Saturday, March 21, 2026

नवी मुंबईकरांवर वाढीव पाणीपट्टीचा बोजा?

नवी मुंबईकरांवर वाढीव पाणीपट्टीचा बोजा?

महापालिकेत पाणी दरवाढीचा प्रस्ताव

नवी मुंबई  : नवी मुंबई महापालिकेने शहरातील पाणी दर वाढवण्याचा प्रस्ताव सादर केला असून, यामुळे नागरिकांवर आर्थिक भार वाढण्याची शक्यता आहे. सध्या ३० हजार लिटर पाण्यासाठी केवळ ५० रुपये आकारले जात असताना, हा दर दुप्पट करून १०० रुपये करण्याचा प्रस्ताव सर्वसाधारण सभेपुढे ठेवण्यात आला आहे. महापालिकेला पाणीपुरवठा व्यवस्थापनात दरवर्षी सुमारे १७५ कोटी रुपयांचा तोटा सहन करावा लागत आहे. मोरबे धरण येथून पाणी उपसा, वाहतूक आणि शुद्धीकरणासाठी मोठा खर्च होत असून वीज, रसायने आणि देखभाल खर्च सातत्याने वाढत आहेत.

शहरात १ हजार ३९८ किमी लांबीचे जलवाहिनीचे जाळे असून त्यातील गळती, दुरुस्ती आणि कर्मचाऱ्यांचा खर्चही मोठा आहे. मोरबे धरणातून पाणीउपसा करणे आणि ६० किमीवरून शहरापर्यंत पाणी वाहून आणणे आणि भोकरपाडा केंद्रात शुद्धीकरण करणे यासाठी वीज आणि रसायनांचा खर्च सातत्याने वाढत आहे.

याशिवाय, नवी मुंबईतील दरडोई पाणी वापर राष्ट्रीय मानकांपेक्षा जास्त असल्याने पाण्याचा अपव्ययही वाढल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. दरवाढीमुळे नागरिक पाण्याचा वापर अधिक जबाबदारीने करतील, अशी अपेक्षा प्रशासनाने व्यक्त केली आहे. मात्र विरोधकांनी आधी गळती रोखावी, पाणी चोरी थांबवावी आणि कार्यक्षमता सुधारावी, अशी मागणी केली आहे. दरम्यान, हा प्रस्ताव राजकीयदृष्ट्या संवेदनशील ठरण्याची शक्यता असून अंतिम निर्णयाकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Comments
Add Comment