Monday, June 17, 2024
Homeमहाराष्ट्रपालघरवनविभागाच्या भूखंडावरील झाडे मारण्यासाठी भूमाफियांकडून घातक रसायनाचा वापर

वनविभागाच्या भूखंडावरील झाडे मारण्यासाठी भूमाफियांकडून घातक रसायनाचा वापर

घातक रसायन, ड्रील मशीनसह चौघे जण ताब्यात

कुडे गावच्या ग्रामस्थांनी हाणून पाडला वृक्षतोडीचा प्रयत्न

बोईसर (वार्ताहर) : मुंबई-अहमदाबाद महामार्गालगतच्या वनविभागाच्या मोक्याचा भूखंड हडप करण्यासाठी झाडांना ड्रील मशीनच्या साहाय्याने भोक पाडून झाडांच्या खोडात घातक रसायनाचा वापर करून झाडे मारून टाकण्याचा प्रकार कुडे गावात रविवारी उघडकीस आला. झाडे मारण्यासाठी ड्रील मारणाऱ्या चौघांना ग्रामस्थांनी चोप दिला. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी या आरोपींना ताब्यात घेत त्यांच्यावर अवैध वृक्षतोडप्रकरणी गुन्हा दाखल केला असून, एक जण फरार आहे.

मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील कुडे गावच्या हद्दीत महामार्गालगत वनविभागाचा १२२ सर्व्हे क्रमांकाचा भूखंड आहे. हा भूखंड महामार्गालगत आणि मोक्याच्या ठिकाणी असल्याने भूमाफियांकडून तो हडपण्याचा प्रयत्न सुरू होता. या भूखंडावरील झाडे तोडण्यासाठी वनविभागाकडे परवानगीसाठी अर्ज केला होता. परंतु झाडे तोडीला स्थानिक ग्रामस्थ, वनव्यवस्थापन समितीने आक्षेप घेतल्याने वनविभागाने वृक्षतोडीला परवानगी नाकारली होती. अनेक प्रयत्न करूनही वनविभागाचा मोक्याच्या ठिकाणी असलेल्या भूखंडावरील वृक्षतोड करता येत नसल्याने भूखंड भूमाफियांनी घातक रसायनांचा वापर करून झाडे मारण्याचा प्रयत्न केल्याचे समोर आले आहे.

वनविभागाच्या भूखंडावरील झाडांची कत्तल करण्यासाठी रविवारी चार व्यक्ती कुडेमध्ये आले होते. त्यांना गावातील एका स्थानिकाने इलेक्ट्रिक ड्रील मशीनसह अन्य साहित्य उपलब्ध करून दिले होते. आरोपींनी भूखंडालगतच्या वीजवाहिनीवर आकडा टाकून बेकायदेशीर वीजमीटरला वीजजोडणी करून मशीन सुरू केली. आणि ड्रीलच्या सहाय्याने १५ ते २० झाडांना भोक पाडून झाडांच्या खोडात घातक रसायन टाकण्याचे काम सुरू केले. यावेळी त्या व्यक्तींची हालचाल संशयास्पद वाटल्याने ग्रामस्थांनी त्यांना हटकले असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. बेकायदेशीरपणे स्थानिक प्रजातीची झाडे मारण्याचे काम भूमाफियांकडून सुरू असल्याचे लक्षात येताच संतप्त ग्रामस्थांनी चौघांना पकडून चोप दिला.

त्यानंतर वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना पाचारण करून ड्रील मशीन, घातक रसायन आदी साहित्यासह त्यांना वनविभागाच्या ताब्यात दिले असून, त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. एक आरोपी फरार असून तपास सुरू असल्याची माहिती दहिसरच्या वनपरिक्षेत्र अधिकारी नम्रता हिरे यांनी दिली. वृक्षतोड करण्यासाठी बेकायदेशीर वीजजोडणी, वीजमिटर वापरल्याप्रकरणी संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे, असे महावितरणच्या अभियंता अक्षदा बारस्कर यांनी सांगितले.

भूखंड हडप करू देणार नाही

कुडे गावातील महामार्गालगतचा वनविभागाचा भूखंड हडप करण्याचा प्रयत्न स्थानिक दलालांच्यामदतीने भूमाफियांकडून सुरू आहे. रविवारी चौघांनी वनविभागाच्या भूखंडावरील झाडांना भोके पाडून त्याच्यामध्ये केमिकल टाकले आहे. दिवसा झाडे मारण्याचे काम सुरू असताना वनविभागाचे कर्मचाऱ्यांकडून होत असलेले दुर्लक्ष गंभीर आहे. वनविभागाचा भूखंड भूमाफियांना हडप करू देणार नाही. -बाबुराव भोवर, ग्रामस्थ, कुडे

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -