Sunday, June 16, 2024
Homeसंपादकीयअग्रलेखबारावीचा निकाल भरीव; मुलांचे भवितव्य काय?

बारावीचा निकाल भरीव; मुलांचे भवितव्य काय?

बारावीची परीक्षा हा विद्यार्थ्यांच्या जीवनातला एक खूप महत्त्वाचा टप्पा असतो. बारावीनंतर घेतलेले अभ्यासक्रम भविष्यात विद्यार्थ्यांच्या कारकिर्दीचा पाया रचतात. म्हणूनच विद्यार्थ्यांना करिअरच्या महत्त्वपूर्ण पर्यायांची माहिती असणे तितकीच महत्त्वाची बाब आहे. बारावीनंतर विज्ञान आणि वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांसाठी करिअरचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत.त्यामुळे बारावी परीक्षेत किती गुण मिळतात याकडे विद्यार्थी आणि पालकांचे लक्ष लागलेले असते. महाराष्ट्र राज्य बोर्डाचा बारावीचा निकाल मंगळवारी लागला. विद्यार्थी आणि पालकांच्या मनात धाकधूक होती, ती उत्कंठा अखेर संपली. यंदाचा महाराष्ट्राचा बारावीचा निकाल हा ९३.३७ टक्के लागला.

गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा निकालाच्या टक्केवारीमध्ये २ टक्क्यांनी वाढ झाली ही समाधानकारक बाब असली तरी यंदाही मुलींनी बाजी मारली, हे आवर्जुन सांगावेसे वाटते. त्यात कोकण विभाग सर्वात अव्वल ठरला आहे. कोकण विभागाने आपला रेकॉर्ड यंदाही कायम राखला. कोकण विभागाचा निकाल ९७.९१ टक्के लागला, तर मुंबई विभाग हा यंदा सर्वात तळाशी आहे. मुंबईचा निकाल ९१.९५ टक्के लागला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत मुंबई विभागाचा निकाल पुन्हा घसरला. राज्य सरकारकडून मुंबई विभागावर सर्वात जास्त लक्ष असते तरीदेखील मुंबई विभागाचा निकाल तळाशी असल्यामुळे प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. या निकालाकडे पाहताना यंदाही मुलांपेक्षा मुली अग्रेसर ठरल्या आहेत. यावर्षी ९५.४४ टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत, तर उत्तीर्ण होणाऱ्या मुलांचे प्रमाण ९१.६० टक्के आहे. म्हणजे परीक्षा देणाऱ्या मुलांपेक्षा ३.८४ टक्के अधिक मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. त्यामुळे एकूण टक्केवारीच्या आकड्यात कोणी बाजी मारली यावर माध्यमांमध्ये सध्या चर्चा रंगलेली दिसते; परंतु जे विद्यार्थी चांगल्या मार्कांनी उत्तीर्ण होतात किंवा ज्यांना बारावी पास होता आले नाही अशा असंख्य विद्यार्थ्यांचे पुढे काय होते, याकडे समाजाचे दुर्लक्ष होताना दिसते.

उज्ज्वल भवितव्यासाठी चांगले मार्क मिळायला हवेत, ही खुणगाठ मारून मुले अभ्यास करतात. त्यांच्या आयुष्यात काय संघर्ष असतो. उच्च शिक्षणाचा चांगला मार्ग निवडल्यानंतरही करिअर कसे घडते, याचा आपण विचार करताना कोणी दिसत नाही. खरं तर लाखो विद्यार्थी दरवर्षी बारावीची परीक्षा देऊन बाहेर पडतात. कोणते करिअर निवडायचे आणि त्यासाठी कोणत्या कोर्ससाठी अमूक एका महाविद्यालयात प्रवेश मिळावा यासाठी पालक आणि विद्यार्थी यांचा पायपीटवजा संघर्ष आता सुरू झालेला आहे. आवडीच्या कोर्ससाठी प्रवेश मिळविण्यासाठी अनेक ठिकाणी हेलपाटे मारावे लागणार आहेत; परंतु उच्च शिक्षणासाठी त्यांनी निवडलेला पर्याय हा योग्य होता का? हे मागे वळून आपण पाहत नाही. वेळ निघून गेली, अशी अवस्था अनेकदा विद्यार्थ्यांची होते. सायन्स शाखेतील विद्यार्थ्यांकडे अन्य विद्यार्थ्यांपेक्षा अधिक पर्याय असतात.

विज्ञान शाखेतील विद्यार्थी आर्ट किंवा कॉमर्सचा कोर्स घेऊ शकतात; परंतु वाणिज्य व कला शाखेचे विद्यार्थी विज्ञान संबंधित अभ्यासक्रम घेऊ शकत नाहीत. तसे बहुतेक लोकांना केवळ बारावी सायन्सनंतरच्या अभियांत्रिकी आणि वैद्यकीय अभ्यासक्रमांबद्दल माहिती असते. पण बारावी सायन्सनंतर अभियांत्रिकी व वैद्यकीय अभ्यासक्रमांशिवाय बरेच पर्यायही उपलब्ध असतात. त्यामुळे परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर प्रत्येक विद्यार्थ्यांना एकच चिंता सतावत असते ती म्हणजे पुढे काय करायचे? पण बारावी सायन्सनंतर कोणते करिअर निवडायचे, हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात असतो. बहुतांशी विद्यार्थ्यांना इंजिनीअरिंग, मेडिकल किंवा बी.एस्सी याशिवाय पर्याय असतात; परंतु त्यांची माहिती नसल्यामुळे संभ्रमावस्था निर्माण होण्याची शक्यता पालक वर्गात असते हे सत्य नाकारता येत नाही. दुसऱ्या बाजूला जे विद्यार्थी नापास होतात, त्यांचे पुढे काय होते, याचा कधी कोणी विचार होताना दिसत नाही.

यंदाच्या निकालाकडे पाहिले तर ७ टक्के मुले ही नापास झाली आहेत. त्यांच्या आयुष्यातील अंधार दूर होण्यासाठी कोणते पर्याय आहेत, हा सुद्धा एक संशोधनाचा विषय आहे. कारण नापास विद्यार्थी हा सुद्धा समाजाचा एक भाग असतो. शैक्षणिक वाट त्याची खुंटली तरीही विकसनशील भारताच्या स्वप्नात कमी गुण मिळालेले आणि नापास झालेल्या विद्यार्थ्यांचे स्थान कुठे असेल, याचा विचार करण्याची गरज आहे. कठोर परिश्रम घेऊन ज्या विद्यार्थ्यांनी ९० टक्के पेक्षा अधिक गुण प्राप्त करून घेतले, अशा विद्यार्थ्यांची संख्याही लक्षणीय आहे. प्रत्येक विद्यार्थ्याला त्याचे करिअर खूप महत्त्वाचे वाटते. विद्यार्थी ही त्याच्या स्वप्नातील नोकरी मिळविण्यासाठी परीक्षेची तयारी करताना दिसतात. त्यात गैर काही नाही; परंतु दरवर्षी परीक्षेच्या अग्निदिव्यातून बाहेर पडणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी तितक्याच रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत का? हा ज्वलंत प्रश्न सध्या भेडसावत आहे. पुढची पिढी ही शिक्षणाच्या माध्यमातून शिक्षित होत असली तरी व्यावसायिक अभ्यासक्रम, रोजगाराभिमुख शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना भविष्यात चांगल्या संधी उपलब्ध व्हायला हव्यात याची आता काळजी सरकारने घ्यायला हवी.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -