Friday, March 29, 2024
Homeसंपादकीयअग्रलेखमविआ मुंबईकरांना वेठीस का धरते?

मविआ मुंबईकरांना वेठीस का धरते?

सत्तेतून पायउतार झालेली महाविकास आघाडी पुन्हा एकदा ताकद दाखविण्याचा प्रयत्न छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावावरून करताना दिसत आहे. नागपूर येथे १९ डिसेंबरपासून हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे; परंतु शिंदे-फडणवीस सरकारला घेरण्यासाठी महाविकास आघाडीच्या वतीने काढण्यात येणारा महामोर्चा शनिवारी, १७ डिसेंबर रोजी मुंबईत काढण्याची घोषणा करण्यात आली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र फोडण्याचा डाव आखला जात आहे. सातत्याने महाराष्ट्राची अवहेलना केली जात आहे. फुटीरतेची बीजे इथे पेरली जात आहेत, गुजरात निवडणुकीसाठी महाराष्ट्राचे उद्योग पळवले. आता कर्नाटकची निवडणुकीसाठी महाराष्ट्राची गावं कर्नाटकला जोडणार का? असे सवाल उपस्थित करत महाविकास आघाडीच्या नेत्यांनी पत्रकार परिषद घेतली.

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यासह ज्या नेत्यांनी शिवाजी महाराजांबाबत बेताल वक्तव्य केली आहेत, त्याचा निषेध करण्यासाठी हा मोर्चा असल्याचे या पत्रकार परिषदेत सुरुवातीला सांगितले. भायखळा येथील जिजामाता उद्यान ते आझाद मैदान अशा या विराट महामोर्चाचा मार्ग असणार आहे. या तिन्ही पक्षांनी एकजूट दाखवण्याचे ठरवले असून त्याची जोरदार तयारी सध्या सुरू आहे. सर्वसाधारणपणे विधिमंडळाचे अधिवेशन जर मुंबईत असेल, आझाद मैदान या ठिकाणी मोर्चे, आंदोलने निघतात. ज्यावेळी वर्षातून एक अधिवेशन उपराजधानी नागपूर येथे असते. त्यावेळी सरकारचे लक्ष वेधण्यासाठी नागपूर या ठिकाणी मोर्चे, आंदोलने होत असतात. असे असताना हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर जर मोर्चा काढायचा होता, तर नागपुरात काढायला हवा होता.

मुंबईत आधीच ऐनकेनकारणाने वाहतुकीच्या कोंडीमुळे मुंबईकर त्रस्त झालेले आहेत. त्यात भायखळा ते आझाद मैदान हा मुख्य रहदारीचा रस्ता अडवून मुंबईकरांची गोची का करण्यात येत आहे. लोकशाही मूल्यांप्रमाणे जर सरकारविरोधात मोर्चा आणि आंदोलन करण्याचा अधिकार विरोधकांना असेल, तर ज्या ठिकाणी राज्याचे प्रश्न मांडले जाणार आहेत, त्याठिकाणी जो काही महाविराट मोर्चा काढण्याचे नियोजन विरोधकांनी करायला हवे होते. आधीच भायखळा येथून जे.जे. हॉस्पिटल, महमद अली रोडवरून पुढे आझाद मैदानाकडे जाणाऱ्या रस्त्यावरून रोज हजारो वाहने धावत असली तरी तो रस्ता दुपदरी आणि अरुंद आहे. त्यामुळे वाहनांच्या गर्दीत मोर्चा किती लांबलचक होता हे सांगायला मोकळे. यासाठी हे मोर्चाचे ठिकाण निवडले आहे का? असा प्रश्न निर्माण होतो. तसेच, मुंबईत मोर्चाकडून पब्लिसिटी मिळविण्याचा प्रयत्न असू शकतो.

राज्यपालांच्या वक्तव्यानंतर ठाकरे गटाने महाराष्ट्र बंद करण्याचा इशारा दिला होता; परंतु सेनेत दोन गट पडल्यानंतर स्वत:च्या ताकदीवर बंद करण्याची हिम्मत नसावी यासाठी सर्व शिवप्रेमींना एकत्र करण्याचा प्रयत्न ठाकरे गटाकडून करण्यात आला. त्याला म्हणावेसे यश आले नसावे म्हणून मुंबईत महामोर्चा काढण्याचा प्रयत्न ठाकरे गट, काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्या माध्यमातून केला जात आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून मोर्चाची घोषणा करताना, मुख्य टार्गेट राज्यपाल कोश्यारी यांना करण्यात आले असले तरी, या मोर्चाच्या निमित्ताने अन्य मागण्याही पुढे करण्यात आल्या आहेत. सत्ताधारी पक्षांच्या नेत्यांची महिला आणि अन्य नेत्यांविषयीची बेताल वक्तव्य आणि कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांचे सीमा प्रश्नावर वादग्रस्त वक्तव्य हे विषयही मोर्चामध्ये हाताळण्यात येणार आहेत. त्यामुळे आझाद मैदानावर काढण्यात येणारा मोर्चा हा केवळ छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी अपमानजनक वक्तव्याचा निषेध या खास कारणासाठी नाही, यावरून दिसून येते. महाराष्ट्राची अस्मिता, महापुरुषांचा इतिहास यावरून गप्पा मारून, विरोधकांची एकजूट टिकविण्यासाठी महाराजांच्या नावाचा केवळ राज्यातील विरोधकांकडून वापर करण्यात येत आहे का? याचा आता विचार करण्याची गरज आहे.

राज्यात शिंदे-फडणवीस यांचे सरकार आल्यानंतर राज्यातील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि ठाकरे गट प्रचंड अस्वस्थ आहे. त्यामुळे जनतेच्या मनात शिवाजी महाराज यांच्याबद्दल असलेल्या श्रद्धेचा राजकारणासाठी फायदा करून घेता येईल का? याचा विचार महाविकास आघाडीचे नेते करत असावेत. ऊठसूठ शिवाजी महाराजांचे नाव घेतले तरच आपल्याला महत्त्व देतील, असे वाटत असल्याने, आक्षेपार्ह विधानाचे निमित्त करून भाजपला कोंडीत पकडण्याची संधी महाविकास आघाडी पाहत आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली २०१४ साली निवडणूक लढवताना महाराष्ट्रात प्रचाराचा मुद्दा हा छत्रपती शिवाजी महाराज यांचा आशीर्वाद घेऊन महाराष्ट्र पुढे नेण्याचा होता.

काही नेत्यांकडून अनवधानाने चुकीची वक्तव्ये केली असली तरी, त्या वक्तव्याशी सहमत नसल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी वारंवार स्पष्ट करून सुद्धा भाजपला टीकेचे धनी करण्याचा प्रयत्न विरोधक करत असतील. तरीही महाराष्ट्रातील सुजाण नागरिक या टीकेकडे लक्ष देणार नाहीत. राज्यातील १३ कोटी जनतेला आता महापुरुषांच्या अवमानाचे मुद्दे काढून कोण राजकारण करत आहे? हे कळून चुकले आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -