वोह दिन अब ना रहे…

Share

नॉस्टॅल्जिया: श्रीनिवास बेलसरे

हिंदी सिनेमात कोणकोणत्या विषयावर गाणी आहेत ते पाहण्यापेक्षा कोणत्या विषयावर गाणे नाही ते शोधून काढणेच जास्त अवघड होईल. कारण आमच्या गीतकारांनी मानवी जीवनातील असा एकही विषय सोडला नाही ज्यावर त्यांनी रसिकांसाठी सुंदर असे गीत सादर केले नाही! तारुण्यातील प्रेम हा तर अगदीच ढोबळ विषय! आई-वडिलांचे मुलांवरील प्रेम, मुलांचे आई-वडिलांवरील प्रेम, भावा-बहिणीतील प्रेम, आजीबद्द्ल प्रेम, मित्रावरचे, देशावरचे असे काहीही सांगा. गाणे तयारच आहे.

याशिवाय प्रेमभंगावर, दुराव्यावर, अबोल्यावर, प्रतारणेवर, गरीबीवर, श्रीमंतीवर, मैत्रीतील दुराव्यावर, विरहावर, दु:खावर गाणी आहेतच. मृत्यूवर, जीवनावर, जीवनाच्या अर्थावर, ध्येयवादावर, जीवनाच्या अर्थशून्यतेवर, युद्धावर, शत्रूवर, संघर्षावर, क्रांतीवर, समर्पणावर, शिक्षणावर, अडाणीपणावर, खरेपणावर, खोटेपणावर, ईश्वरभक्तीवर, अगदी देवाबद्दलचा राग व्यक्त करण्यासाठीसुद्धा, गाणी आहेतच! आता हे झाले उघड, ढोबळ, सोपे विषय! पण ज्यावर गाणे लिहिता येऊ शकेल असे आपल्याला पटणारही नाही, अशा गुंतागुंतीच्या विषयावरसुद्धा एकापेक्षा एक हिंदी गाणी आहेत. कल्पना करा, अबोध वयात एका तरुण-तरुणीत प्रेम फुलले आणि नंतर तिचे लग्न भलत्याच व्यक्तीशी झाले. काहीतरी घटना घडून ती त्या बंधनातून मुक्त झाली आणि पुन्हा तिच्या मूळ प्रियकराने तिच्याकडे प्रेमाची याचना केली, तर त्यावर कसे गाणे असेल? आमच्या नरेंद्र शर्मानी त्याही प्रसंगावर एक गोड गाणे लिहिले होते.

सिनेमा होता प्रेमरोग. राजकपूरचे दिग्दर्शन, ऋषी कपूरची मुख्य भूमिका सोबत ताजीतवानी पद्मिनी कोल्हापुरे, शम्मीकपूर, नंदा, तनुजा, कुलभूषण खरमंदा, बिंदू, रझा मुराद, ओमप्रकाश, लीला मिश्रा आणि विजयेंद्र घाटगे असे कसलेले कलाकार आणि कथा कामना चंद्रा यांची! बॉक्स ऑफिसवर हिट झालेला प्रेमरोग त्यावर्षी सर्वात जास्त कमाई करणारा दुसऱ्या क्रमांकाचा सिनेमा ठरला. त्याला फिल्मफेयरची तब्बल १२ नामांकने मिळाली आणि त्यापैकी सर्वोत्तम दिग्दर्शक (राज कपूर) सर्वोत्तम गीतकार (संतोष आनंद) सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (पद्मिनी) आणि सर्वोत्कृष्ट संपादन (राज कपूर) अशी ४ पारितोषिके त्याने खिशातही टाकली.

देवधर (ऋषी कपूर) हा बडे ठाकूर यांचा आश्रित गरीब मुलगा. त्याचे ठाकूर (शम्मी कपूर)च्या मुलीवर म्हणजे मनोरमावर (पद्मिनी कोल्हापुरे) मनोमन अव्यक्त प्रेम आहे. पण तिचा विवाह ज्या प्रतिष्ठित व्यक्तीशी होतो त्यांचे लग्नानंतर लगेच निधन होते. तिच्यावर पतीच्याच भावाकडून झालेल्या अत्याचारामुळे ती माहेरी परत येते. दरम्यान देवाधरला आपले प्रेम व्यक्त करावेसे वाटू लागते. त्याच्या मनात आपली प्रेयसी दुसराच माणूस येऊन घेऊन गेला याची खंत आहे. ती अधुरी कथा पूर्ण करण्याची त्याची आता उत्कट इच्छा आहे. हे सगळे नरेंद्र शर्मांनी एका गाण्यात गुंफले होते. गाण्याचे शब्द होते –

भँवरेने खिलाया फूल,
फूलको ले गया राज-कुंवर
भंवरे तू कहना न भूल,
फूल तुझे लग जाये मेरी उमर,
भँवरेने खिलाया……

लतादीदी आणि सुरेश वाडकरांनी लक्ष्मी-प्यारेच्या दिग्दर्शनात गाणे इतके हिट करून टाकले होते की, १९८२ला आणि नंतरही कितीतरी वर्षे ते देशभर कुठे न कुठे वाजतच होते. पद्मिनीला तिच्या वयाच्या (२७) दुप्पट वयाच्या लतादीदींनी (५३) दिलेला आवाज किती कोवळा होता ते लक्षात यायला गाणे पुन्हा एकदा ऐकूनच पाहायला हवे! दीदीला सलामच करावा लागतो! मनोरमाच्या मनात आपल्यावर झालेल्या अत्याचारामुळे आता आपण देवधरच्या निर्मल प्रेमाच्या योग्यतेचे राहिलेलो नाही अशी भावना आहे. त्यामुळे ती म्हणते –

भंवरे तू कहना न भूल,
फूल तेरा हो गया इधर-उधर
भँवरेने खिलाया……

ती म्हणते आता ते जुने दिवस राहिले नाहीत. माझ्यावर काय काय प्रसंग येऊन गेले ते मी तुला सांगूही शकत नाही. माझे जीवन आता धुळीला मिळाले आहे. आता मी तुझ्या योग्यतेची नाही रे! –

वो दिन अब ना रहे..
क्या-क्या विपदा पड़ी फूलपर कैसे फूल कहे,
वो दिन अब ना रहे…
होनी थी या वो अनहोनी जाने इसे विधाता,
छूटे सब सिंगार गिरा गल-हार टूटा हर नाता,
शीश-फूल मिल गया धूलमें क्या-क्या दुःख न सहे, वो दिन अब ना रहे…
भंवरे तू कहना न भूल,
फूल डालीसे गया उतर…

ऋषी कपूर हा पद्मिनीच्या प्रेमात अगदी बुडाला आहे. त्याला कशानेच काही फरक पडत नाही. तो तिला प्रेमाची महती समजावून सांगताना मीराबाईचे उदाहरण देतो. मीराबाईला कसा विषाचा प्याला जबरदस्तीने प्यायला लावण्यात आला होता, तिच्या प्रेमाच्या शक्तीने त्या विषाचेही कसे अमृत झाले, हे सांगून तो म्हणतो आपल्या प्रेमाने आपण सगळ्यावर मात करू. जीवनात सुख-दुख तर काय येत जात राहणारच ना? –

सुख-दुःख आये-जाये
सुखकी भूख न दुःखकी चिंता,
प्रीत जिसे अपनाये सुख-दुःख आये-जाये
मीराने पिया विषका प्याला,
विषको भी अमृत कर डाला
प्रेमका ढाई अक्षर पढ़कर
मस्त कबीरा गाये
सुख-दुःख आये-जाये…

मनोरमाच्या निरागस आणि परंपरा संभाळणाऱ्या मनाला वाटते तिने पुन्हा प्रेमात पडणे अयोग्य आहे, पाप आहे! आता मनात सुप्त असलेल्या भावभावना तशाच सुप्त राहू दिल्या पाहिजेत. त्यांना झोपेतून जागे करणे धोक्याचे आहे. भुंग्याने पुन्हा पुष्पवाटिकेत जावून जे फुल कोमेजले आहे त्यात जाणे, त्यात मध शोधणे चूक आहे. कारण त्या फुलातला मधू आता संपला आहे. आता ते मधू देणारे फुल राहिलेले नाही-

फैली-फूली फुलवारीमें भंवरा
गुन-गुन गुन-गुन गुन-गुन गुन-गुन गाये
काहे सोवत निंदिया जगाये
लाखोंमें किसी एक फूलने
लाखों फूल खिलाये, मंद-मंद मुस्काये
हाय काहे सोवत निंदिया जगाये
भंवरे तू कहना ना भूल,
फूल तेरा मधुर नहीं मधुकर…

देवधरचे प्रेम शारीरिक नाहीच. तो काही यौवनाचा मध चाखण्यासाठी मनोरमेजवळ आलेला भुंगा नाही. त्याचे तिच्यावर निस्सीम प्रेम आहे. म्हणून मग सुरेश वाडकरांच्या तोंडी नरेंद्र शर्माजींचे त्यांच्या नितळ, निर्मल हिंदीतले शब्द येतात –

भँवरे तू कहना ना भूल,
फूल मेरा सुन्दर, सरल, सुघड़
भँवरेने खिलाया……

केवळ ४० वर्षांपूर्वी अशा हळव्या प्रेमकथांवर लिहिले जाऊ शकत होते, सिनेमे निघत होते, लोक अशा कथांनी हळहळत होते. सतत खून, मारामाऱ्या, कारस्थाने, देशद्रोह, पोलीस, वासनांचे तांडव, युद्धे, दाखवून समाजमनात विष कालवणे म्हणजेच कलानिर्मिती असा समज रूढ होण्यापूर्वीच्या या काळात म्हणूनच एखादी सैर करून यायची. आपल्यातले शेष माणूसपण जपण्यासाठी!

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra.

Recent Posts

Horoscope : दोन दिवसांत ‘या’ राशीत येणार राजयोग; होणार धनलाभ!

पाहा तुमची रास आहे का यात? मुंबई : ज्योतिषशास्त्रानुसार, दोन दिवसांनंतर अत्यंत शुभ राजयोगाची निर्मिती…

14 mins ago

Mumbai Central Railway : प्रवाशांचा खोळंबा! मध्य रेल्वेवर पंधरा दिवसांचा ब्लॉक

काही ट्रेन्स रद्द, तर काही उशिराने, पाहा वेळापत्रक मुंबई : रेल्वेचा मेगा ब्लॉक म्हटलं की…

48 mins ago

LS Election : शिवतिर्थावर आज ‘मोदी-राज’ अवतरणार!

मुंबई : मुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार (LS Election) करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी,…

4 hours ago

Daily horoscope: दैनंदिन राशीभविष्य, शुक्रवार, दि १७ मे २०२४.

पंचांग आज मिती वैशाख शुद्ध नवमी ८.४८ पर्यंत नंतर दशमी शके १९४६. चंद्र नक्षत्र पूर्वा…

5 hours ago

मोदींच्या रोड शोमुळे मतदारांचा उत्साह शिगेला

देशभरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रेकाॅर्डब्रेक गर्दीच्या सभा होताना दिसतात; परंतु पंतप्रधान मोदी यांना जवळून…

8 hours ago

अवयवदान प्रबोधनाची चळवळ

कुमार कदम शरीरातील केवळ कोणता तरी महत्त्वाचा अवयव निकामी झाल्यामुळे मृत्यूशी निकराची झुंज देत असलेली…

8 hours ago