अंकिता गजभिये, नवी दिल्ली
गर फिरदौस बर रूये ज़मी अस्त/ हमी अस्तो हमी अस्तो हमी अस्त म्हणजेच धरतीवर जर कुठे स्वर्ग असेल, तर तो इथेच आहे, इथेच आहे, इथेच आहे. अमीर खुसरो यांच्या ओळीतून आजही स्वर्गरूपी काश्मीर प्रत्येकाच्या डोळ्यांसमोर तरळतो.
“हस्त मेरा मौलिद व मावा व वतन” हिन्द कैसा है?
‘किश्वरे हिन्द अस्त बहिश्ते बर जमीन’
अर्थात, हिंद माझी जन्मभूमी आहे, भारत देश धरतीवर जणू स्वर्गच आहे. खुसरोंच्या या ओळीतून भारतभूमीचे सार्थक वर्णन दिसून येते; परंतु देशाच्या स्वातंत्र प्राप्तीनंतर गेल्या ७० वर्षांपासून या स्वर्गाला ग्रहण लागले होते. कायम अशांतता, शेजारी राष्ट्राकडून काश्मीर खोऱ्यात दहशतवादाला घालण्यात येणारे खतपाणी आणि तुष्टीकरणाच्या राजकारणामुळे कायमचा धुमसत असलेला काश्मीर आता कुठेसा शांत झाल्याचे दिसून येत आहे. खुसरोंच्या काळातील काश्मीरची ‘सादगी’ परत मिळवून देण्याचे आता सरकारने ठरवलंय. स्वर्गरूपी या केंद्रशासित प्रदेशाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे महत्त्वाचे कार्य पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय परिवहनमंत्री नितीन गडकरी यांनी हाती घेतले आहे. पंतप्रधानांचे नेतृत्व आणि गडकरींचे ‘व्हिजन’ यासाठी पुरेसे आहे. अत्यंत खडतर आणि कठीण अशा भागात सामरिकदृष्ट्या महत्त्वाचा ‘झोजिला’ बोगद्याचे बांधकाम जवळपास पूर्ण करीत गडकरींनी त्यांचे ‘कमिटमेंट’ पूर्ण केले आहे.
पाकिस्तान आणि चीन या शेजारच्या राष्ट्रांच्या आगळकीला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी हा बोगदा विशेष महत्त्वाचा आहे. याचे काम पूर्ण झाल्यावर लष्कराला अत्यंत कमी वेळात सीमेवर दारूगोळा पोहोचवता येऊ शकेल. सांगण्याचे तात्पर्य एवढेच की झोजिला बोगदा ‘ऑल वेदर रोड कनेक्टिव्हिटी’अंतर्गत बांधला जात असून, हा आशियातील सर्वात लांब बोगदा असेल. जम्मू-काश्मीर आणि लडाख खोऱ्यात जवळपास १.५ लाख कोटी रुपयांच्या निधीतून ५२ किलोमीटर लांब हा भूमिगत मार्ग बनवण्यात येत आहे. या मार्गामुळे काश्मीर आणि काश्मीरवासीयांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडून येतील. जम्मू-काश्मीरमध्ये जवळपास ३२ किलोमीटर लांब २० भूमिगत मार्ग आणि २० किलोमीटरचे भूमिगत मार्ग लडाखमध्ये उभारले जात आहेत. झोजिला बोगद्यामुळे साडेतीन तासांचा प्रवास अवघ्या १५ मिनिटांमध्ये पूर्ण होईल. केंद्र सरकारला जम्मू-काश्मीर आणि लडाखमध्ये अनेक शक्यता दिसून आल्या आहेत. यासाठी जम्मू-काश्मीरमध्ये पर्यटनाच्या दृष्टीने जागतिक दर्जाच्या सुविधांना विकसित केले जात आहे. येत्या काळात स्वित्झर्लंड येथील दावोसच्या धर्तीवर काश्मिरातील सोनमर्गमध्ये ‘आईस स्पोर्ट्स’ आयोजित केले जातील, याची शक्यता नाकारता येत नाही. बोगद्याचे काम पूर्ण झाल्यानंतर या भागातील पर्यटनाला चालना मिळून युवकांना रोजगार मिळेल.
झोजिलासह झेड-मोड बोगदादेखील या ठिकाणी तयार केला जात आहे. हा बोगदा ६.५ किलोमीटर लांब असून झोजिला १३.५ किलोमीटर लांबीचा आहे. दोन्ही बोगद्यांचे काम पूर्ण झाल्यानंतर पर्यटकांचा प्रवास सुकर होईल. हिवाळ्यात होणाऱ्या हिमवृष्टीमुळे श्रीनगर-लेह-लडाख महामार्ग बंद होतो. ही समस्या पुन्हा कधी उद्भवू नये, यासाठी डिसेंबर २०२३ पर्यंत बोगद्याचे काम पूर्ण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. उंचावर असल्याने सोनमर्गमध्ये हिमवृष्टी तसेच हिमस्खलनाची समस्या आहे. तीन ते चार महिने नागरिकांची येथील ये-जा बंद असते. झोजिला खोरे थेट लेह-लडाखच्या सीमेपर्यंत जात असल्याने भौगोलिकदृष्ट्या हा भाग अत्यंत महत्त्वाचा मार्ग आहे. ६.२ किलोमीटर लांबीच्या झेड-मोड बोगद्याचे काम वेगाने सुरू आहे. येत्या हिवाळ्यात हा बोगदा खुला केला जाणार असल्याने अतिहिमवृष्टीमुळे स्थानिकांना दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित करण्याची गरज आता राहणार नाही. झोजिला बोगद्याचे बांधकाम २ हजार ३०० कोटी रुपयांच्या निधीतून केले जात आहे. लष्कराच्या दृष्टीने धोरणात्मक महत्त्व असलेला सोनमर्गजवळील हा बोगदा श्रीनगर आणि लडाखदरम्यान प्रत्येक मौसमात संपर्क कायम ठेवण्याचे काम करेल. पर्यटक १२ महिने लेह-लडाख जाऊ शकतील. देशाच्या सुरक्षेच्या अनुषंगाने देखील हे बोगदे महत्त्वाची भूमिका बजावतील.
विशेष म्हणजे केंद्रात मोदी सरकार सत्तेवर आले, तेव्हा जम्मू-काश्मीरमध्ये राष्ट्रीय महामार्ग १ हजार ६९५ किलोमीटर लांबीचा होता; परंतु तो आता २ हजार ६६४ किलोमीटरचा झाला आहे. सोनमर्गचा सुमारे ६.५ किमीचा झेड-मोड बोगदा, नीलगढ बोगदा आणि झोजिला बोगद्याला जोडला जाईल, ज्यामुळे वाहतूक सुरळीत होईल. या भागात बोगदा बांधल्यामुळे सुमारे तीन ते चार हजार लोकांना रोजगार मिळेल. कुठल्याही क्षेत्राच्या सामाजिक तसेच आर्थिक विकासात रस्तांच्या जाळ्यांचा अत्यंत महत्त्वाचा वाटा असतो. काश्मीर खोऱ्यात विकासाची गंगा पोहोचवण्याची केंद्राकडून करण्यात येणारी प्रामाणिक धडपड यावरून दिसून येते, यात शंका नाहीच. मात्र, गेल्या ७० वर्षांपासून काश्मीरमधील विकासाचा ‘बॅकलॉग’ भरून काढण्याचे कामही यानिमित्ताने केले जात आहे, हे नाकारून चालणार नाही.
पूजा काळे सृष्टीचे तत्त्व सांभाळा, नेहमीची येतो उन्हाळा. वर्षभरात तीन ऋतूंच्या तीन तऱ्हा सांभाळताना होणारा…
पुणे : काँग्रेस पक्षाने महाराष्ट्रात अध्यक्ष बदलला आहे. हर्षवर्धन सपकाळ महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष झाले आहेत.…
डॉ. वीणा सानेकर भाषा हा शिक्षणातील पायाभूत घटक आहे. ती माणसाच्या अस्तित्वाची ओळख असल्यामुळे शिक्षणातील…
अर्चना सोंडे जगात ज्या काही दुर्मीळ आदिवासी जमाती आहेत. ज्यांचे पृथ्वीवरील अस्तित्व संपल्यात जमा झाले…
पंचांग आज मिती चैत्र कृष्ण सप्तमी शके १९४७. चंद्र नक्षत्र पूर्वाषाढा. योग सिद्ध. चंद्र राशी…
मुंबई(ज्ञानेश सावंत): रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचा संघ पावसामुळे मागच्या सामन्यात पंजाब कडून दारुण पराभूत झाला. सुरुवातीचे…