Sunny Leone : सनी लिओनीने केला ऑटिस्टिक मुलांसोबत रॅम्प वॉक!

Share

मुंबई : सनी लिओनीने (Sunny Leone) कालिकत येथे आत्मकेंद्री म्हणजेच ऑटिस्टिक (autistic) मुलांना मदत करण्यासाठी मदतीचा हात पुढे केला असून या कृत्याने केरळच्या लोकांच्या हृदयावर एक अनोखी छाप पाडली आहे.

सनी लिओनीच्या उपस्थितीने या खास कार्यक्रमात आशेचा किरण आणला आणि तिच्या प्रामाणिक हास्याने एक वेगळीच मजा आली. ती त्यांच्यापैकी (autistic children) काहींसोबत हातात हात घालून रॅम्पवर चालत असताना तिचे डोळे आनंदाने भरून आले.

ऑटिस्टिक मुलांचे जीवन सुधारण्यासाठी सनी लिओनीची अतूट बांधिलकी, कार्यक्रमाच्या प्रायोजकांना तिचा दृढ पाठिंबा आणि मुलांवरचे तिचे खरे प्रेम यातून दिसून आले. पिढ्यानपिढ्या टिकून राहणार प्रेम आणि प्रेमाचा वारसा सोबतीला घेऊन ती या खास मुलांसाठी आशेचे प्रतीक बनली.

तिच्या व्यावसायिक क्षेत्रात ती तिच्या “केनेडी” चित्रपटाने जागतिक पातळीवर प्रेक्षकांचे प्रेम मिळवत आहे. सोबतीला जॅकी श्रॉफ, प्रियामणी आणि सारा अर्जुन यांसारख्या प्रतिभावंतांसमवेत तिच्या “कोटेशन गँग” या तमिळ चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला असून ज्याने दशलक्षाहून अधिक व्ह्यूज मिळविले आहेत.

ऑटिस्टिक, ऑटिझम (Autism) म्हणजे आत्मकेंद्री, स्वमग्नता. २०१० मध्ये आलेल्या ‘माय नेम इज खान’ सिनेमात वारंवार ‘आय अॅम नॉट अ टेररिस्ट’ म्हणणारा शाहरुख खान आणि २०१२ मध्ये आलेल्या ‘बर्फी’ या सिनेमातील प्रियांका चोप्राने साकारलेली ‘झिलमिल’ आपल्या सर्वांनाच आठवत असतील. ‘ऑटिझम’ हा आजार झालेली ही दोन्ही पात्र आपल्या लक्षात राहिली असतील आणि या पात्रांविषयी सिनेमा बघताना आपल्याला वाईटही वाटले असेल. मात्र खऱ्या आयुष्यात जेव्हा अशा रुग्णांशी आपला सामना होतो, तेव्हा त्यांच्याकडे बघण्याचा आपला दृष्टीकोन बहुतांशवेळा बदललेला असतो.

ऑटिझम म्हणजे स्वमग्नता; स्वत:मध्येच गुंतून असणे असे या स्वमग्न मुलांचे वर्तन असते. हा एक मेंदूशी निगडीत वैकासिक विकार असून त्यामुळे मुलांच्या मानसिक आणि बौद्धिक विकासात अनेकदा अडथळे निर्माण होतात. या आजारास २०१३ पासून DSM-5 मध्ये ऑटीस्टिक डिसऑर्डर, अस्पर्जर सिंड्रोम आणि पेर्व्हेसिव्ह डेव्हलपमेंटल डिसऑर्डर यांना एकत्रित ऑटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डर (ASD) या नावाने ओळखले जाते. ऑटिझम आजार असणाऱ्या किंवा स्वत:मध्येच मग्न असणाऱ्या मुलांची वाढती संख्या ही चिंता वाढविणारी बाब आहे. जगभरामध्ये २०२० मध्ये दर ५४ मुलांमध्ये एक मूल ह्या विकाराने ग्रस्त आहे, आणि हे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. एका पाहणीनुसार भारतात दर हजारामागे सरासरी सात मुले या विकाराने ग्रस्त असलेली आढळून आलेली आहेत. याबाबत पालकांनी जागरूक राहून अशा मुलांच्याबाबत योग्य ती उपाययोजना करण्याची गरज निर्माण झालेली आहे.

यासाठीच जागतिक आरोग्य संघटनेने ऑटिझमविषयी समाजात जागरूकता निर्माण व्हावी, ऑटिझमविषयी असणारे गैरसमज दूर व्हावेत म्हणून २ एप्रिल हा दिवस ‘जागतिक ऑटिझम दिवस’ म्हणून साजरा केला जातो.

ऑटिझम विकार, मूल जन्मल्यापासून ते तीन वर्षांचे होईपर्यंत उद्भवत असल्याने त्या कालावधीमध्ये मुलांचा मानसिक विकास सामान्यपणे होऊ शकत नाही. मानसिक विकास बाधित झाल्याने ही मुले इतर सामान्य मानसिक विकास झालेल्या मुलांच्या मानाने वेगळी दिसू लागतात. ऑटिस्टिक मुले, त्यांच्या वयाच्या इतर मुलांमध्ये मिसळण्यास कचरतात. तसेच कोणत्याही गोष्टीची प्रतिक्रिया देण्यासाठी त्यांना इतर मुलांच्या मानाने जास्त वेळ लागतो. ह्या मुलांचा बुद्ध्यांक इतर सामान्य मुलांच्या मानाने भिन्न असतो. काही ऑटीस्टिक मुले विलक्षण बुद्धिवान असतात. त्यांचा बुद्ध्यांक देखील सामान्य मुलांपेक्षा जास्त असतो, पण ह्या मुलांना बोलण्यात आणि इतर सामाजिक व्यवहारामध्ये अडचणी येत असल्याने इतर मुलांसारखी प्रगती, ही मुले करू शकत नाहीत.

  • अशी मुले स्वतःचे नाव पुकारल्यावरही प्रतिसाद देता येत नाही.
  • अशी मुले दुसऱ्या व्यक्तीच्या डोळ्यात डोळे घालून बोलण्यास घाबरतात.
  • चेहऱ्यावरील निर्विकार भाव असतात.
  • शारीरिक संपर्क टाळतात किंवा विरोध करतात.
  • त्यांच्या सभोवतालच्या जगामध्ये रस नसतो.
  • शब्द आणि कृती अनुकरण करण्यात अयशस्वी.
  • भातुकलीचा खेळ किंवा मेकॉंनीचा खेळ खेळू शकत नाहीत.
  • अशी मुले एकटी राहण्यास प्राधान्य देतात, इतर मुलांमध्ये मिसळत नाही
  • ऑटिझम असलेली काही मुले व्यवस्थित बोलू शकतात, तर काही अजिबात बोलू शकत नाहीत.
  • विचारलेली प्रश्नांना उत्तरे देत नाहीत, आपले बोलणे ऐकून न ऐकल्यासारखे करणे.
  • एकाच गोष्टीसाठी किंवा कृतीसाठी वारंवार सूचना द्याव्या लागणे.
  • टाळ्या वाजवून किंवा हातवारे करून स्वागत अथवा निरोप देता येत नाही.
  • त्यांच्या दिनचर्येत किरकोळ बदल केल्यास अस्वस्थ होतात.
  • हात फडफडणे, शरीराचा विशिष्ट भाग हलवणे किंवा वर्तुळात फिरणे.
  • सामान्य मुलांच्या तुलनेने ह्या मुलांचा शारीरिक व मानसिक विकास खूप मंद असतो.
  • एकाच प्रकारचे कपडे घालणे, एकाच प्रकारचे खाणे अशी कृती करतात.
  • इतर कोणताही बदल झाला की ती प्रचंड चिडतात आणि अत्यंत आक्रमक असू शकतात.
  • एखादी वस्तू विशिष्ठ पध्दतीनेच लावणे हे त्यांच्यात रूजलेले असते.

मुलींपेक्षा मुलांमध्ये ऑटिझमचे प्रमाण जास्त आहे. मुलांमध्ये ७५ टक्के तर मुलींमध्ये २५ टक्के प्रमाण या आजाराचे असते.

सर्वसाधारणपणे मूल वर्षाचे झाल्यानंतरही हसत नसेल, आईच्या बोलण्यावर प्रतिक्रिया देत नसेल, तर मुलाचा विकास सामान्य नसण्याची शक्यता असते. पण बहुतेक केसेस मध्ये मूल तीन-चार वर्षांचे होईपर्यंत त्याचा विकास सामान्य नाही, हे लक्षात येत नाही. पण जर विकासाची गती सामान्य नाही हे लवकर लक्षात आले, तर त्वरित मनोवैज्ञानिकांशी संपर्क करणे आवश्यक असते.

ऑटिझमची कारणे

ऑटीझम नेमका कोणत्या कारणामुळे उद्भवतो याचे पक्के निदान अजूनही झालेले नाही, तरी असे म्हटले जाते की पर्यावरणीय आणि जेनेटिक कारणांच्या एकत्रित प्रभावामुळे हा आजार उद्भवतो. तसेच जेनेटिक म्युटेशन हे त्यामागील एक कारण असल्याचे अलिकडे स्पष्ट झाले आहे. पण हे जेनेटिक बदल कशामुळे होतात हे मात्र निश्चितपणे सांगितले जाऊ शकत नाही. पर्यावरणातील अपायकारक बदलांमुळे देखील ऑटीझम उद्भवू शकते असे वैज्ञानिक म्हणतात. ऑटीझम हा मुलाच्या जन्मानंतर त्वरित होऊ शकणारा आजार आहे.

हा आजार होण्यासाठी प्रमुख कारणे

  • २६ आठवडे होण्यापूर्वीचं बाळंतपण झाल्यास किंवा कमी वजनाचे बाळ
  • गरोदर स्त्रिचे वय अधिक असल्यास किंवा गर्भावस्थेत निर्माण झालेली गुंतागुंत
  • मेंदूतील संसर्ग किंवा व्हॅलप्रोइक ऍसिड व थालीडोमाइड अशी औषधे प्रेग्नन्सीत घेणे
  • गर्भावस्थेमध्ये असताना मातेला काही आजार किंवा गर्भवती महिला सतत मानसिक तणावाखाली असणे.
  • गर्भवती महिलेचे थायरॉइड ग्रंथीचे काम सुरळीत नसल्यामुळे पोटामध्ये वाढणाऱ्या बाळाच्या नर्व्हस सिस्टमवर नकारात्मक परिणाम होऊन ऑटीझम उद्भवू शकते.
  • क्वचित प्रसंगी गर्भातील बाळाला पुरेसा प्राणवायूचा पुरवठा न झाल्याने देखील ऑटीझमचा धोका उद्भवू शकतो.

ऑटिझमवरील उपचार

ऑटीझम हा औषध उपचारांनी पुर्णपणे बरा करता येत नाही. उपचाराच्या मदतीने ऑटिझमबरोबर मुलांना स्वावलंबी जीवन जगता यावे यासाठीचे उपयुक्त उपाययोजना करता येऊ शकतात. त्यामुळे जर वर दिलेली लक्षणे मुलामध्ये दिसत असल्यास त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घ्या. यासाठी ऑटिझमवर उपचारामध्ये स्क्रीनिंग साधने, वर्तनविषयक थेरपी, ऑक्युपेशनल थेरपी, प्ले थेरपी, फिजिओथेरपी, स्पीच आणि लँग्वेज थेरपी आणि औषधे यांचा वापर करून या मुलांमध्ये आत्मविश्वासपूर्ण आणि स्वावलंबी जीवन जगण्यासाठी प्रेरित केले जाऊ शकते.

पालकांची जबाबदारी

ऑटिझमग्रस्त मुलांना आनंद वाटेल असे व्यायाम करण्यास प्रोत्साहन द्यावे. त्यांच्या मनाविरुद्ध व्यायाम करून घेऊ नयेत. पालकांनी आपल्याबरोबर त्यांना मोकळ्या हवेत सकाळी व संध्याकाळी फिरायला घेऊन जावे. मैदानात त्यांच्याबरोबर मोठ्या चेंडूने खेळावे. खेळ, व्यायाम आणि उपचारासोबत अशा मुलांना कुटूंबातील सदस्यांचे प्रेम व आधाराची अत्यंत गरज असते. पालकांनी त्यांना समजून घेणे खूप गरजेचे असते. कारण अशी मुले जाणीवपूर्वक असामान्य वर्तन करत नसून ऑटिझममुळे होत असते. अशा मुलांचे सामाजिकीकरण देखील झालेले नसते कारण त्यांचा मेंदू त्यांच्या भावना व्यक्त करण्यासाठी सक्षम नसतो. त्यामुळे अशा मुलांना कुटूंबातील सदस्यांनी समजून घेऊन त्यांना नवनवीन गोष्टी शिकण्यास मदत करावी जेणेकरून त्यांच्यातील आत्मविश्वास वाढण्यास मदत होईल.

शाळा आणि समाजाची जबाबदारी

अशा मुलांसाठी विशेष शाळा उपलब्ध आहेत पण ऑटिझम असलेली ७१ टक्के मुले मुख्य प्रवाहातील शाळांमध्ये शिक्षण घेऊ शकतात. संशोधनात असे दिसून आले आहे की मुख्य प्रवाहातील शाळामध्ये विशेष प्रशिक्षण घेतलेले प्रशिक्षक किंवा ऑटिस्टिक मुलांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आणि त्यांना आवश्यक पाठिंबा देण्यासाठी सोयी सुविधा उपलब्ध नसतात. त्यामुळे सर्व शाळा आणि शिक्षकांमध्ये ऑटिझमविषयी जाणीव जागृती होणे गरजेचे आहे.

समाजानेही थोडे परिपक्व झाले पाहिजे कारण ऑटिझम असलेले मुल सांभाळणे कोणत्याही पालकांसाठी एक खूप मोठे आव्हान असते. आपला समाज आजही ऑटिस्टीक मुले, मतिमंद, गतिमंद किंवा दिव्यांगजण यांच्याकडे कुत्सित नजरेने पाहतो. त्यांच्या व्यंगावर विनोद करण्यातच ते धन्य मानत असतात. समाज म्हणून आपणही अशा मुलांच्या पालकांना भावनिक आधार व प्रोत्साहन दिले पाहिजे.

ऑटिझम असलेल्या मुलांसाठी विशेष शाळा

Chetana Apangmati Sanstha Kolhapur, Swayam School for Special Children Kolhapur, Sarth Foundation and DAWN Autism School, Centre for Children with Multiple Disabilities Pune, Prasanna Autism Centre Pune, Sopan Autism Centre Navi Mumbai, Ashiana Institute for Autism, Mumbai.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 

Recent Posts

Garlic: लसूण खाल्ल्याने वाढेल तुमचे आयुष्य, मात्र अशा पद्धतीने करा सेवन

मुंबई: आपल्या चांगल्या आरोग्यासाठी माणसाला ८ ते ८ तासांची झोप गरजेची असते. झोप पूर्ण न…

3 hours ago

मुंबईला २० ते २२ दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा

दोन धरणात शून्य टक्के पाणीसाठा सातपैकी पाच धरणांनी गाठला तळ मुंबई : मुंबईला २० ते…

3 hours ago

मुंबई आशियातील २१ वे सर्वात महागडे शहर

मुंबई : मुंबई आशियातील २१ वे सर्वात महागडे शहर ठरले आहे, तर नवी दिल्ली आता…

3 hours ago

Gautam Gambhir : गौतम गंभीरने घेतली केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट, समोर आला हा फोटो

मुंबई: लोकसभा निवडणूक २०२४मध्ये भारतीय जनता पक्षाने आपल्या सहकारी पक्षांसोबत मिळून सलग तिसऱ्यांदा सरकार बनवले.…

3 hours ago

रत्नागिरीमध्ये १९ जूनपासून पोलीस भरतीला सुरुवात

ओरोस : सिंधुदुर्ग जिल्ह्यात १९ जून ते १ जुलै या कालावधीत पोलीस भरती प्रक्रिया राबविली…

4 hours ago

उद्धव ठाकरेंनी कोकणाच्या जनतेची माफी मागावी; आमदार नितेश राणे यांनी दिला इशारा

कणकवली : कोकणी माणूस स्वाभिमानी आहे. तो वेळेत कर्जफेड करतो, कुठलाही जिल्हा बँककडे जावा शून्य…

4 hours ago