Thursday, March 28, 2024
Homeसाप्ताहिककोलाजspecial : हसरा चेहरा पडद्याआड

special : हसरा चेहरा पडद्याआड

तबस्सुम यांना श्रद्धांजली

आपलं भविष्य उज्ज्वल बनवण्याची स्वप्न घेऊन मायानगरीमध्ये प्रवेश केलेल्या तारे-तारकांची संख्या बरीच मोठी आहे. अर्थातच त्यातल्या प्रत्येकाची स्वप्नं पूर्ण झाली असं म्हणता येणार नाही. (special) अनेकांची सुरुवात आशादायी झाली असली तरी पुढचा मार्ग बराच खडतर होता.

अशा परिस्थितीत निराशा येण्याची दाट शक्यता असते. मात्र काही सुजाण व्यक्तिमत्त्वं या तत्कालीक निराशेवर मात करत उज्ज्वल भविष्याला गवसणी घालतात. यातलं तबस्सुम हे एक नाव अलीकडेच आपल्याला कायमचं सोडून निघून गेलं. गेली अनेक वर्षं चित्रसृष्टीमध्ये कार्यरत असणाऱ्या तबस्सुम यांना प्रारंभीचा काळ म्हणावं तसं यश मिळालं तरी भविष्यात नायिका म्हणून म्हणावं तसं यश मिळालं नाही. चेहरा हसरा ठेवत, अभ्यासपूर्ण संशोधन सुरू ठेवत रसिकांच्या बदलत्या मागण्या आणि मनोरंजनाचं बदलतं स्वरूप लक्षात घेत या हसऱ्या अभिनेत्रीने निवेदनाचा मार्ग पत्करला. आगळ्या-वेगळ्या कारकिर्दीची पायाभरणी केली. या पायवाटेवरून चालणाऱ्यांची संख्या खूप मोठी आहे, याचं श्रेय तबस्सुम यांना द्यावं लागेल.

माता-पिता आपल्या अपत्याचं मनात ठसलेल्या आणि भविष्यात अपेक्षित असणाऱ्या प्रतिमेबरहुकूम मोठ्या कौतुकानं नाव ठेवतात, पण ती अपेक्षित छबी निर्माण करण्यात मोजकीच व्यक्तिमत्त्वं यशस्वी होतात. अशा मोजक्या दिग्गजांमधील एक अग्रणी नाव म्हणजे तबस्सुम… तिच्या नावाबरोबर ज्येष्ठ अभिनेत्री, यशस्वी निवेदिका, भाषेची उत्तम जाणकार, विनोदाची पखरण करणारी, मृदू आणि सतत उत्साही अशी बरीच मोठी बिरुदावली असली तरी हे नाव उच्चारताच डोळ्यांसमोर येतं ते नावाला परिपूर्ण न्याय देणारं तिचं हसरं, आनंदी आणि नुकत्याच उमललेल्या फुलासारखं टवटवीत व्यक्तिमत्त्व. हे फूल नियतीच्या हलक्या हेलकाव्यानं गळून पडलं, पण त्यातली टवटवी कधीच डोळ्यांसमोरून हलणारी नाही.

१९८० आणि १९९० च्या दशकात हसऱ्या चेहऱ्याच्या तबस्सुम गोविल या नावानं प्रेक्षकांना चटपटीत आणि वलयांकित मनोरंजन जगताची ओळख करून दिली आणि बघता बघता त्याची चटकच लागली. केसात छानसा गजरा माळलेली, हलक्या रंगाची साडी नेसलेली, सदैव हसतमुख आणि उत्साहाचा खळखळता झरा असणारी तबस्सुम १९७२ ते १९९३ या कालावधीत ‘फूल खिले हैं गुलशन गुलशन’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून छोट्या पडद्यावर सुगंध उधळत होती. बघता बघता चित्रपटातल्या थोर व्यक्तिमत्त्वांशी चालणारा तिचा जिवंत आणि प्रेमळ संवाद या कार्यक्रमाची उंची वाढवत गेला. सेलिब्रिटींशी गप्पा मारत, हळूच त्यांच्या मनातल्या हळव्या कोपऱ्यात डोकावत, भूतकाळातल्या आठवणीत रमवत, हळुवारपणे त्यांना बोलतं करत कार्यक्रम फुलवत नेण्याची तिची शैली प्रेक्षकांना विपुल आनंद देऊन गेली.

वयाच्या ७८ वर्षी हृदयविकाराच्या झटक्यामुळे तबस्सुम आपल्यातून निघून गेल्या. आजाराची कोणतीही पार्श्वभूमी नसताना असं अवचित घडणं अत्यंत क्लेषकारक असतं. अगदी १० दिवसांपूर्वी या मुलाखतकार – अभिनेत्रीने एका कार्यक्रमासाठी शूट केलं होतं आणि येत्या काही दिवसांमध्ये उरलेलं शूट संपवायचं होतं. पण कदाचित नियतीला ते मान्य नव्हतं. अशा अकाली निधनाने तिच्या प्रेमळ व्यक्तिमत्त्वाचं, सौम्य विनोदाचं आणि प्रभावी संवादाचं एक पर्व संपल्याचं दु:ख गहिरं आहे. तबस्सुमचा जन्म १९४४ मध्ये मुंबईत अयोध्यानाथ सचदेव आणि आई असगरी बेगम यांच्या घरी झाला. तबस्सुमचे आई-वडील स्वातंत्र्यसैनिक होते. तिच्या नावामागेही एक रंजक कथा आहे. ती म्हणजे, तबस्सुमच्या आईच्या धार्मिक भावना लक्षात घेऊन वडिलांनी आपल्या मुलीचं नाव तबस्सुम ठेवलं, तर त्याच वेळी आई असगरी बेगम यांनी लेकीचं नाव किरण बाला असं ठेवलं. पुढे हीच मुलगी एक लोकप्रिय बालकलाकार ठरली. वयाच्या अवघ्या तिसऱ्या वर्षापासून ती अभिनय विश्वात रमली. मुघल-ए-आझमपासून अनेक मोठ्या चित्रपटात ती झळकली. प्रेक्षकांनी तिला ‘बेबी तबस्सुम’ हे नाव दिलं.

तबस्सुम यांचा चित्रसृष्टीतला वावर मोठा नसला तरी दिलखुलास राहिला. मोजक्यात पण रंगतदार भूमिका त्यांनी केल्या. बालकलाकार म्हणून त्यांनी जोगन (१९५०), दीदार (१९५१) आणि बैजू बावरा (१९५२) या चित्रपटांमध्ये काम केलं. नंतर तलाश (१९६९), हीर रांझा (१९७०), जॉनी मेरा नाम (१९७०) आणि ‘तेरे मेरे सपने’ (१९७१) या चित्रपटांमध्येही भूमिका साकारल्या. १९८५ मध्ये त्यांनी ‘तुम पर हम कुर्बान’ नावाचा चित्रपट दिग्दर्शित केला. या चित्रपटाचं लेखनही त्यांचंच होतं. बेबी तबस्सुम मोठ्या झाल्या, पण त्यांच्या नावापुढचं ‘बेबी’ अखेरपर्यंत तसंच राहिलं. त्यांचे सहकलाकारांसोबतचे तसंच उद्योगातल्या लोकांशी अत्यंत प्रेमळ आणि मैत्रीपूर्ण संबंध होते. त्यांच्या शोमध्ये यातले सगळेजण पाहुणे म्हणून आलेले दिसले. मनोरंजन विश्वात रमलेली ही हाडाची अभिनेत्री. कोणते प्रश्न विचारले की, समोरचा कलाकार खुलेल हे या निवेदिकेला नेमकं माहीत असायचं. अलीकडच्या काही वर्षांमध्ये ही सदाबहार अभिनेत्री ‘तबस्सुम टॉकीज’ हे यू ट्युब चॅनल चालवत होती. ख्यातनाम कलाकारांना बोलतं करण्याची तिची हातोटी विलक्षण होती. सध्या अनेक निवेदक सेलिब्रिटींच्या खासगी जीवनाबद्दल बोलण्यात गुंतलेले असतात. त्यातून त्यांना प्रसिद्धीसाठी आवश्यक असणारा ‘मसाला’ मिळवायचा असतो. मात्र तबस्सुमने कधीच आपला शो इथपर्यंत संकुचित ठेवला नाही. उलटपक्षी, त्यांच्या लोकप्रियतेला कारणीभूत असलेल्या गोष्टी, त्यांची जीवनपद्धती, यश प्राप्त करण्यात आलेल्या अडचणी आदी कळीचे मुद्दे तिच्या गप्पांमधले महत्त्वाचे विषय असायचे.

इंडस्ट्रीतल्या प्रसिद्धीच्या चंचल स्वरूपाबद्दल किंवा सेलिब्रिटींच्या शोकांतिकांबद्दल बोलताना ती कधी कधी विचलित झाल्याचंही दिसून आलं. उदाहरणार्थ, एकदा तिने भारत भूषण यांची मालमत्ता आणि बँक शिल्लक गमावल्याबद्दल सांगितलं होतं. ‘बैजू बावरा’ गाजवणाऱ्या या नायकाला सर्वात जास्त दु:ख झालं जेव्हा त्याला आपला मौल्यवान पुस्तकसंग्रह अत्यंत कमी किमतीत विकावा लागला होता… हे ऐकताना प्रेक्षकही हळहळले होते. अचानक मृत्यू कसा येऊ शकतो याबद्दल बोलताना, तिने अभिनेत्री दिव्या भारतीचं निधन आणि ते कसं गूढ आहे याचा उल्लेख केला होता. तबस्सुमने आपल्या शोमध्ये नेहमीच पाहुण्यांची खरी प्रशंसा केली. आता तिच्यासारखे चॅट शो करणारे असं करतातच असं नाही. बरेचदा इथे त्यांची मखलाशी प्रेक्षकांसमोर उघडी पडते. काहींच्या बोलण्यात कृत्रिमता डोकावते. पातळीहिन विनोद नकोसे वाटतात. पण तबस्सुमच्या कार्यक्रमात या सवंगतेला कुठेच धारा नव्हता. म्हणूनच काळ लोटला तरी दूरदर्शनवर पाहायला मिळालेल्या ‘फूल खिले है गुलशन गुलशन’ या देशातल्या पहिल्या टीव्ही टॉक शोच्या स्मृती आजही ताज्या आहेत. आठवणीत हरवलेले अनेक मान्यवर सांगतात की, तबस्सुमने आपल्या आवाजाने आणि हसतमुख व्यक्तिमत्त्वाने प्रत्येक शब्दाला न्याय देण्याचा प्रयत्न केला. तिने कधीच कार्यक्रमावर उदास छटा येऊ दिली नाही. ती नेहमी सकारात्मक ऊर्जेनं भरलेली असायची आणि तीच ऊर्जा सर्वत्र पसरवायची. म्हणूनच तिच्या हसण्यानं लाखो चेहऱ्यांवर हसू येऊ शकलं.

तबस्सुम एक उत्तम वक्ता, लेखिका आणि कवयित्रीही होती. तिने अनेकांच्या बालपणाचा एक कोपरा व्यापला आहे. तबस्सुम बऱ्याच दिवसांपासून सोशल मीडियावरही खूप सक्रिय होती. आधी उल्लेख केल्याप्रमाणे ‘तबस्सुम टॉकीज’ नावाच्या यूट्यूब चॅनलवर ती चाहत्यांना चित्रपटाच्या कथांची ओळख करून देत असे. ती अनेकदा इंस्टाग्राम अकाऊंटवर थ्रोबॅक फोटो शेअर करताना दिसली. तिची शेवटची पोस्ट ‘यादों की बारात’ (१९७३) देखील चित्रपटाची क्लिप आहे. ‘रामायण’ मालिकेत प्रभू रामचंद्रांची भूमिका साकारणाऱ्या अरुण गोविल यांचे मोठे बंधू विजय गोविल यांच्याशी तबस्सुम यांनी विवाह केला होता. आता हे आनंदी व्यक्तिमत्त्व कधीच बघायला मिळणार नाही याचं दु:ख आहेच, पण प्रकृतीच्या नियमानुसार आयुष्य सार्थकी लावत, अजरामर करत त्या गेल्या, हेही मान्य करावं लागेल.

-मधुरा कुलकर्णी

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -