आमदार नितेश राणे यांची मागणी

पुरावे मुंबई पोलिसांना देणार नाही

डीसीपीचा सीडीआर तपासा

मुंबई (प्रतिनिधी) : दिशा सालियन प्रकरणात मालवणी पोलीस ठाण्यात आमची तब्बल नऊ तास चौकशी झाली. त्यावेळी प्रत्येक १५-२० मिनिटांनी पोलीस उपायुक्तांना (डीसीपी) फोन येत होते. ते फोन घ्यायला बाहेर जात होते. त्यामुळे संबंधित डीसीपीचा सीडीआर तपासला पाहिजे. जेणेकरून त्यांना चौकशीच्यावेळी कोणाचा फोन येत होता, कोण सूचना देत होते, हे स्पष्ट होईल, असे भाजप आमदार नितेश राणे यांनी सांगितले. तसेच या प्रकरणाची सीबीआय चौकशी व्हावी, अशी मागणीही नितेश राणे यांनी केली.

दिशा सालियन प्रकरणात दिंडोशी सत्र न्यायालयाने बुधवारी नारायण राणे आणि नितेश राणे यांना अटकपूर्व जामीन मंजूर केला. यानंतर नितेश राणे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

यावेळी नितेश राणे यांनी मुंबई पोलिसांकडून सुरू असलेल्या चौकशीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. दिशा सालियन प्रकरणात आमची चौकशी झाली तेव्हा आम्हाला एफआयआर च्या आनुषंगाने एकही प्रश्न विचारण्यात आला नाही. उलट तुम्ही जे आरोप केले, ती माहिती तुम्हाला कोणी दिली? संबंधित छायाचित्र कुठे आहे, असे प्रश्न विचारण्यात आले. आमच्या आरोपांमुळे दिशाच्या पालकांवर अन्याय झाला असेल तर त्यासंदर्भात प्रश्न विचारले जाणे अपेक्षित होते. पण तसे काहीही विचारण्यात आले नाही. दिशा सालियन प्रकरणात सरकारमधील एका मंत्र्याचा संबंध आहे, असा आरोप आम्ही केला होता. पण त्याविषयीही काही विचारण्यात आले नाही. पण चौकशीचा एकूण रोख पाहता सरकारमधील कोणीतरी प्रचंड घाबरले आहे, असा दावा नितेश राणे यांनी केला.

दिशा सालियन प्रकरणातील पुरावे आम्ही मुंबई पोलिसांना देणार नाही. आम्हाला त्यांच्यावर विश्वास नाही. या प्रकरणात राज्य सरकारमधील मंत्री गुंतला असल्याने आम्हाला पोलिसांची भूमिका संशयास्पद वाटते. त्यामुळे या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे द्यावा, अशी मागणी आम्ही न्यायालयात करणार असल्याचे नितेश राणे यांनी सांगितले.

दरम्यान यावेळी लोकशाहीत लोकप्रतिनिधींना काही अधिकार आहेत. नारायण राणे केंद्रीय मंत्री आहेत, मी आमदार आहे. अन्यायाविरुद्ध आवाज उठवणे, हे आमचे काम आहे. न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर करून आमचा हा अधिकार अबाधित ठेवला. त्यासाठी आम्ही न्यायालयाचे आभार मानतो, असे नितेश राणे यांनी म्हटले.