Tuesday, June 18, 2024
Homeसंपादकीयतात्पर्यमराठवाड्यात भीषण पाणीटंचाई

मराठवाड्यात भीषण पाणीटंचाई

मराठवाडा वार्तापत्र: अभयकुमार दांडगे

मराठवाड्यातील अनेक प्रकल्प पूर्णपणे कोरडे पडले आहेत. पाणीटंचाईने भीषण स्वरूप धारण केले असून मे अखेरीस पाणीटंचाई तीव्र झाली होती. आता जून उजाडल्याने यामध्ये अधिक भर पडली. सद्यस्थितीत मराठवाडा पाणीटंचाईने त्रस्त झाला आहे. तसेच येथील मुख्य धरणांनी तळ गाठला असल्याने पाणीसाठा केवळ दहा टक्क्यांवर आला आहे. मराठवाडा विभागातील मोठ्या ११ प्रकल्पांत १३.२५ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. ७५ मध्यम प्रकल्पांत ५.४० टक्के आणि ७४९ लघू प्रकल्पांत ६.१११ टक्के पाणीसाठा आहे.गोदावरी नदीवरील १५ बंधाऱ्यांत ११.३९ आणि तेरणा, मांजरा, रेणा नदीवरील २७ बंधाऱ्यांत चार टक्के पाणीसाठा आहे. विभागातील एकूण ८७७ प्रकल्पांत १०.७५ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. जायकवाडी धरणातील पाणीसाठा मात्र पाच टक्क्यांवर आला असल्याने छत्रपती संभाजीनगर व परिसरातील पाणीटंचाई अधिकच चिंताजनक आहे.

मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थिती शेवटच्या टप्प्यात भयावह झाली आहे. मराठवाड्यात सर्वत्रच पाणीटंचाई ही मुख्य समस्या झाली असून यामुळे मात्र बाजारात जनावरे विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. पाणी आणि चारा या दोन्हीही गोष्टी नसल्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. जनावरांना पिण्याचे पाणी नसल्यामुळे शेतकरी जनावरे विकत आहेत. बाजारात अशा जनावरांची संख्या अधिक आहे. त्यामुळे जनावरांचा विक्री दरही खूप कमी झाला आहे. या अशा परिस्थितीमुळे शेतकरी हैराण झाला आहे.  मराठवाड्यातील शेतकरी सध्या मशागतीच्या कामात व्यस्त आहे; परंतु जनावरांना पिण्यासाठी पाणी नसल्यामुळे जनावरे विकावी लागत आहेत. बैलांचा बाजार मोठ्या प्रमाणात भरत आहे. शेतकऱ्यांना नाईलाजास्तव बाजारात बैल विक्री करावी लागत आहे.

मराठवाड्यात १५६१ गावांना दुष्काळाची सर्वाधिक झळ बसली आहे. १८६९ टँकरने मराठवाड्यात सध्या पाणीपुरवठा सुरू आहे. त्यात सर्वाधिक ७०० टँकर एकट्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सुरू आहेत. मे महिन्यात मराठवाड्यातील बहुतांश धरणांनी तळ गाठला होता; परंतु जून महिन्याच्या मध्यात पाऊस पडण्याची शक्यता आहे, असा हवामान खात्याचा अंदाज आहे. पाऊस पडला नाही, तर मराठवाड्यात खूप मोठी समस्या उद्भवणार आहे. पाऊस न पडल्यास प्रशासनाला मराठवाड्यात सर्वच ठिकाणी पाणी उपलब्ध करून देण्याचे खूप मोठे आव्हान असणार आहे. मराठवाडा विभागातील ११ मोठ्या धरणांतील पाच धरणे कोरडी पडली आहेत. मध्यम आणि लघू प्रकल्पातील पाणीसाठा संपला आहे. परिसरातील गावांवर पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे.

पिण्याच्या पाण्यासाठी मध्यम आणि लघू प्रकल्पांवर शेकडो गावे अवलंबून आहेत. सर्वात मोठ्या असलेल्या जायकवाडी धरणात पाच टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. हा पाणीसाठा जून अखेरपर्यंत पुरणार असल्याने या ठिकाणी खूप मोठी समस्या उभी राहणार आहे. मोठ्या धरणातील सिद्धेश्वर, निम्नतेरणा, मांजरा, सीना कोळेगाव आणि माजलगाव ही धरणे कोरडी आहेत. त्यामुळे परिसरातील गावांसह मोठ्या शहराला टंचाईच्या झळा बसत आहेत. जिल्हा प्रशासनाने टँकरची संख्या वाढवूनही गावोगावी पाणीपुरवठा होत नसल्याचे चित्र आहे. जलसंपदा विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार मराठवाडा विभागातील ११ मोठ्या धरणांत १३.२५ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. ७५ मध्यम प्रकल्पांत ५.४० टक्के आणि ७४९ लघू प्रकल्पांत ६.११ टक्के साठा आहे. गोदावरी नदीवरील १५ बंधाऱ्यांत ११.३९ टक्के आणि तेरणा, मांजरा, रेणा नदीवरील २७ बंधाऱ्यांत चार टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. भूजल पातळी खोल गेल्यामुळे विहिरी कोरड्या पडल्या आहेत.

शेततळे, बंधारे, तलाव यामध्येही पाणी नसल्याने पाणीपुरवठा योजनांवर परिणाम झाला आहे. फळबागांचे मात्र सर्वाधिक नुकसान झाले असून काही भागांत शेतकऱ्यांना फळभागा तोडाव्या लागत आहेत. जालना जिल्ह्यात २५०० हेक्टरवरील फळबागा पाण्याअभावी तोडून टाकाव्या लागल्या. बीड जिल्ह्यातील वडवणी तालुक्यात बाहेगव्हाण नावाचे गाव आहे. या ठिकाणी असलेल्या पांडुरंग डांबे या शेतकऱ्याने दीड एकरावर लागवड केलेली व पूर्ण वाढ झालेली लिंबोणीची बाग अक्षरशः जेसीबीने जमीनदोस्त केली. पाणी नसल्यामुळे शेतकऱ्यांवर ही परिस्थिती उद्भवली आहे. शेतकऱ्यांच्या फळबागा डोळ्यांदेखत उद्ध्वस्त कराव्या लागत असल्याने त्यांचे खूप मोठे आर्थिक नुकसान होत आहे. बीड जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांत दुष्काळाची परिस्थिती अतिशय भीषण होत चाललेली आहे. दुष्काळाचा हा फटका मराठवाड्यातील फळबागांना बसत चालला आहे. कधी अवकाळी पाऊस, कधी वादळी वारे, तर कधी भयानक दुष्काळ या चक्रव्यूहात मराठवाड्यातील शेतकरी अडकून पडला आहे.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील १६ प्रकल्पांत तीन टक्के, जालना जिल्ह्यातील सात प्रकल्पांत तीन टक्के, बीडमधील १६ प्रकल्पांत दहा टक्के, लातूरमधील ८ प्रकल्पांत दोन टक्के, तर धाराशिवमधील १७ प्रकल्पांमध्ये फक्त एक टक्का पाणीसाठा शिल्लक आहे. नांदेड जिल्ह्यात मात्र नऊ प्रकल्पांत १५ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. परभणीमधील दोन्ही मध्यम प्रकल्प कोरडे आहेत. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सुखना, लागूकी, ढेकू, कोल्हे, नारंगी, बोरदहेगाव, वाकोद, गिरजा, अंबाडी, अंजना, पळशी आणि पूर्णा नेवपूर या मध्यम प्रकल्पात अजिबात पाणीसाठा शिल्लक नाही. इतर पाच धरणांतील पाणीसाठा झपाट्याने कमी होत आहे. तसेच ९८ लघू प्रकल्पांतील ६६ प्रकल्प पूर्णपणे कोरडे पडले आहेत. या परिस्थितीमुळे मराठवाड्यातील धरणांनी तळ गाठला आहे.

मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत ४३ अंश सेल्सिअस एवढे तापमान असल्याने उकाडा प्रचंड होत आहे. नागरिकांची घालमेल होत असून पाण्याअभावी ग्रामीण भागात विदारक चित्र निर्माण झाले आहे. नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यात असलेल्या अंबाडी या गावात पिण्याचे पाणी मागितल्याच्या कारणावरून एका मनोरुग्णाने मिस्त्री काम करणाऱ्या एका युवकाच्या डोक्यात फावडा घालून त्याची हत्या केली. या हत्येनंतर किनवटमध्ये मोठा तणाव निर्माण झाला होता. संतप्त युवकांनी नारेबाजी करीत अत्यावश्यक सेवेसह सर्व दुकाने बंद पाडली. वाहनांची तोडफोड, दगडफेक या घटनेमुळे नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. २३ मे रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाणीटंचाईचा आढावा घेतला. संपूर्ण मराठवाड्यात दिवसेंदिवस टँकरची संख्या वाढत आहे. छत्रपती संभाजीनगर नंतर सर्वाधिक टँकर जालना जिल्ह्यात लागत आहेत. त्या ठिकाणी ४६२ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे, तर परभणी जिल्ह्यात २७, हिंगोली जिल्ह्यात सात, नांदेड जिल्ह्यात २१, धाराशिव जिल्ह्यात १३५, बीड जिल्ह्यात ४३०, तर लातूर जिल्ह्यात ३५ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -