Friday, April 19, 2024
Homeकोकणरायगडरस्ते होणार कधी

रस्ते होणार कधी

१० वर्षांपासून ना खडीकरण, ना डांबरीकरण

पूल बांधला, पण उपयोग काय, सार्वजनिक बांधकामाचे दुर्लक्ष

नेरळ (वार्ताहर) : कर्जत तालुक्यातील चिल्लार नदीवर बांधण्यात आलेल्या पुलाच्या दोन्ही बाजूला शासनाने येण्या-जाण्यासाठी रस्ता बनविलेला नाही. त्यामुळे एक कोटी रुपये खर्चून पूल बांधला, मात्र त्या पुलाचा काहीही उपयोग दोन्ही बाजूने जोडणारे रस्ते बनविले नसल्याने होत नाही. दरम्यान, या पुलालाल जोडणाऱ्या रस्त्याचे काम शासनाने करावे आणि वाहनचालकांसाठी पर्यायी मार्ग उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.

चिल्लार नदीवर पूल नव्हता त्यावेळी पिंपळोली, कोलिवली तसेच त्या भागातील लोक पावसाळ्यात नदी पार करण्यासाठी होडीचा वापर करीत होते. वर्षानुवर्षे पिंपळोली – कोलिवली दरम्यान होडीवरून पावसाळ्यात चार महिने प्रवास सुरु होता. मात्र ऑगस्ट २००७ मध्ये पिंपळोली गावातील महिलांना घेऊन चाललेली होडी कलंडली आणि त्यामध्ये दहा जण वाहून गेले होते. त्या होडी दुर्घटनेत नऊ महिलांना जलसमाधी मिळाली होती. त्यावेळी तत्कालीन पालकमंत्री सुनील तटकरे यांनी दुसऱ्या दिवशी घटनास्थळी आल्यानंतर चिल्लार नदीवर पूल बांधण्यात येईल असे जाहीर केले. त्यानंतर दीड वर्षांत त्या ठिकाणी नवीन पुलाची निर्मिती झाली आणि जानेवारी २०११ पासून चिल्लार नदी पार करण्यासाठी पुलाचा उपयोग सुरु झाला.

त्यावेळी कोलिवली येथे नेरळ – कशेळे रस्ता जोडणारा रस्ता तसेच नेरळ-गुडवण असा पिंपळोली गावाला जोडणारा रस्ता बनविण्यात येणार होता. मात्र आजतागात त्या रस्त्यावर ना खडी टाकली ना डांबर. पुलावरून लोकांची ये-जा सुरू होऊन आज १० वर्षे लोटली. कोलिवली तसेच पिंपळोली गावाला जोडणारा रस्ता शासनाने बनवून दिला नाही. त्यामुळे एक कोटी रुपये खर्चून बांधलेल्या पुलाचा फायदा काय? असा प्रश्न स्थानिक कार्यकर्ते आणि होडी दुर्घटनेत आपले वडील गमावलेले हरेश सोनावळे या तरुणाने केला आहे. हरेश सोनावळे यांनी दोन्ही बाजूचा रस्ता खडीकरण आणि डांबरीकरण करून व्हावा यासाठी अनके वर्षे प्रयत्न केला आहे.

मात्र सार्वजनिक बांधकाम विभाग त्या रस्त्याकडे पाहायला तयार नाही. कोलिवली येथून चिल्लार नदीवरील पूल ते नेरळ- गुडवण रस्त्याला जोडणारा रस्ता तयार झाल्यास पुलाचा उपयोग पर्यायी रस्ता म्हणून होऊ शकतो. मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाने पुलाची निर्मिती केली, मात्र १० वर्षात त्या पुलाच्या दोन्ही बाजू जोडणारे रस्ते आजपर्यंत केले नाहीत. रस्ता व्हावा आणि वाहतूक सुरु व्हावी यासाठी पिंपळोली, कोलिवली ग्रामस्थ यांच्यासाठी हा पूल महत्वाचा असून शासन त्याकडे लक्ष देणार आहे काय? असा प्रश्न हरेश सोनावळेने शासनाला विचारला आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -