Share

अनुराधा परब

एखादं नांदतं गाव तीन-चार दिवसांसाठी आहे त्या ठिकाणाहून एकदम गायब होतं. कालपर्यंत जिथल्या एसटी थांब्यावर, तिठ्यावर, चौकामध्ये स्थानिक प्रवाशांची, गावकऱ्यांची लगबग होती ती अचानक दिसेनाशी होते. नवख्यांसाठी हे सगळंच आक्रीत असतं. इथे दिसणारा माणसांचा राबता असा कुठे गायब झाला? याबद्दल कुतूहलमिश्रित आश्चर्य त्यांच्या मनात पर्यायाने चेहऱ्यावर उमटतं. या कुतूहलाच्या खोलात जायचा जेव्हा प्रयत्न होतो त्यावेळी कळतं की, गावपळणीमुळे सगळं गावच निर्मनुष्य झालं आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या मालवण तालुक्यातील वायंगणी, चिंदर, आचरे आणि मुणगे या गावांमध्ये दर तीन किंवा चार वर्षांनी ही गावपळण साजरी होते. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे गावपळण हे आगळे वैशिष्ट्य आहे. अशा प्रकारची परंपरा महाराष्ट्रामध्ये तरी अन्य कुठे पाहायला, अनुभवायला मिळत नाही. या गावपळणीदरम्यान सारा गाव संपूर्ण कुटुंबकबिल्यासह अगदी जनावरांसह तीन दिवसांकरिता गावच्या वेशीबाहेर वस्तीला राहायला जातो. या तीन दिवसांत सगळा नांदता गाव ओस पडतो. संपूर्ण गावात त्या काळामध्ये कुणीही फिरकत नाही. हे का घडतं?, याची कारणं या स्वरूपाच्या परंपरा निर्माणकर्त्या पूर्वजांच्या उदात्त हेतूमध्ये दडलेली आहेत, असे लक्षात येईल. जनमनातील श्रद्धेच्या धाग्याला शास्त्रीय विचारांची जोड देऊन गावपळणीची परंपरा साकारली गेली. समाजाचे स्वास्थ्य, पर्यावरणाचे शुद्धीकरण आणि गावाचे सामूहिक ऐक्य असा तीन हेतूंचा मेळ त्यामागे असावा, असा कयास आहे. या परंपरेविषयी आचरे गावामध्ये दंतकथाही सांगितली जाते.

गावाचे दैवत आणि सत्ताकेंद्र शिवशंकर अर्थात रामेश्वराने आपल्या भूतगणांना वावरण्यासाठी चार वर्षांतून एकदा तीन वा चार दिवस दिले. तसेच “हा गाव पूर्वी नांदत नव्हता. तो नांदावा याकरिता तीन दिवस गाव ओस पाडेन”, असे वचन लोकांना रामेश्वराने दिले. त्यानुसार फार पूर्वीपासूनच दर तीन-चार वर्षांनी संपूर्ण गाव तीन दिवसांकरिता ओस पाडण्याची प्रथा गावपळणीच्या रूपाने सुरू झाली. गाव गुण्यागोविंदाने नांदावा यासाठी तीन दिवस वर्षानुवर्षे वाढवलेल्या घरसंसाराकडे पाठ फिरवायची ही गोष्ट नक्कीच सोपी नाही म्हाराजा. या गावपळणीच्या रूपाने तीन दिवसांत जे जीवनशिक्षणाचे तत्त्वज्ञान कळतं ते कोणत्याही अन्य ठिकाणाहून मिळणार नाही, असे जुनेजाणते सांगतात. एखादे गाव काही कारणास्तव काही काळासाठी का होईना; परंतु पळून जाते, हे रंजक वाटत असलं तरीही त्यामागची कुतूहलाची भावना परंपरेच्या निर्मिती हेतूमागील कारणांचा शोध घ्यायला प्रवृत्त करते. गावपळण शब्दामागील अर्थ समजला तरीही त्यामागील सांस्कृतिक कारण समजण्याकरिता वरील कथा उपयोगी पडते. मात्र हे आणि एवढेच कारण त्या परंपरेच्या निर्मितीमागे असेल का? की त्याहूनही अधिक काहीतरी सामाजिक आरोग्याच्या, पर्यावरणाच्या दृष्टीने तसेच लोकहिताच्या दृष्टीने महत्त्वाचे असेल?, याचा मागोवा घ्यायला उद्युक्त करते. गावपळणीच्या अनुसरणातून दर तीन वर्षांनी गावामध्ये पसरलेली रोगराई, दूषितपणा, वातावरणातील हवेची खालावलेली गुणवत्ता यांत सुधारणा होण्याबरोबरच समाजामध्ये सलोखा, ऐक्य पुनर्स्थापित व्हावे, दुरावलेली नाती-माणसे परत एकत्र यावीत, सामाजिक स्वास्थ्याबरोबरच सामूहिक सहजीवनाची लोकभावना वाढीला लागावी, ही कारणे असणे अधिक संयुक्तिक वाटते. त्यामुळे गावपळण ही फक्त सांस्कृतिक परंपरा न राहता जिल्ह्याची ती एक आगळी विशुद्ध ओळख ठरते.

आचऱ्यातील गावपळण ही साधारणपणे मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेपासून ते मार्गशीर्ष पौर्णिमेपर्यंतच्या काळात दर तीन किंवा चार वर्षांनी होते. तीन किंवा चार वर्षांनी येणाऱ्या गावपळणीची तयारी ही मार्गशीर्षा आधीपासूनच सुरू झालेली असते. तीन दिवस राहण्यासाठी जागा पाहून ठेवलेल्या असतात. नोकरीधंद्यानिमित्ताने घराबाहेर गेलेल्यांना बोलावणी धाडली जातात. या तीन दिवसांत दूर गेलेल्या नि दुरावलेल्या सर्वांसोबत मनभरून जगण्यासाठी प्रत्येकजण आसुसलेला असतो. आचऱ्यातील बारा वाड्यांचा गाव रिकामा करण्यासाठी तसेच पुन्हा भरण्यासाठीही रामेश्वराकडे कौल मागितला जातो. असा कौल मिळाल्यानंतर गावाबाहेरच्या वेशीनजीकच्या जंगलात माडाच्या झापांनी बांधलेल्या कावणामध्ये गाव तीन दिवसांकरिता राहायला जातो. गजाली, चेष्टामस्करी यांना उधाण येतं, एकत्र जेवणे, बकऱ्या-कोंबड्यांच्या झुंजी लावणं, विविध खेळ, भजनादी करमणुकीचे कार्यक्रम यांत सहभागी होत वाडीवस्तीवरील लहान-थोर, स्त्री-पुरुष सर्वच अक्षरशः गावपळणीचे हे तीन दिवस खऱ्या अर्थाने जगतात. मुणगे गावातील काही समाजच फक्त गावपळणीची प्रथा पाळतात. देवाचा कौल मिळाल्यानंतर साजऱ्या होणाऱ्या या परंपरेला अनुभवण्याची सिंधुदुर्गातीलच नाही, तर या प्रथेविषयी उत्सुकता असणारेही लोकही वाट पाहत असतात. हे तीन दिवस आणि त्यानंतरचेही काही दिवस चैतन्याने वाहणारे असतात. आचरे, चिंदर या गावांची गावपळण अनुभवलेली माणसे, तर नेहमीच इतरांना ‘एकदा तरी गावपळण अनुभवायला येण्याचे’ आवतण देतात, इतका त्याचा बोलबाला आताशा झालेला आहे. लेखक सुरेश ठाकूर यांनी त्यांच्या पुस्तकात आचरे पारवाडीच्या शेतकऱ्याचे कवन प्रसिद्ध केले आहे.

“अशी आमची गावपळान
ऱ्हवाक झापाचा कावान
भुकेक माशाचा जेवान
तानेक पेजेचा धुवान
थंड्येक इड्येचा खुटान
निजेक गोणपाटाचा किंतान
असा तीन दिवस भायर मजेत ऱ्हवान
घराक जावचा नदीतसून पेवान…”

लोकपरंपरा अस्तित्वात येण्यामागे नक्कीच कार्यकारणभाव लपलेला असतो. श्रद्धा-अंधश्रद्धा अशा चष्म्यातून त्याकडे पाहण्याऐवजी त्यापलीकडच्या कारणांचा शोध घेताना अनेकविध पर्यायांचे मार्ग कधी समोर दिसतात, तर कधी एखादाच नामी उपाय त्याला पुरेसा ठरतो. हे पर्याय स्वीकारताना किंवा उपायांची अंमलबजावणी करताना त्याद्वारे सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक हित राखले जाईल, याचाही विचार कुठे तरी फार पूर्वीच करून ठेवल्याचे लक्षात येते. अन्यथा, या परंपरा इतका प्रदीर्घ काळ आपले मूळ रूप तसेच ठेवून कालौघात बाह्यतः बदलल्या तरीही अव्याहतपणे टिकल्या नसत्या. त्या परंपरांच्या रुजण्यातच याची गुपिते दडलेली आहेत. सिंधुदुर्गातल्या गावपळणीची परंपरा ही त्यापैकीच एक.

Recent Posts

‘आरटीई’अंतर्गत शाळा प्रवेशाची प्रक्रिया मुंबईत सुरू

मुंबई : शैक्षणिक वर्ष २०२४-२०२५ साठी ‘शिक्षण हक्क अधिनियम’ अर्थात ‘आरटीई’अंतर्गत २५ टक्के आरक्षित जागांसाठीच्या…

10 mins ago

मलाच मुख्यमंत्री बनवा अन्यथा मातोश्रीतले बिंग फोडेन!

संजय राऊत यांनाच मुख्यमंत्री व्हायचे होते, त्यासाठी उद्धव ठाकरेंना ब्लॅकमेल केल्याचा आमदार नितेश राणे यांचा…

1 hour ago

Lok Sabha Election : राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत चेंगराचेंगरी

दोन्ही नेते भाषण न करता निघून गेले फुलपूर : लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election) पार्श्वभूमीवर…

2 hours ago

Cloudburst : अरे बाप रे! मे महिन्यात इतका पाऊस कसा झाला? हवामान विभागालाही पडला प्रश्न

चिपळूणात ढगफुटी, अडरे गावात अर्ध्या तासात रेकॉर्डब्रेक पाऊस, नद्या दुथडी भरुन वाहू लागल्या चिपळूण :…

2 hours ago

काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची जननी

काँग्रेस आणि झामुमो यांनी झारखंडला लुटण्याची एकही संधी सोडली नाही पंतप्रधान मोदींनी विरोधकांना झोडपले! जमशेदपूर…

2 hours ago

पतंजलीच्या उत्पादनाचा दर्जा निकृष्ट! सोनपापडी गुणवत्ता चाचणीत फेल, तिघांना तुरुंगवास

नवी दिल्ली : फसव्या जाहिरातींप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या दणक्यामुळे पतंजली कंपनीचे संस्थापक रामदेव बाबा आणि बाळकृष्ण…

2 hours ago