Sunday, March 15, 2026

Donald Trump : डोनाल्ड ट्रम्पची सारवासारव; इराणला युद्ध थांबवायचे आहे पण...

Donald Trump : डोनाल्ड ट्रम्पची सारवासारव; इराणला युद्ध थांबवायचे आहे पण...

इराण आणि अमेरिका-इस्रायल यांच्यातील संघर्ष दिवसेंदिवस अधिक तीव्र होत असल्याचे दिसत आहे. अशातच शनिवारी (१४ मार्च) इराणने सौदी अरेबियातील अमेरिकेच्या महत्त्वाच्या हवाई तळावर क्षेपणास्त्र हल्ला केला. या हल्ल्यात अमेरिकन हवाई दलाच्या हवेत इंधन भरणाऱ्या KC-135 स्ट्रॅटोटँकर प्रकारातील पाच विमानांचे मोठे नुकसान झाले.

KC-135 प्रकारची टँकर विमाने अमेरिकन हवाई दलाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची मानली जातात. या विमानांच्या मदतीने लढाऊ विमानांना हवेतच इंधन पुरवले जाते. एका KC-135R विमानाची किंमत साधारणपणे ३९.६ ते ५३ दशलक्ष डॉलर्स (सुमारे ३३० ते ४५० कोटी रुपये) इतकी आहे. त्यामुळे पाच विमानांचे नुकसान झाल्यास अमेरिकेला अंदाजे २५० ते ४०० दशलक्ष डॉलर्स (सुमारे २१०० ते ३३०० कोटी रुपये) इतका आर्थिक फटका बसला आहे.

अशी परिस्थिती असूनही आम्ही युद्धात खूप चांगल्या परिस्थितीत आहोत, आम्ही इराणवर भारी पडतोय आणि इराणला युद्ध थांबवायचे आहे पण आम्ही तयार नाही अशी विधानं करून डोनाल्ड ट्रम्प वारंवार सारवासारव करत आहेत.

डोनाल्ड ट्रम्प यांनी सध्या तरी इराणसोबत युद्ध समाप्त करण्यासाठी कोणत्याही करारास आपण तयार नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यांच्या मते, इराण करार करू इच्छित आहे, मात्र सध्या असलेल्या अटी पुरेशा नाहीत. तथापि, त्या अटी नेमक्या काय असतील याबाबत त्यांनी कोणतीही माहिती दिली नाही.

माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत ट्रम्प म्हणाले की, जर कोणताही करार झाला तर त्यामध्ये इराणने आपला अणु कार्यक्रम पूर्णपणे बंद करणे ही अट निश्चितपणे असेल. त्यांनी असेही सांगितले की, स्ट्रेट ऑफ होर्मुजच्या सुरक्षेसाठी ते अनेक देशांसोबत मिळून योजना तयार करत आहेत. हा समुद्री मार्ग तेलवाहू जहाजांसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. युद्धामुळे या मार्गावर तणाव वाढल्याने जगभरात तेलाच्या किंमती वाढल्या आहेत.

ट्रम्प यांनी सांगितले की अनेक देशांनी या जलमार्गाच्या सुरक्षेसाठी मदत करण्याची तयारी दर्शवली आहे. चीन, फ्रान्स, जपान, दक्षिण कोरिया आणि युनायटेड किंगडम यांसारखे देशही जहाजांची सुरक्षित वाहतूक सुनिश्चित करण्यासाठी आपली युद्धनौका पाठवू शकतात, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा