Friday, April 19, 2024
Homeमहाराष्ट्रकोकणलो. टिळक, स्वा.सावरकरांच्या त्यागासमोर मी नतमस्तक : नारायण राणे

लो. टिळक, स्वा.सावरकरांच्या त्यागासमोर मी नतमस्तक : नारायण राणे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ‘हर घर तिरंगा’ अभियान प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवणार

रत्नागिरी (प्रतिनिधी) : ‘स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या औचित्याने स्वातंत्र्य संग्रामातील महान व्यक्तिमत्वाचे स्मरण व्हावे आणि ‘हर घर तिरंगा’ हे अभियान समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचावे या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेच्या माध्यमातून येथील स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या कोठडीला आणि लोकमान्य टिळकांच्या स्मारकाला भेट देऊन अभिवादन केले, त्यांच्या कार्यासमोर, त्यागासमोर मी नतमस्तक झालो’, असे प्रतिपादन केंद्रीय सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी केले.

रत्नागिरीत शुक्रवारी आलेल्या केंद्रीय मंत्री ना. नारायण राणे यांनी प्रथम विशेष कारागृहातील स्वा.विनायक दामोदर सावरकर यांनी ज्या छोट्या कोठडीत तुरुंगवास भोगला त्या कोठडीला भेट दिली. तेथील स्वा.सावरकर यांच्या तैलचित्राला अभिवादन केले आणि त्यांनी तेथील बंदिवानांशी संवाद साधला आणि त्यांना मार्गदर्शन केले. यावेळी कारागृह अधीक्षक चांदणे यांनी ना. राणे यांचे व अन्य मान्यवरांचे स्वागत केले.

त्यानंतर नारायण राणे यांनी शहरातील लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या स्मारकाला भेट दिली. लोकमान्य टिळकांच्या पूर्णाकृती पुतळ्याला त्यांनी अभिवादन केले. टिळकांच्या निवासस्थानाला भेट देऊन तेथे जतन केलेल्या आठवणींची माहिती घेतली. यावेळी तेथे स्वातंत्र्य चळवळीत योगदान दिलेल्यांचा सन्मान केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या हस्ते झाला. तर राज्यातील सर्वात जुन्या नगर वाचनालयालाही राणे यांनी भेट देऊन तेथील ग्रंथांची आणि वाचनालयाची माहिती घेतली. यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राजाभाऊ लिमये यांच्यासह अनेकांनी त्यांची भेट घेतली.

त्यांच्यासमवेत रत्नागिरी सिंधुदुर्गचे माजी खासदार निलेश राणे यांच्यासह जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी इंदुराणी जाखड, पोलीस अधीक्षक मोहितकुमार गर्ग, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे प्रादेशिक अधिकारी प्रशांत पाडळकर, तहसीलदार शशिकांत जाधव, पोलीस निरीक्षक विनीत चौधरी, रेल्वे पोलीस मधाळे तसेच भाजपा जिल्हाध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन, माजी आमदार बाळ माने, शहराध्यक्ष सचिन पटवर्धन, तालुकाध्यक्ष मुन्ना चवंडे, जिल्हा उपाध्यक्ष रवींद्र नागरेकर, लांजा तालुकाध्यक्ष मुन्ना खामकर, राजू भाटलेकर, राजू कीर आदि उपस्थित होते.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -