हंडे-कळशा आपटत हक्काच्या पाण्याची मागणी

  47

मीरा रोड (वार्ताहर) : मीरा-भाईंदर शहराला पाणीपुरवठा करणारी पाइपलाइन फुटल्यामुळे गेल्या तीन ते चार दिवसांपासून शहरात पाणी आले नसल्यामुळे शहरातील नागरिक पाणीटंचाईने त्रस्त झाले आहेत. मीरा-भाईंदरमध्ये तीन दिवसांच्या कालावधीनंतर मंगळवारी सकाळी काही परिसरात पाणी आले आहे. मात्र, अनेक ठिकाणी अद्यापही पाणी आलेले नाही. मीरा रोड पूर्वच्या ओल्ड पेट्रोल पंपच्या समोर असणाऱ्या क्लासिक काऊंटी कॉम्प्लेक्समधील सर्व रहिवासी मंगळवारी सकाळी १० च्या सुमारास घरातील हांडे-कळशा घेऊन हक्काच्या पाण्याकरिता खाली उतरून मीरा-भाईंदर महानगरपालिकेला पाणी प्रश्न लवकरात लवकर सोडवावा, अशी विनंती करत होते.


महिलांचे पाणीटंचाईने अनेक हाल होत असल्यामुळे त्यांनी त्यांचा राग हांडे-कळशा आपटून व्यक्त केला. सोसायटीमध्ये राहणाऱ्या रेश्मा तपासे यांनी सांगितले की, दर महिन्याला पिण्याकरिता व घरगुती कामाकरिता पाणी विकत घेण्याकरिता जवळपास सहा ते सात हजार रुपये मोजावे लागतात. कोरोनाच्या काळात अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. त्यात हा खर्च कसा उचलायचा, असा प्रश्न सामान्यांना पडला असून पालिकेने याकडे लवकरात लवकर लक्ष द्यावे अन्यथा येणाऱ्या निवडणुकीत बहिष्कार घातल्याशिवाय पर्याय उरलेला नाही, असा इशाराही त्यांनी दिला आहे.


मीरा-भाईंदर शहराला एमआयडीसीकडून पाणीपुरवठा करणारी पाइपलाइन दुरुस्तीचे काम करण्यासाठी शुक्रवारी पुरवठा बंद ठेवण्यात आला होता. त्यानंतर शनिवारी पाणीपुरवठा सुरू करताच कल्याण शीळ, फाटा येथे सकाळी ७.३०च्या आसपास पाइपलाइन फुटली होती.


पाइपलाइनचे खिडकालेश्वर मंदिरासमोर आणि देसाईगाव अशा दोन ठिकाणी काम सुरू होते. हे काम पूर्ण झाल्यानंतर पुन्हा जांभळी येथे पाइपलाइन लिकेज झाली. त्यामुळे मीरा-भाईंदर शहरात गेल्या चार दिवसांपासून अनेक भागात पाणी आले नाही.


रविवार व सोमवार या दिवशी, तर दुकानदार व टँकरचालक यांनीही नागरिकांची पिळवणूक करत पाण्यासाठी जास्त पैसे घेत असल्याचे अनेक नागरिकांनी सांगितले आहे. नागरिकांना भरपावसात पाणी मिळत नसल्याने मनपा प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला जात आहे.

Comments
Add Comment

हार्बर रेल्वे ठप्प! तांत्रिक बिघाडामुळे नेरूळ ते पनवेल सेवा बंद, संध्याकाळी घरी जाणाऱ्या प्रवाशांचे हाल

तांत्रिक बिघाडामुळे आज रविवारी संध्याकाळच्या सुमारास हार्बर रेल्वे सेवा विस्कळीत नवी मुंबई: मुंबईतील मध्य

दादरचा ऐतिहासिक कबूतरखाना बंद: मुंबईची एक ओळख काळाच्या पडद्याआड

मुंबई: दादर पश्चिमेचा कबुतरखाना आता कायमचा बंद होणार आहे. एकेकाळी दादरकरांसाठी पत्ता सांगताना कबुतरखाना ही एक

सर्व प्रतिज्ञापत्रांसाठी मुद्रांक शुल्क माफ

महसूलमंत्री बावनकुळे यांची घोषणा मुंबई : सर्व प्रकारच्या प्रतिज्ञापत्रासाठी जोडावे लागणारे पाचशे रुपयांचे

पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत नागरिकांच्या सार्वजनिक, वैयक्तिक समस्यांवर थेट सुनावणी

जनतेच्या तक्रारींचे त्वरित निवारण  सिंधुदुर्गनगरी : शनिवारी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नागरिकांच्या अनेक

आपल्या देशाचे नाव उंचावण्याची भावी अधिकाऱ्यांची जबाबदारी

खासदार नारायण राणे यांचे यूपीएससी गुणवंतांना मार्गदर्शन मुंबई : येत्या काळात भारत हा चौथ्या अर्थव्यवस्थेवरून

शुक्रवारच्या कारवाईनंतर दादर कबुतर खान्यावर खाद्य देणे सुरूच !

खाद्य विकणाऱ्यांसह दाणे टाकणाऱ्यांवर कारवाई करण्याकडे दुर्लक्ष मुंबई (प्रतिनिधी) : मुंबईतील कबुतर खान्यांवर