Friday, January 30, 2026

Ajit Pawar's Plane Crash : अजित पवारांच्या विमानाच्या अपघाताची सीआयडी चौकशी; राज्य सरकारचे आदेश

Ajit Pawar's Plane Crash : अजित पवारांच्या विमानाच्या अपघाताची सीआयडी चौकशी; राज्य सरकारचे आदेश

मुंबई : राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर राज्य सरकारने या प्रकरणाच्या सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत. या दुर्घटनेची सीआयडीमार्फत चौकशी करण्यात येणार असून, अपघातामागची नेमकी कारणे शोधण्यावर भर दिला जाणार आहे. या पार्श्वभूमीवर बारामती पोलीसांना अपघातस्थळावर कोणालाही प्रवेश न देण्याच्या स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत. बुधवारी (दि. २८) झालेल्या विमान दुर्घटनेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे दुर्दैवी निधन झाले. गुरुवारी अत्यंत शोकाकूल वातावरणात शासकीय इतमामात त्यांना अखेरचा निरोप देण्यात आला. विद्या प्रतिष्ठानच्या प्रांगणात झालेल्या अंत्यसंस्कारावेळी त्यांचे चिरंजीव पार्थ पवार आणि जय पवार यांनी पार्थिवाला मुखाग्नि दिला. ‘अजित दादा अमर रहे’च्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. त्यांच्या निधनाने राज्यभर शोककळा पसरली असून, शासनाकडून तीन दिवसांचा शासकीय दुःखवटा पाळण्यात आला. दरम्यान, अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या तपासासंदर्भात महत्त्वाची माहिती समोर आली आहे. राज्य सरकारने या दुर्घटनेची चौकशी सीआयडीकडे सोपवली असून, बारामती पोलीस ठाण्यात नोंद असलेल्या एक्सिडेंटल डेथ रिपोर्टच्या अनुषंगाने तपास केला जाणार आहे. याआधीच फॉरेन्सिक पथकाने अपघातस्थळी भेट देत विविध नमुने तपासणीसाठी गोळा केले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, हे विमान २८ जानेवारी रोजी सकाळी ८.१८ वाजता प्रथमच बारामती एअर ट्रॅफिक कंट्रोलच्या संपर्कात आले. त्या वेळी वैमानिकांना सध्या वाऱ्याचा वेग कमी असून दृश्यमानता सुमारे ३ हजार मीटर असल्याची माहिती देण्यात आली. त्यानंतर पायलटने विमान रनवे क्रमांक ११ च्या दिशेने येत असल्याचे सांगितले; मात्र रनवे स्पष्टपणे दिसत नसल्याचेही त्यांनी कळवले. रनवे दिसू लागल्यानंतर माहिती देतो, असे पायलटने एटीसीला सांगितले होते. सकाळी ८.४३ वाजता रनवे क्रमांक ११ लँडिंगसाठी पूर्णतः सज्ज करण्यात आला. मात्र त्यानंतर पायलटकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. काही क्षणांतच धावपट्टीच्या डाव्या बाजूला अचानक ज्वाळा आणि धुराचे लोट उठताना दिसले, अशी माहिती एटीसीवर कार्यरत असलेल्या एका अधिकाऱ्याने दिली आहे. या संपूर्ण घटनेचा तपशीलवार तपास आता सीआयडीकडून करण्यात येणार आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >