- वेस्ट इंडिजपासून ऑस्ट्रेलियापर्यंत थरारक मालिकांची मेजवानी
मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने म्हणजेच बीसीसीआय कडून गुरुवारी (२६ मार्च) भारतीय संघाच्या २०२६-२७ च्या देशांतर्गत आंतरराष्ट्रीय हंगामाचे वेळापत्रक जाहीर केले आहे. आगामी देशांतर्गत हंगामात रोमांचक आणि थरारक सामने पाहायला मिळणार आहेत. या हंगामात भारतीय संघ एकूण १७ शहरांमध्ये २२ आंतरराष्ट्रीय सामने खेळतील.
वेस्ट इंडिजच्या भारत दौऱ्याने हंगामाचा श्रीगणेशा :
या हंगामाची सुरुवात वेस्ट इंडिजच्या भारत दौऱ्याने होईल, जो २७ सप्टेंबर २०२६ रोजी सुरू होईल. या दौऱ्यात तीन एकदिवसीय आणि त्यानंतर पाच टी-२० सामन्यांचा समावेश असेल. एकदिवसीय सामने तिरुवनंतपुरम, गुवाहाटी आणि न्यू चंदीगड येथे खेळले जातील, त्यानंतर टी-२० सामने लखनौ, रांची, इंदूर, हैदराबाद आणि बंगळूरु येथे आयोजित केले जातील.
वेस्ट इंडीजचा भारत दौरा :
- पहिला एकदिवसीय सामना : २७ सप्टेंबर, तिरुवनंतपुरम
- दुसरा एकदिवसीय सामना : ३० सप्टेंबर, गुवाहाटी
- तिसरा एकदिवसीय सामना : ३ ऑक्टोबर, न्यू चंदीगड
- पहिला टी-२० सामना : ६ ऑक्टोबर, लखनऊ
- दुसरा टी-२० सामना : ९ ऑक्टोबर, रांची
- तिसरा टी-२० सामना : ११ ऑक्टोबर, इंदूर
- चौथा टी-२० सामना : १४ ऑक्टोबर, हैदराबाद
- पाचवा टी-२० सामना : १७ ऑक्टोबर, बंगळूर
त्यानंतर भारत डिसेंबर २०२६ मध्ये श्रीलंकेचे यजमानपद भूषवेल. या मालिकेत तीन एकदिवसीय आणि तीन टी-२० सामने असतील. एकदिवसीय सामने दिल्ली, बंगळूर आणि अहमदाबाद येथे, तर टी-२० सामने राजकोट, कटक आणि पुणे येथे खेळले जातील.
श्रीलंकेचा भारत दौरा :
- पहिला एकदिवसीय सामना : १३ डिसेंबर, दिल्ली
- दुसरा एकदिवसीय सामना : १६ डिसेंबर, बंगळूर
- तिसरा एकदिवसीय सामना : १९ डिसेंबर, अहमदाबाद
- पहिला टी-२० सामना : २२ डिसेंबर, राजकोट
- दुसरा टी-२० सामना : २४ डिसेंबर, कटक
- तिसरा टी-२० सामना : २७ डिसेंबर, पुणे
नवीन वर्षाच्या सुरुवातीला, झिम्बाब्वे संघ जानेवारी २०२७ मध्ये तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी भारताचा दौरा करेल. हे सामने कोलकाता, हैदराबाद आणि मुंबई येथे खेळले जातील.
या हंगामाची सांगता ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेने, म्हणजेच बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीने होईल. ही मालिका २१ जानेवारी २०२७ रोजी नागपूर येथे सुरू होईल. त्यानंतर चेन्नई, गुवाहाटी, रांची आणि अहमदाबाद येथे सामने खेळवले जाणार आहेत.






