Earth : पृथ्वीचे फिरणे थांबले तर…?

Share
  • मिलिंद बेंडाळे, पर्यावरण अभ्यासक

पृथ्वीचे वाढते तापमान किती धोकादायक ठरू शकते, हे या ना त्या स्वरूपात आपल्यापर्यंत पोहोचले आहे. सध्याची स्थिती ही भीती वा दहशत वाढवणारी आहे. मात्र वाढत्या तापमानामुळे आगामी काळात मोठ्या समस्या निर्माण होऊ शकतात. वातावरणातील बदलामुळे पृथ्वीच्या फिरण्याच्या गतीवर परिणाम होत आहे. त्यामुळेच भविष्यात जागतिक घडाळ्यांची वेळ ठरवताना काही बदलही होताना दिसू शकतात.

पृथ्वीचे वाढते तापमान हा जागतिक पातळीवरील चिंतेचा विषय असून प्रत्येक देश कोणत्या ना कोणत्या प्रकारे याचे परिणाम भोगत आहे. वाढत्या तापमानाच्या परिणामस्वरुप ग्रीनलँड आणि अंटार्क्टिकामध्ये बर्फ वेगाने वितळत आहे. परिणामी, समुद्राची पातळी दिवसेंदिवस वाढत आहे. बर्फ वितळल्यामुळे आणि पाण्याच्या पातळीत वाढ झाल्यामुळे पृथ्वीच्या फिरण्याचा वेग थोडा कमी होत आहे. ‘नेचर’ या जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासात म्हटले आहे की जागतिक तापमानवाढीमुळे आधीच जागतिक टाइमकिपिंगवर परिणाम होत आहे. ‘कोऑर्डिनेटेड युनिव्हर्सल टाइम’ (यूटीसी)चा वापर जगभरातील घड्याळांची वेळ ठरवण्यासाठी केला जातो. ‘यूटीसी’ पृथ्वीच्या फिरण्याच्या गतीवर ठरवली जाते. अर्थातच पृथ्वीच्या परिभ्रमणाचा वेग स्थिर नाही. त्यामुळे त्याचा थेट परिणाम आपल्या दिवस आणि रात्रीच्या लांबीवर होऊ शकतो. पृथ्वीच्या परिभ्रमणाचा वेग मंदावला तर दिवस मोठा होऊ शकतो.

‘ग्लोबल टाइमकीपर्स’नी १९७० पासून जागतिक घड्याळात २७ लीप सेकंद जोडले आहेत. तथापि, आता प्रथमच टाइमकीपर्स २०२६ मध्ये जागतिक घड्याळ एका सेकंदाने कमी करण्याचा विचार करत आहेत. या घटनेला ‘निगेटिव्ह लीप सेकंड’ म्हणतात. तज्ज्ञांच्या मते, आजपर्यंत ‘निगेटिव्ह लीप सेकंड’चा वापर कधीही झालेला नाही. धोक्याची बाब म्हणजे त्याचा वापर जगभरातील संगणक प्रणालींसाठी अभूतपूर्व समस्या निर्माण करेल. यासंबंधी बोलताना कॅलिफोर्निया विद्यापीठातील संशोधक डंकन ऍग्नयू म्हणतात, ‘याआधी कधीच असे घडले नव्हते. जागतिक ‘टायमिंग इन्फ्रास्ट्रक्चर’चे सर्व भाग जगभरात समान वेळ दाखवतात की नाही याची खात्री करणे हे एक मोठे आव्हान आहे. वर उल्लेख केलेली घटना घडल्यास त्यांचे कोडिंग नव्याने करावे लागेल.’

आधी उल्लेख केल्याप्रमाणे जगातील वाढत्या तापमानाचा थेट परिणाम ग्रीनलँड आणि अंटार्क्टिकावर तीव्रतेने होत आहे. याबाबतचा नुकताच प्रसिद्ध झालेला अभ्यास धक्कादायक आहे. पृथ्वीच्या फिरण्याच्या गतीवर याचा परिणाम होणे ही अत्यंत चिंतेची बाब समजली जात आहे. संशोधक डंकन ऍग्नयू म्हणतात त्याप्रमाणे पृथ्वी नेहमी एकाच वेगाने फिरत नसल्यामुळे ‘युनिव्हर्सल टाईम’वर परिणाम दिसून येतो. तसे पाहिले तर १९७२ पासून जगभर वेळोवेळी लीप सेकंद जोडण्याची गरज भासू लागली आहे. याचे कारण संगणकीय आणि वित्तीय बाजारपेठेतील नेटवर्कशी संबंधित व्यवहारांमध्ये अचूक वेळेची आवश्यकता असते. पृथ्वीच्या परिभ्रमणातील नुकसानाची भरपाई करण्यासाठी आणि ‘यूटीसी’ला सौर वेळेसह संक्रमित ठेवण्यासाठी एक मध्यांतर सेकंद जोडला जातो. अमेरिकेच्या कॅलिफोर्निया विद्यापीठातील संशोधक डंकन ऍग्नयू यांचे हे संशोधन सध्या जागतिक पातळीवर चर्चेचा विषय बनले आहे.

अर्थात पृथ्वीच्या फिरण्याचा वेग वाढला तरी २०२९ पर्यंत लीप सेकंद कमी करण्याची गरज भासणार नाही, असेही काही तज्ज्ञ सांगतात. मात्र बर्फाचे वितळणे असेच सुरू राहिल्यास परिस्थिती बिकट होईल, यात शंका नाही. ‘ग्लोबल वॉर्मिंग’मुळे केवळ अंटार्क्टिकाचा बर्फ वितळत नाही, तर हा धोका अन्य अनेक ठिकाणी जाणवत आहे. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की बर्फ इतक्या वेगाने वितळत असल्यामुळे समुद्रातील पाण्याचा प्रवाह कमी होताना दिसत आहे. स्थिती अशीच राहिल्यास जगभरातील जलस्रोतांमध्ये ऑक्सिजनची कमतरता भासेल. ‘नेचर’ जर्नलमध्ये प्रकाशित एका संशोधनात म्हटले आहे की, बर्फ जास्त वितळला तर अंटार्क्टिकाचे पाणी कमी खारट आणि अधिक तरल होईल. यामुळे खोल समुद्रातील प्रवाह कमी होईल. समुद्रातील प्रवाह कमी झाल्यास चार हजार मीटरपेक्षा खोल भागात पाण्याचा प्रवाह थांबेल आणि दलदलीसारखी परिस्थिती निर्माण होईल. त्यामुळे सागरी जीवनावर अत्यंत विपरीत परिणाम होणार आहे. पाण्यातील ऑक्सिजन कमी झाल्यामुळे पोषक तत्वांची कमतरता भासते. परिणामी, पाण्यातील कार्बन डायऑक्साइडचे प्रमाण वाढेल.

हे सगळे लक्षात घेता सध्या जगभर एक प्रकारची सतर्कतेची स्थिती आहे, असे म्हणावे लागेल.
जागतिक तापमानवाढीच्या वाढत्या नकारात्मक परिणामांबद्दल जगभरातील शास्त्रज्ञांनी आधीच चिंता व्यक्त केली आहे. याबाबत अभ्यास करणारे संशोधक ऍग्नयू हे कॅलिफोर्निया विद्यापीठातील ‘स्क्रिप्स इन्स्टिट्यूशन ऑफ ओशनोग्राफी’ येथे भूभौतिकशास्त्रज्ञ म्हणून कार्यरत आहेत. ग्लोबल वॉर्मिंग आणि ग्लोबल टाइम यांचा अतूट संबंध आणि त्याचे भविष्यातील परिणाम हा त्यांच्या अभ्यासाचा विषय आहे. पृथ्वी दर २३ तास ५६ मिनिटे आणि चार सेकंदांनी सूर्याभोवतीची एक प्रदक्षिणा पूर्ण करते. तिचा फिरण्याचा वेग ताशी १,६७४ किलोमीटर इतका आहे. हा वेग एखाद्या लढाऊ विमानाएवढा आहे; पण पृथ्वीचा आकार एवढा मोठा आहे की आपण हे परिभ्रमण अनुभवू वा शोधू शकत नाही. अर्थात अंतराळ स्थानके किंवा उपग्रहांद्वारे पृथ्वीचे परिभ्रमण पाहिले जाऊ शकते. असे असताना कोणत्याही विपरीत परिस्थितीच्या परिणामस्वरूप पृथ्वीचे फिरणे थांबले, तर दृश्य किती भयानक असेल याचा विचार करणेही अशक्य आहे. हे सर्व अचानक घडले तर जगाला मोठा धक्का बसेल. पृथ्वीचे फिरणे कायमचे थांबले तर पृथ्वीच्या एका भागात दिवस आणि दुसऱ्या भागात रात्र असेल. यामुळे एका भागाचे तापमान वाढेल आणि दुसऱ्या भागात थंडी वाढेल. याचा आणखी एक गंभीर परिणाम म्हणजे पृथ्वीचे चुंबकीय क्षेत्र संपेल. यामुळे अंतराळातून येणारे रेडिएशन थेट पृथ्वीवर पोहोचेल. सहाजिकच जगभरात अनेक आजार पसरू लागतील.

तंत्रज्ञानामुळे वेगाने विकसित होत असणाऱ्या आजच्या जगात कार्बन उत्सर्जन मानवी अस्तित्वासाठी सततचा धोका बनत आहे. त्याचे वैशिष्ट्य संयुक्त राष्ट्रांच्या एका अहवालातही समोर आले आहे. त्यात २०१४ ते २०२३ दरम्यानचा काळ सर्वात उष्ण दशक असल्याचा दावा करण्यात आला आहे. मध्यंतरीच संयुक्त राष्ट्रांच्या जागतिक हवामान संघटनेने (डब्ल्यूएमओ) आपला वार्षिक हवामान स्थिती अहवाल प्रसिद्ध केला. आकडेवारीचा हवाला देत त्यात म्हटले आहे की २०२३ हे आतापर्यंतचे सर्वात उष्ण वर्ष होते. २०१४ ते २०२३ हा काळ सर्वात उष्ण दशक म्हणून नोंदवला गेला आहे. या दहा वर्षांमध्ये महासागरांवर उष्णतेच्या लाटांचा परिणाम झाला. जागतिक हवामान संघटनेच्या अहवालावर संयुक्त राष्ट्र प्रमुख अँटोनियो गुटेरेस यांनी चिंता व्यक्त केली आहे. ते म्हणाले की, या अहवालावरून आपली पृथ्वी नामशेष होण्याच्या मार्गावर असल्याचे दिसून येते. आपला ग्रह संकटाची चिन्हे दाखवत आहे. जीवाश्म इंधन प्रदूषण चार्ट हवामानातील बदलाने सजीवांचे किती नुकसान होत आहे, हे दर्शवतो. पृथ्वीवर किती वेगाने बदल होत आहेत याचा हा इशारा आहे. एक प्रकारे हा अहवाल जगासाठी ‘रेड अलर्ट’ आहे. उष्णतेचे रेकॉर्ड पुन्हा एकदा मोडले गेले, तर परिस्थिती हाताबाहेर जाण्यास फारसा वेळ लागणार नाही.

वाढत्या तापमानाने विशेषतः महासागरांमध्ये उष्णतेच्या लाटा वाढल्या आहेत. हिमनद्या वितळल्या आणि मागे सरकल्या आहेत. अंटार्क्टिक महासागराच्या बर्फाचे पाणी चिंतेचा विषय ठरत आहे. १९५० मध्ये नोंदी सुरू झाल्यापासून जगभरातील प्रमुख हिमनद्यांमधील बर्फाचे सर्वाधिक नुकसान झाले आहे, हे दिसते. विशेषतः पश्चिम उत्तर अमेरिका आणि युरोपमध्ये परिस्थिती अधिक बिघडली आहे. एल निनोचा प्रभाव २०२३-२४ मध्ये सर्वोच्च स्तरावर पोहोचला आहे. येत्या काही महिन्यांमध्ये जागतिक हवामानावर याचा परिणाम होताना दिसेल. मार्च ते मे दरम्यान जवळजवळ सर्व भूभागांमध्ये तापमान सामान्यपेक्षा जास्त राहण्याची शक्यता व्यक्त केली होती. सध्याची स्थिती या अपेक्षेच्या जवळ जाणारी आहे. सध्या ‘एल निनो’च्या प्रभावामुळे जगभरात विक्रमी तापमान अनुभवायला मिळत असून अनेक गंभीर घटना बघायला मिळत आहेत.

यंदा जानेवारीमध्ये जागतिक सरासरी तापमानाने प्रथमच १.५ अंश सेल्सिअसचा उंबरठा ओलांडला आहे. मे पर्यंत अल निनोचा प्रभाव कायम राहण्याची शक्यता सुमारे ६० टक्के आहे. त्यामुळे २०२४ हे सर्वात उष्ण वर्ष ठरू शकते. त्यात म्हटले आहे की वर्षाच्या अखेरीस ‘ला-निना’ विकसित होण्याची शक्यता आहे. असे झाले तर चांगला पाऊस होईल. भारतातील ‘ला-नीना’चे बारकाईने निरीक्षण करणाऱ्या शास्त्रज्ञांनी म्हटले आहे की जून-ऑगस्टपर्यंत ‘ला निना’ची स्थिती निर्माण झाल्यास २०२३ च्या तुलनेत या वर्षी मॉन्सून चांगला असेल. भारतासाठी ही निश्चितच दिलासादायक बाब म्हणावी लागेल.

Tags: earth

Recent Posts

मतदानाचा टक्का घसरला; कोण जबाबदार?

मुंबईत जे घडतं, त्याची चर्चा देशभर होते. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत देशाच्या कानाकोपऱ्यांतून लोक…

2 hours ago

नेहमी खोटे बोलणारे लोक! काय आहे मानस शास्त्रीय कारण?

फॅमिली काऊन्सलिंग: मीनाक्षी जगदाळे काही लोकांना सतत खोटं बोलण्याची सवय असते. छोट्या-छोट्या गोष्टींवरून अनेकदा सातत्याने…

3 hours ago

घोषणा आणि वल्गना…

इंडिया कॉलिंग: डॉ. सुकृत खांडेकर लोकसभा निवडणुकीच्या मतदानाचे पाच टप्पे पूर्ण झालेत. मुंबईसह महाराष्ट्रात सर्व…

4 hours ago

IPL 2024: अय्यरच्या जोडीचा धमाका, कोलकाता आयपीएलच्या फायनलमध्ये

मुंबई: कोलकाता नाईट रायडर्सची अय्यर जोडीने कमाल केली. कोलकाता नाईट रायडर्सने हैदराबादला हरवत दिमाखात आयपीएलच्या…

5 hours ago

Reel बनवण्याच्या नादात तरूणाने १०० फूट उंचावरून पाण्यात मारली उडी, झाला मृत्यू

मुंबई: झारखंडच्या साहिबगंज जिल्ह्यातून हैराणजनक बातमी समोर आली आहे. येथे रील बनवण्याच्या नादात तरुणाने १००…

6 hours ago

मुंबईतील मतदान प्रक्रियेच्या ढिसाळ कारभाराची उच्चस्तरीय चौकशी करणार

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात मुंबईतील अनेक मतदान केंद्रावर मतदार याद्यांमध्ये मतदारांची नावे नसल्याचे…

7 hours ago