचा समावेश आहे. यातील चार संघ सुपर १२ फेरीत पोहोचतील.

भारताचा संघ : विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, लोकेश राहुल, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत, इशान किशन (दोघेही यष्टिरक्षक), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, राहुल चहर, आर. अश्विन, अक्षर पटेल, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमरा, भुवनेश्वर कुमार. मोहम्मद शमी. राखीव : श्रेयस अय्यर, दीपक चहर, शार्दुल ठाकूर.

भारताचे सामने

२४ ऑक्टोबर : भारत विरुद्ध पाकिस्तान
३१ ऑक्टोबर : भारत विरुद्ध न्यूझीलंड
३ नोव्हेंबर : भारत विरुद्ध अफगाणिस्तान
५ नोव्हेंबर : भारत विरुद्ध ब १ संघ
८ नोव्हेंबर : भारत विरुद्ध अ २ संघ

धोनीने मानधन घेतले नाही : जय शहा

टी-ट्वेन्टी वर्ल्डकप स्पर्धेसाठी मार्गदर्शक (मेंटॉर) म्हणून नियुक्ती करण्यात आलेला माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीने कोणत्याही प्रकारचे मानधन किंवा पैसे घेतले नाहीत, असे स्पष्टीकरण बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी यांनी दिले आहे. धोनीच्या नेतृत्वाखाली संघाने २००७ टी-ट्वेन्टी विश्वचषक, २०११ वनडे विश्वचषक आणि २०१३ चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा जिंकली. टी-ट्वेन्टी संघाचा भारताचा विद्यमान कर्णधार म्हणून विराट कोहलीची ही शेवटची स्पर्धा आहे. त्याने आयपीएलमधून बंगळूरुचे कर्णधारपदही सोडले आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -