Categories: क्रीडा

पंजाब-दिल्लीसाठी ‘जिंकू किंवा मरू’

Share

मुंबई (प्रतिनिधी) :सातत्य राखण्यासाठी धडपडणारे दिल्ली कॅपिटल्स आणि पंजाब किंग्ज यांच्यातील सोमवारी आपापल्या प्ले-ऑफच्या आशा जिवंत ठेवण्यासाठी परस्परांवर मात करून स्वतःचा गुणतालिकेतील क्रमांक अधिक उंचावण्याचे लक्ष्य ठेवतील. दोन्ही संघांना चालू हंगामात आतापर्यंत सलग दोन सामने जिंकता आलेले नाहीत आणि अशात प्लेऑफसाठी “जिंकू किंवा मरू” असलेल्या या सामन्यात दोन्ही संघांना असा सामना गमावणे परवडणारे नाही. दोन्ही संघांना विजय आवश्यक आहे.

पंजाब १२ गुणांसह गुणतालिकेत सातव्या स्थानावर असून त्यांची निव्वळ धावगती +०.०२३ आहे. दिल्लीच्या संघाचेही १२ गुण आहेत; परंतु +०.२१० च्या चांगल्या निव्वळ धावगतीसह संघ पाचव्या स्थानावर आहे, ज्यामुळे दोन किंवा त्यापेक्षा अधिक संघांचे समान गुण असल्यास चांगल्या धावगतीचा फायदा त्यांना होऊ शकतो. मागील सामन्यात राजस्थान रॉयल्सवर आठ गडी राखून विजय मिळविल्यानंतर, दिल्ली कॅपिटल्स अधिक आत्मविश्वासाने स्पर्धेत उतरेल, तर पंजाब किंग्जने त्यांच्या मागील सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुचा पराभव केला आहे.

दिल्लीचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नर चांगलाच फॉर्ममध्ये असला तरी जोडीला दुसरा योग्य सलामीवीर न मिळणे संघासाठी चिंतेचा विषय आहे. पृथ्वी शॉच्या अनुपस्थितीत मनदीप सिंग आणि श्रीकर भरत यांनी निराशा केली आहे. मात्र, टायफॉइडमधून बरा झालेल्या पृथ्वीलाही चालू हंगामात अपेक्षेप्रमाणे कामगिरी झालेली नाही. त्याला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे, मात्र सोमवारी होणाऱ्या या महत्त्वाच्या सामन्यासाठी तो तंदुरुस्त होतो की नाही हे पाहावे लागेल. मात्र, गत सामन्यात धडाकेबाज कामगिरी करून मिचेल मार्श अखेर लयीत परतला आहे, ही दिल्लीसाठी दिलासादायक बाब आहे. या आक्रमक अष्टपैलू खेळाडूने रॉयल्सविरुद्ध अष्टपैलू कामगिरी केली असून संघाच्या यशात त्याची आणि वॉर्नरची भूमिका महत्त्वाची असेल. तसेच सर्वांच्या नजरा कर्णधार ऋषभ पंतवरही असतील. पंतने रॉयल्सविरुद्धच्या चार चेंडूंच्या खेळीत दोन षटकार ठोकले; परंतु आतापर्यंत हंगामात तो त्याच्या योग्य लयीत येऊन सामना जिंकवणारा डाव खेळू शकला नाही. रोव्हमन पॉवेलने चौकार आणि षटकार मारण्याची क्षमता दाखवली आहे आणि शीर्ष क्रमाच्या मदतीने तो संघासाठी सामने जिंकू शकतो हे दाखवून दिले आहे.

दुसरीकडे, पंजाबच्या गोलंदाजीचे नेतृत्व सध्याच्या हंगामातील सर्वात यशस्वी वेगवान गोलंदाज कागिसो रबाडाकडे आहे. अर्शदीप सिंगनेही पंजाबसाठी चांगली कामगिरी केली आहे. पण राहुल चहर महागात पडत आहे. गोलंदाज शार्दुल ठाकूर हा अत्यंत महागडा ठरत असून त्याला पुरेशा विकेटही मिळत नाहीत. जॉनी बेअरस्टो, लियाम लिव्हिंगस्टोन, शिखर धवन आणि भानुका राजपक्षे या फलंदाजांसमोर मात्र दिल्लीच्या गोलंदाजांचा कस लागेल. धवन हा पंजाबचा सर्वाधिक (४००) धावा करणारा खेळाडू आहे आणि या ‘जिंकू किंवा मरू’च्या सामन्यात संघाला त्याच्याकडून खूप अपेक्षा असतील. धवनसोबत डावाची सुरुवात करण्याची संधी मिळाल्यानंतर बेअरस्टोलाही गती मिळाली आहे आणि हीच संघासाठी मोठी सकारात्मक बाब आहे. तसेच मोठे फटके खेळण्याच्या क्षमता असणाऱ्या भानुका राजपक्षेला मात्र चांगल्या सुरुवातीचे मोठ्या डावात रूपांतर करावे लागेल, जेणेकरून संघाला विजयाचा मार्ग सोपा होईल.

सलामीची जागा सोडलेला कर्णधार मयंक अग्रवाल मधल्या फळीतही विशेष कमाल दाखवू शकला नाही. त्यामुळे अतिआवश्यक असलेल्या या सामन्यात कर्णधारपदाला साजेल अशी खेळी खेळण्यासाठी पंजाबचा कर्णधार मयंक आणि दिल्लीचा कर्णधार रिषभ पंतला यापेक्षा चांगली संधी मिळू शकणार नाही. तेव्हा पाहूया आज पंजाब आणि दिल्ली पैकी कोणता संघ हे युद्ध जिंकून प्लेऑफच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकून व आपला रनरेट सुधारून आपले स्थान गुणतालिकेत मजबूत करतोय.

ठिकाण : डी. वाय. पाटील स्टेडियम वेळ : रात्री ७.३० वाजता

Recent Posts

MI vs KKR: १२ वर्षांनी वानखेडेवर कोलकाताचा विजय

मुंबई: मुंबईच्या वानखेडे मैदानावर आज मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात सामना रंगला होता.…

1 hour ago

Narendra Modi : बंगालचे नाव तृणमुलमुळे खराब झाले!

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ममता सरकारवर हल्लाबोल कोलकाता : संदेशखालीमध्ये काय घडत आहे हे टीएमसीच्या नेत्यांना…

2 hours ago

Vinod Tawde : ‘आयेगा तो मोदीही’ ही भावना मतदार आणि विरोधकांमध्ये निर्माण करण्यात आम्ही यशस्वी!

पुण्यात विनोद तावडे यांचं वक्तव्य पुणे : एनडीए सरकारची (NDA) दहा वर्षाची कामगिरी आणि २०४७…

2 hours ago

Deep fake videos : निवडणुकीदरम्यान ‘डीप फेक’ रोखण्यासाठी कारवाई करण्याचे शासनाचे आदेश

मुंबई : लोकसभा निवडणुकीदरम्यान डीप फेक व्हिडिओज, क्लिप्स, फोटो किंवा इतर प्रकारचा कंटेंट तयार करून…

3 hours ago

Summer Fruits: ही फळे चुकूनही फ्रीजमध्ये ठेवू नका

मुंबई: आपण सर्व आठवडाभर फळे आणि भाज्या रेफ्रिजेटरमध्ये स्टोर करतात. मात्र काही फळे फ्रीजमध्ये ठेवल्याने…

4 hours ago

Amit Shah : इंडिया आघाडी म्हणजे औरंगजेब फॅन क्लब!

राममंदिराच्या विरोधकांसोबत उद्धव गेले; ते महाराष्ट्राचा गौरव काय सांभाळणार? रत्नागिरीतून अमित शाह यांचे टीकास्त्र रत्नागिरी…

5 hours ago