Thursday, April 25, 2024
Homeमनोरंजनबाईस साल बाद सुनहरी याद

बाईस साल बाद सुनहरी याद

  • कर्टन प्लीज : नंदकुमार पाटील

१९७५ साली ज्याच्याकडे पैसा होता. त्याच्या घरी कृष्णधवल छोटा पडदा दिसायला लागला होता. अर्थात घरात टीव्ही असणे हे त्यावेळी श्रीमंतीचे लक्षण मानले जात होते. त्यामुळे नाटक, चित्रपट, तमाशा अशा कार्यक्रमावर सामान्य प्रेक्षकांना अवलंबून राहावे लागत होते. अशा स्थितीत हिंदी वाद्यवृंदांनी डोके वर काढणे सुरू केले. खर्चिक आहे. पण पैसा वसूल करणारे मनोरंजनाचे माध्यम आहे, म्हणताना अनेकांनी या वाद्यवृंदानी निर्मिती केली. गाजलेली हिंदी गाणी, प्रेक्षकांच्या आग्रहास्तव काही मराठी गीते आणि एका दुसऱ्या लावणीबरोबर नकला असा काहीसा वाद्यवृंदाचा साचा ठरलेला होता. अर्थातच येथेसुद्धा पुरुष जाळे होते. अशा परिस्थितीत प्रमिला दातार नावाची कुजबूज सुरू झाली. स्त्रीच्या जातीने रंगमंचावर ते तमाम प्रेक्षकांच्या समोर गाण्यासाठी उभे राहायचे म्हणजे संस्काराचा अभाव म्हणावा लागेल, असे काहीसे बोलले जात होते. प्रमिलाजी फक्त गायिका म्हणून उभ्या राहिल्या नाहीत, तर निर्मात्या, पार्श्वगायिका म्हणूनही त्यांनी नाव मिळवले. प्रेक्षकांची कुजबूज थांबली. नंतर चर्चा सुरू झाली. पुढे दातार म्हणजे लगातार प्रयोगाची हमी असे या ‘सुनहरी यादे’बद्दल बोलले जाऊ लागले. २२ मार्च हा त्यांच्या संस्थेचा वर्धापन दिन असला तरी १२ एप्रिल १९७५ साली त्यांनी पुण्यात याचा पहिला प्रयोग केला होता. या गोष्टीला आता ४८ वर्षं झाली. मधली २२ वर्षं सोडली, तर आता पूर्वी त्यांनी सलग ३९९५ प्रयोगाची मजल मारली आहे. ‘बाईस साल बाद, सुनहरी याद’ असे म्हणण्याचे कारण म्हणजे २२ मार्च गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर त्या पुन्हा एकदा स्वतःच्या प्रयोगासाठी उभ्या राहणार आहेत. शिवाजी मंदिर येथे रात्री ८.३० वाजता प्रमिला दातार नावाचा स्वर भरगच्च प्रेक्षकात पुन्हा गुंजणार आहे.

प्रमिलाजी यांचा ‘सुनहरी यादे’ वाद्यवृंदाचा प्रयोग थांबला असला तरी आकाशवाणी, दूरदर्शनवर त्यांची सुरेल मैफल प्रेक्षकांना अधूनमधून मोहिनी घालत असते. पप्पा सांगा कुणाचे, हाऊस ऑफ बॅम्बू, जय हिंद जय हिंद अखंड भवन ही त्यांची गाणी जरी ऐकली तरी प्रमिला दातार नावाची उज्ज्वल वाटचाल समोर येते. प्रमिलाजींच्या आईंना संगीताची उत्तम जाण होती. त्या गृहिणी असल्या तरी स्वरांचा ताबा त्या स्नेहमंडळीत व्यक्त करीत होत्या. त्यामुळे प्रमिलाजींना संगीताची आवड निर्माण झाली. शाळेत असताना त्यांनी शारदा, सौभद्र या संगीत नाटकात काम केले होते. विशेष म्हणजे पुरुषप्रधान भूमिका त्यांच्यावर सोपवल्या जात होत्या. राज्य नाट्य स्पर्धेत अभिनयासाठी त्यांना पुरस्कारही देण्यात आला होता. या सर्व गोष्टींचा नाट्य वर्तुळात इतका बोलबाला झाला की नटश्रेष्ठ प्रभाकर पणशीकर, निर्माते राजाराम शिंदे यांनी त्यांना आपल्या नाटकात काम करण्यासाठी बोलावून घेतले होते. प्रमिलाजींचे वडील थोडे व्यापक मनाचे, दूरदृष्टीची होते. ‘दुसऱ्याकडे आपले अस्तित्व दाखवण्यापेक्षा आपले स्वतःचे वर्चस्व निर्माण कर’ असे त्यांचे सांगणे होते. प्रमिलाजींना ते पटले अभिनयापेक्षा संगीत साधना करूया, असे त्यांना वाटले. नवरंगबुवाकडे त्यांनी शास्त्रशुद्ध संगीताचे ज्ञान अवगत केले. खरं तर गायिका म्हणून लोकप्रियता प्राप्त करायची म्हणजे प्रथम अनेक वाद्यवृंदात उमेदवारी करावी लागते. पण प्रमिलाजी यांच्या बाबतीत असे काही झाले नाही. कोणतेही गाणे सहज गाण्याची लिलया, आत्मविश्वास, प्रभावी व्यक्तिमत्त्व, संवाद साधण्याची कला आणि संघटन कौशल्य या बळावर त्यांनी स्वतःचे वाद्यवृंद काढायचे ठरवले. सामाजिक चळवळ काम करणाऱ्या छाया दातार, अशोक दातार, पत्रकार अशोक जैन या प्रोत्साहन देणाऱ्या प्रतिभावंतांनी त्यांना ‘सुनहरी यादे’ हे नाव समर्पक असल्याचे सुचवले आणि प्रमिलाजींनी त्याचा हिंदी, मराठी वाद्यवृंद प्रवास सुरू झाला. भारतात विक्रमी प्रयोग केल्यानंतर परदेशातही त्यांना बोलावणे यायला लागले. महत्त्वाचे म्हणजे मोहम्मद रफी, मन्ना डे, किशोरकुमार अादी नामवंतांबरोबर सुरेली सैर करण्याचे भाग्य त्यांना लाभलेले आहे. एकंदरीत काय तर त्यांचे हिंदी वाद्यवृंदात येणे कक्षा रुंदवणारे ठरले.

प्रत्येक गोष्टीला एक शेवट असतो, असे म्हणणाऱ्यांपैकी प्रमिलाजी आहेत. पुढे स्पर्धा वाढली केवळ आपले अस्तित्व अबाधित राहावे म्हणून सहकलाकारांना आशा लावणे त्यांना स्वतःला मान्य नव्हते वंदना, शर्मिला या त्यांच्या दोन कन्या त्यांनी सुद्धा हे क्षेत्र आजमावून पाहिले. आईच्या झंझावात प्रवासाच्या त्या साक्षीदार झाल्या. त्यासुद्धा गायिका म्हणून खंबीरपणे उभ्या राहिल्या होत्या. मधल्या बावीस वर्षांत प्रमिलाजी यांनी मुलींना मार्गी लावले. एकीकडे ‘सुनहरी यादे फाऊंडेशन’च्या वतीने सामाजिक कार्याचा सिलसिला त्यांनी सुरू ठेवला. विशेष म्हणजे नव गायकांसाठी त्यांनी विविध स्पर्धा घेतल्या. युवक बिरादरीच्या माध्यमातून भारताच्या विविध प्रांतात ‘एक सूर, एक ताल’ या अभिनव उपक्रमाचे त्यांनी आयोजन केले. संगीतापासून वंचित असलेल्या महानगरपालिकेच्या विद्यार्थ्यांना त्यांनी या चळवळीत सामावून घेतले. विविध बोलीभाषेतील गाणी त्यांना शिकवली. ती जाहीरपणे गायलाही लावली. त्यांचा हा सकारात्मक कामाचा पसारा पाहिल्यानंतर त्यांना निवांत बसणे ठाऊक नाही हे लक्षात येते. लॉकडाऊनच्या काळात त्यांनी घरी बसून समाजमाध्यमावर आठवणी सांगणे सुरू केले, दर्दी प्रेक्षक आठवणी ऐकण्यासाठी उत्सुक असतात म्हणताना त्यांनी या आठवणींना गाण्याची जोड दिली. नाही म्हटले तरी गेल्या दोन वर्षांत त्यांनी चारशेच्या वर गाणी आणि संस्मरणीय आठवणी सांगितलेल्या आहेत. यातून काय घडले, तर त्यांचा मोठा चाहता वर्ग निर्माण झाला. संपूर्ण दातार परिवार एकवटला गेला. त्यांच्या गप्पा वाढल्या आणि आता एका प्रयोगाच्या निमित्ताने प्रमिलाजी तुम्ही पुन्हा रंगमंचावर या असे सुचवणे वाढले. प्रमिलाजी यांनी आपल्या दोन कन्यांना ही संकल्पना सांगितली. त्यांना आवडली आणि आता सुनहरी यादेची टीम पुन्हा मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाली आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -