Saturday, May 4, 2024
Homeमहत्वाची बातमीअरे बाप रे... रायगड जिल्ह्यातील १३३ धोकादायक पूल कधीही कोसळण्याची शक्यता

अरे बाप रे… रायगड जिल्ह्यातील १३३ धोकादायक पूल कधीही कोसळण्याची शक्यता

अलिबाग (वार्ताहर): सावित्री पुलानंतर जिल्ह्यातील अन्यत्र असलेल्या जुन्या पुलांचा प्रश्न ऐरणीवर आला असून, अनेक पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीटदेखील करण्यात आले आहेत. मात्र रायगड जिल्हा परिषदेच्या अखत्यारीत येत असलेले रायगड जिल्ह्यातील सर्वच्या सर्व म्हणजे १३३ पूल धोकादायक असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. यापैकी कोणता पूल कधी पडेल याची शाश्वती उरलेली नाही. या सर्व पुलांच्या दुरुस्तीसाठी ९८ कोटी ५० लाख रुपयांचा प्रस्ताव सरकारकडे रायगड जिल्हा परिषदेकडून पाठविलेला असला, तरी अद्याप सरकारकडून या पुलांच्या दुरुस्तीसाठी निधीच न मिळाल्याने पुलांची कामे मार्गी लागू शकलेली नाहीत.

दरवर्षी रायगड जिल्ह्यामध्ये जोरदार पाऊस पडतो. त्यामुळे पावसाळ्यात अनेक ठिकाणी पूल पाण्याखाली जाऊन पुलांचे बांधकाम जीर्ण झाले आहेत. रायगड जिल्ह्यातील १५ तालुक्यांत जिल्हा परिषदेच्या अखत्यारितील १३३ पूल असून, हे सर्वच्या सर्व पूल धोकादायक असल्याचे बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता के. आ. बारदेस्कर यांनी सांगितले.

अलिबाग तालुक्यात दहा पूल धोकादायक असून, त्यांच्या दुरुस्तीसाठी दहा कोटींचा निधी अपेक्षित आहे. मुरुड तालुक्यात ४० पूल धोकादायक असून, त्यांच्या दुरुस्तीसाठी सात कोटींचा निधी अपेक्षित आहे. रोहा तालुक्यात सात पूल धोकादायक असून, त्यांच्या दुरुस्तीसाठी सात कोटींची निधी अपेक्षित आहे. पेण तालुक्यात एकुण नऊ पूल धोकादायक असून, या पुलांच्या दुरुस्तीसाठी नऊ कोटी अपेक्षित आहे. सुधागड तालुक्यात एकुण आठ पूल धोकादायक असून, त्यांच्या दुरुस्तीसाठी आठ कोटींचा निधी अपेक्षित आहे.

कर्जत तालुक्यात सहा पूल धोकादायक असून, त्यांच्या दुरुस्तीसाठी आठ कोटींचा निधी अपेक्षित आहे. खालापूर तालुक्य़ात तीन पूल धोकादायक असून, त्यांच्या दुरुस्तीसाठी चार कोटींचा निधी अपेक्षित आहे. पनवेल तालुक्यात १७ धोकादायक पूल असून, या पुलांच्या दुरुस्तीसाठी नऊ कोटींचा निधी अपेक्षित आहे. उरण तालुक्यात चार धोकादायक पूल असून, त्यांच्या दुरुस्तीसाठी चार कोटींचा निधी अपेक्षित आहे.

महाड तालुक्यात एकूण आठ पूल धोकादायक असून, त्यांच्या दुरुस्तीसाठी सात कोटींचा निधी अपेक्षित आहे. पोलादपूर तालुक्यात सात पूल धोकादायक असून, त्यांच्या दुरुस्तीसाठी सात कोटी ५० लाखांचा निधी अपेक्षित आहे. माणगाव तालुक्यात एक पूल असून, त्याच्या दुरुस्तीसाठी दोन कोटींचा निधी अपेक्षित आहे.

म्हसळा तालुक्यात सहा धोकादायक पूल असून, त्यांच्या दुरुस्तीसाठी आठ कोटींचा निधी अपेक्षित आहे.

श्रीवर्धन तालुक्यात एकुण सात धोकादायक पूल असून, त्यांच्या दुरुस्तीसाठी आठ कोटींचा निधी अपेक्षित आहे. तळा तालुक्यात एकही पूल धोकादायक नसल्याचे सांगण्यात आले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -