उत्तर प्रदेश गांधी परिवारमुक्त!

Share

इंडिया कॉलिंग: डॉ. सुकृत खांडेकर

सोनिया गांधी यांनी राजस्थानमधून राज्यसभेवर निवडून जाण्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल केल्यामुळे त्या आता २०२४ ची लोकसभा निवडणूक लढणार नाहीत, हे स्पष्ट झाले आहे. पंडित जवाहरलाल नेहरू, फिरोज खान (इंदिरा गांधींचे पती), इंदिरा गांधी, त्यांचे पुत्र संजय गांधी, तसेच राजीव गांधी, सोनिया गांधी व त्यांचे पुत्र राहुल गांधी अशा सर्वांनाच उत्तर प्रदेशने एकदा नव्हे, तर अनेकदा संसदेवर खासदार म्हणून निवडून पाठवले.

उत्तर प्रदेश म्हणजे आपल्या परिवाराचे गृहराज्य आहे, अशा मानसिकतेतून नेहरू-गांधी परिवार कधी बाहेर पडला नाही. ज्या परंपरागत मतदारसंघातून हा परिवार सातत्याने संसदेवर निवडून आला, केंद्रात वर्षानुवर्षे सत्ता उपभोगली, त्या राज्याचा आणि मतदारसंघाचा सार्वांगीण विकास करण्यासाठी गांधी परिवाराने कधीही ठोस पावले उचलली नाहीत. रायबरेली, अमेठीच्या मतदारांना गृहीत धरूनच गांधी परिवाराने वर्षानुवर्षे राजकारण केले. पण राज्यात योगी आणि केंद्रात मोदी यांचे सरकार आल्यापासून गांधी परिवाराची उत्तर प्रदेशवरील पकड निसटू लागली आणि निवडणुकीच्या राजकारणातून आपला गाशा गुंडाळण्याची वेळ गांधी परिवारावर आली.

देशाला सर्वाधिक पंतप्रधान उत्तर प्रदेशने दिले आहेत. पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी व राजीव गांधी हे तिघेही हयात नाहीत, पण त्यांना देशाचे पंतप्रधानपदावर बसण्याचे भाग्य या राज्यामुळे लाभले. गांधी परिवाराची दिल्लीच्या तख्ताकडे जाण्याची सुरुवात उत्तर प्रदेशमधून झाली आणि त्याच राज्याचा आता निरोप घेण्याची पाळी गांधी परिवारावर आली आहे. निवडणुकीच्या राजकारणात जय-पराजय होतच असतात, पण गांधी परिवाराने उत्तर प्रदेशातून कधी पळ काढला नव्हता. अपवाद मात्र राहुल गांधी यांचा म्हणावा लागेल. त्यांचा अमेठीतून पराभव झाल्यावर त्यांनी केरळमधील वायनाड मतदारसंघ निवडला. ज्या उत्तर प्रदेशवर काँग्रेसने अनेक वर्षे सत्ता उपभोगली, ते राज्य आता गांधी परिवारमुक्त होत आहे.

राजकारणात भविष्यात काय होईल, हे कधीच कोणी सांगू शकत नाही. सन २०१९ मध्ये राहुल गांधी यांचा अमेठी मतदारसंघात पराभव झाला व ते निवडणूक लढवायला केरळला निघून गेले. सोनिया गांधी यांना रायबरेलीच्या मतदारांनी निवडून दिले, तरी त्यांनी त्यांच्याकडे पाठ फिरवून आता राजस्थानमधून राज्यसभेवर जाण्याचा मार्ग निश्चित केला आहे. सोनिया गांधींनी आपल्या प्रकृतीच्या कारणास्तव निवडणूक न लढवता राज्यसभेवर जाण्याचा निर्णय घेतला हे एकवेळ समजता येईल, पण त्यांनी असा निर्णय घेण्यापूर्वी मतदारांना विश्वासात घ्यायला नको का? वर्षानुवर्षे मतदारांना गृहीत धरून निवडणूक लढवली. आताही लोकसभा न लढविण्याचा निर्णय घेताना त्यांनी मतदारांना गृहीत धरले आहे. मतदारसंघात जाऊन लोकांपुढे त्यांनी आपला निर्णय का सांगू नये ? रायबरेलीतून २०२४ ची निवडणूक प्रियंका वड्रा लढवणार अशा बातम्याही प्रसिद्ध झाल्या, पण त्याचा काँग्रेस पक्षाने झटपट इन्कारही केला.

सोनिया गांधी यांनी काही राजकारणातून संन्यास घेतलेला नाही. प्रकृतीचे कारण सांगून त्या लोकसभेची निवडणूक न लढवता राज्यसभेवर जाणार आहेत. २०१९ मध्ये अमेठीतून राहुल गांधी यांचा भाजपाच्या स्मृती इराणी यांनी पराभव केला. गांधी घराण्यातील नेत्याचा असा पराभव होणे ही त्यांना व काँग्रेस पक्षाला मोठी नामुष्की आहे, पण तो पराक्रम स्मृती इराणी यांनी करून दाखवला. आता २०२४ मध्ये भाजपा रायबरेलीतून आपला पराभव करू शकते या भीतीने स्वत: सोनिया गांधींना ग्रासले असावे.

सोनिया गांधी यापूर्वी केवळ उमेदवारी अर्ज भरायला रायबरेलीत जात होत्या, पण नंतर त्यांचा मतदारसंघाशी थेट संपर्क नव्हता. राज्यसभा म्हणजे आजारी व प्रकृती ठीक नसलेल्या केवळ वयस्कर नेत्यांचे सभागृह आहे, असा सोनिया यांनी समज करून घेतला असेल, तर ते चुकीचे आहे. रायबरेलीच्या मतदारांना सोनिया गांधींनी ठेंगा दाखवला, अशी प्रतिक्रिया उमटत आहे. त्यांच्याऐवजी त्यांची कन्या प्रियंका वड्रा यांनी जरी रायबरेलीतून निवडणूक लढवली तरी त्यांना निवडून येणे कठीण आहे, असे आजचे चित्र आहे. राज्यात योगी व केंद्रात मोदी या जोडीपुढे गांधी परिवाराचा निभाव लागणार नाही, हे वास्तव आहे. ते ओळखूनच सोनियांनी मागल्या दाराने संसदेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला असावा.

सोनिया गांधींनी १४ फेब्रुवारी २०२४ रोजी जयपूरमधून राज्यसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. खरे तर रायबरेली हा गांधी परिवाराचा परंपरागत मतदारसंघ आहे. याच रायबरेलीतून फिरोज गांधी व नंतर इंदिरा गांधी यांनी लोकसभा निवडणूक लढवली होती. सोनिया गांधींनी २०१९ मध्ये पाचव्यांदा रायबरेलीमधून निवडणूक जिंकली होती. काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष झाल्यापासून त्यांनी रायबरेलीतून लोकसभा निवडणूक लढवली व जिंकली. १९९९ मध्ये त्या रायबरेलीतूनच प्रथम खासदार म्हणून लोकसभेवर निवडून गेल्या. सोनियांऐवजी प्रियंका वड्रा लढतील, या चर्चेला काँग्रेसनेच खुलासा करून विराम दिला आहे. राहुल गांधी यांच्यासारखी प्रियंकांवर पराभवाची वेळ येऊ नये, असे काँग्रेसला व गांधी परिवाराला वाटत असावे.

यावर्षी काँग्रेस अन्य विरोधी पक्षांशी आघाडी करून लोकसभा निवडणुकीच्या मैदानात उतरण्याची तयारी करीत आहे. उत्तर प्रदेशात २०२२ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत प्रियंका वड्रा या काँग्रेसच्या प्रभारी होत्या. लडकी हूँ, लढ सकती हूं, अशी घोषणा देत त्यांनी प्रचार केला. त्यांनी काँग्रेसच्या प्रचाराची भरपूर हवा निर्माण केली, पण योगी – मोदींच्या नेतृत्वापुढे काँग्रेसला दारूण पराभव स्वीकारावा लागला. प्रियंकांचे उत्तर प्रदेशात काही चालत नाही, हे विधानसभा निवडणुकीनेच दाखवून दिले. उत्तर प्रदेशात काँग्रेस अतिशय दुर्बल आहे, हे सर्वांच्या लक्षात आले. प्रियंका स्वत: प्रचारात सक्रिय होत्या, पण काँग्रेसच्या मतांमध्येही फारसा फरक पडला नाही. उत्तर प्रदेशात राष्ट्रीय लोकदल, अपना दल (सोनेलाल), सुहेलदेव भारतीय समाज पार्टी, अशा प्रादेशिक पक्षांचा प्रभावही स्थानिक पातळीवर काँग्रेसपेक्षा जास्त आहे. देशातील सर्वात मोठे राज्य असलेल्या उत्तर प्रदेशात गांधी परिवारासाठी एकही सुरक्षित मतदारसंघ असू नये, हा काळाने उगवलेला सूड आहे.

देशाला स्वातंत्र्य मिळून पंचाहत्तर वर्षे झाली असताना काँग्रेस व गांधी परिवार या राज्यात एकाकी पडला आहे. मैं अपने बच्चों को भीख माँगते देख लूंगी; परंतु मैं राजनिती में कदम नहीं रखूंगी, असे उद्गार सोनिया गांधी यांनी त्यांचे पती राजीव गांधी यांच्या हत्येनंतर काढले होते. एक महिला आणि आईच्या भूमिकेतून त्यांनी या भावना तेव्हा व्यक्त केल्या होत्या. राजीव गांधींच्या हत्येनंतर त्या कमालीच्या भयग्रस्त झाल्या होत्या, त्यांना आपल्या दोन्ही मुलांच्या सुरक्षिततेची काळजी अधिक वाटत होती, म्हणून त्या राजकारणात यायला तयार नव्हत्या. नरसिंह राव यांच्या कारकिर्दीनंतर काँग्रेसची घसरण सुरू झाली, म्हणून पक्षाला नेतृत्व करण्यासाठी गांधी परिवाराची गरज भासू लागली.

आज देशभर भाजपाचा अश्वमेध दौडत आहे. अब की बार ४०० पार असा संकल्प भाजपाने जाहीर केला आहे. नरेंद्र मोदी हे पंतप्रधानपदाची हॅटट्रीक करणार, असे वातावरण आहे. अशा परिस्थितीत सोनिया गांधींनी लोकसभा निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतला आहे. रायबरेलीतील जनतेला त्यांनी एक भावनिक पत्र लिहिले असून, यापुढेही आपण काँग्रेसची सेवा करीत राहू, असे म्हटले आहे. इंदिरा गांधींच्या हत्येनंतर राजीव गांधींनी पक्षाची जबाबदारी घेतली, त्यांच्यानंतर सोनियांनी अनेक वर्षे पक्षाचे अध्यक्षपद सांभाळले. रायबरेली हा गांधी परिवाराचा सुरक्षित मतदारसंघ मानला जातो. आता हा मतदारसंघ अमेठीप्रमाणेच भाजपा आपल्याकडे खेचून घेईल का, हे २०२४ च्या निवडणुकीत दिसेल. रायबरेलीवर सातत्याने काँग्रेसचे वर्चस्व राहिले. काँग्रेसच्या नेत्या शीला कौल, आर. पी. सिंह, सतीश शर्मा यांना सुद्धा रायबरेलीच्या मतदारांनी लोकसभेवर खासदार म्हणून निवडून दिले होते.

सोनिया गांधी यांनी १९९७ मध्ये काँग्रेसचे सदस्यत्व स्वीकारले. १९९८ मध्ये त्या पक्षाच्या अध्यक्ष झाल्या. १९९९ मध्ये कर्नाटकमधील बेल्लारी व यूपीमधील अमेठीतून त्यांनी निवडणूक लढवली व विक्रमी मतांनी विजयी झाल्या. २००४ पासून दहा वर्षे यूपीएच्या चेअरमन होत्या. भाजपाकडून तेव्हा झालेला प्रखर विरोध लक्षात घेऊन त्यांनी पंतप्रधानपदासाठी डॉ. मनमोहन सिंह यांचे नाव सुचवले. भाजपाची उत्तुंग भरारी पाहून आता त्यांनी रायबरेलीला अलविदा केला आहे…
sukritforyou@gmail.com
sukrit@prahaar.co.in

Recent Posts

मुलांना शाळेत पाठवण्याचे योग्य वय काय? घ्या जाणून

मुंबई: प्रत्येक आई-वडिलांना वाटत असले की विकास योग्य पद्धतीने व्हावा. मात्र हे समजून घेणे गरजेचे…

1 hour ago

Sushant Divgikar : सुशांत दिवगीकरच्या घरात लागली आग; अ‍ॅवॉर्ड्ससह काही महत्त्वाची कागदपत्रे जळून खाक!

कुटुंबीय सुरक्षित मात्र मालमत्तेचे नुकसान मुंबई : ‘बिग बॉस’ रिअ‍ॅलिटी शोमधून (Bigg Boss reality show)…

2 hours ago

Mobile SIM Card : तब्बल १८ लाख सिमकार्ड बंद करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय, पण का?

नवी दिल्ली : देशात होणारी ऑनलाईन फसवणूक (Online Fraud) रोखण्यासाठी केंद्र सरकारने (Central Government) तब्बल…

3 hours ago

Paresh Rawal : मतदान न करणाऱ्यांना शिक्षा व्हायला हवी!

अभिनेते परेश रावल यांनी व्यक्त केलं परखड मत मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha 2024…

3 hours ago

IT Raid : अबब! पलंग, कपाट, पिशव्या आणि चपलांच्या बॉक्समध्ये दडवलेले तब्बल १०० कोटी!

दिल्लीत आयकर विभागाची मोठी कारवाई नवी दिल्ली : निवडणुकीच्या काळात (Election period) काळा पैसा सापडण्याच्या…

4 hours ago

Loksabha Election : देशात आणि राज्यात १ वाजेपर्यंत किती टक्के मतदान?

महाराष्ट्र अजूनही मतदानात मागेच... मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी (Loksabha Election) पाचव्या टप्प्यात देशातील ४९ जागांवर…

6 hours ago