उपमहापौरांना ६५ हजार, तर विरोधी पक्षनेत्याला ५० हजार
विरार : वसई-विरार महानगरपालिकेच्या पदाधिकाऱ्यांना नियमानुसार विविध सोयीसुविधा पुरविल्या जाणार आहेत. महापौर यांना वाहन प्रतिपूर्ती भत्ता म्हणून दर महिन्याला ७५ हजार रुपये दिल्या जातील. तसेच उपमहापौर यांना ६५ हजार, स्थायी समिती सभापती ५५ हजार, विरोधी पक्षनेता आणि सभागृह नेत्याला ५० हजार, तर इतर सर्व सभापतींना वाहन प्रतिपूर्ती भत्ता म्हणून प्रत्येक महिन्याला ४५ हजार रुपये दिले जाणार आहेत.
स्थानिक स्वराज्य सस्थांमध्ये ग्रामपंचायत सरपंचांपासून, नगराध्यक्ष, जिल्हा परिषद अध्यक्ष, महापौर अशा सर्व लोकप्रतिनिधींना त्यांच्या अडीच किंवा पाच वर्षांच्या कालावधीत मानधन तसेच विविध सोयी सुविधा देण्यात येतात. अनेक शहरांमध्ये महापौर,उपमहापौर, स्थायी समिती सभापती, विरोधी पक्षनेता यांच्यासाठी शासकीय निवासस्थान देखील आहेत. वसई-विरारमध्ये पदाधिकाऱ्यांसाठी अद्याप शासकीय निवासस्थान उपलब्ध नाही. या ठिकाणी प्रशस्त अशी नवीन प्रशासकीय इमारत बांधण्यात आली आहे. या इमारतीत गेल्या दोन वर्षांपासून प्रशासनाचे कामकाज सुरू आहे. मात्र नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना या इमारतीत बसण्याची संधी ३ फेब्रुवारीपासून मिळणार आहे. त्या अनुषंगाने प्रशासनाने सर्व पदाधिकाऱ्यांचे दालन सज्ज केले आहेत. दरम्यान, वसई-विरार महापालिकेत २०१६ पूर्वी महापौर यांना ४५ हजार रुपये वाहन प्रतिपूर्ती भत्ता देण्यात येत होता. तर उपमहापौर, स्थायी समिती सभापती यांना ४० हजार आणि विरोधी पक्षनेता यांना ३७ हजार अशा प्रकारे वाहन भत्ता देण्यात येत होता. २०१६ पासून प्रतिपूर्ती भत्त्यात वाढ करण्यात आली आहे. त्यानुसार आता ९ प्रभाग समिती सभापतीसह, महिला व बालकल्याण समिती सभापती, वैद्यकीय आरोग्य साहाय समिती सभापती,परिवहन समिती सभापती, सभागृह नेता, विरोधी पक्षनेता, स्थायी समिती सभापती, उपमहापौर आणि महापौर यांना वाढीव दरानुसार वाहन प्रतिपूर्ती भत्ता देण्यात येणार आहे.
१२५ सदस्यांना १० हजार रुपये मानधन महापालिकेच्या वर्गवारीनुसार तेथील नगरसेवकांना मानधन दिले जाते. राज्यातील २९ महापालिकांपैकी चार महापालिका क वर्गात समाविष्ट आहेत. यामध्ये वसई-विरार महापालिकेचा समावेश आहे. त्यामुळे येथील नगरसेवकांना दरमहा १० हजार रुपये मानधन महापालिकेकडून त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे. पालिकेच्या निवडणुकीत निवडून आलेल्या ११५ नगरसेवकांसह स्वीकृत १० नगरसेवकांना सुद्धा सदर मानधन देण्यात येणार आहे. यासाठी पालिकेचा नगरसेवकांच्या मानधनावर प्रत्येक महिन्याला १२ लाख ५० हजार एवढा खर्च होणार आहे.
आयुक्तांनाही महापौरांप्रमाणे वाहन भत्ता महापालिकेच्या आयुक्तांना सुद्धा महापौर यांच्या प्रमाणेच ७५ हजार वाहन प्रतिपूर्ती भत्ता देण्यात येतो. तसेच अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त, मुख्य लेखा व वित्त अधिकारी, उपसंचालक नगररचना, सहायक आयुक्त, शहर अभियंता, कार्यकारी अभियंता, मुख्य वैद्यकीय अधिकारी आणि विभाग प्रमुखांना सुद्धा ४० ते ४५ हजार रुपये वाहन प्रतिपूर्ती भत्ता प्रत्येक महिन्यात दिल्या जातो.






