Thursday, May 14, 2026

Maharashtra : राज्यातील १८३ तालुक्यांत पारा ४५ अंशांवर

Maharashtra : राज्यातील १८३ तालुक्यांत पारा ४५ अंशांवर

उष्णतेची तीव्र लाट; मागील वर्षीच्या तुलनेत जलसाठा मात्र समाधानकारक

मुंबई : मे महिन्याचा पंधरवडा उलटत असतानाच राज्याला उन्हाच्या तीव्र झळांनी वेढले आहे. अवघ्या आठ दिवसांपूर्वी केवळ २१ तालुक्यांपुरती मर्यादित असलेली ही 'हीट वेव्ह' आता तब्बल १८३ तालुक्यांपर्यंत विस्तारली असून राज्यातील २२ जिल्ह्यांमध्ये तापमानाचा पारा ४५ अंशांच्या पुढे गेला आहे. गुरुवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत आपत्ती व्यवस्थापन विभागाने सादर केलेल्या आकडेवारीतून राज्यावरील या अस्मानी संकटाची भीषणता समोर आली आहे.

राज्यात ५ ते १४ मे या कालावधीत उष्णतेची लाट सातत्याने तीव्र होत असल्याचे सादरीकरणात नमूद करण्यात आले. ११ मे रोजी १६ जिल्ह्यांतील ५१ तालुक्यांमध्ये ४५ अंश तापमानाची नोंद झाली होती, मात्र त्यानंतर अवघ्या दोन दिवसांत हा आकडा १८३ तालुक्यांपर्यंत पोहोचला आहे. दरम्यान, वाढत्या उष्म्यासोबतच राज्याच्या काही भागांत अवकाळी पावसाचाही तडाखा बसला असून, वीज कोसळून १० व्यक्तींसह २७ जनावरांचा मृत्यू झाला आहे.राज्यातील या वाढत्या उष्णतेच्या लाटेचा सामना करण्यासाठी प्रशासनाने संपूर्ण राज्याला सतर्कतेचा इशारा दिला आहे. उष्माघातापासून वाचण्यासाठी नागरिकांनी दुपारच्या वेळी बाहेर पडणे टाळावे आणि आवश्यक ती काळजी घ्यावी, अशा सूचना आरोग्य व आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिल्या आहेत.

जलसाठा समाधानकारक, पण धोक्याची घंटा

एककीकडे उन्हाचा तडाखा वाढत असताना दुसरीकडे पाणीसाठ्याबाबत मात्र राज्याला तूर्तास दिलासा मिळाला आहे. जलसंपदा विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील ३ हजार २८ धरणांमध्ये सध्या ३५ टक्के (५०३.७६ टीएमसी) उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे. मागील वर्षी याच काळात हे प्रमाण ३० टक्के इतके होते. मोठ्या, मध्यम आणि लघू अशा तिन्ही प्रकारच्या प्रकल्पांमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पाणीसाठा अधिक आहे. यंदा उन्हाची तीव्रता अधिक असली तरी 'एल निनो'च्या प्रभावामुळे मान्सून लांबणीवर पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. ही शक्यता लक्षात घेता, उपलब्ध पाणीसाठा समाधानकारक असला तरी तो जूनअखेरपर्यंत टिकवण्यासाठी नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा लागणार आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >