टी-२० वर्ल्ड कपमध्ये उतरणारा भारताची तगडी सेना
मुंबई : येत्या ७ फेब्रुवारीपासून मायदेशात सुरू होणाऱ्या टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत जेतेपद कायम राखण्यासाठी भारतीय संघ मैदानावर उतरणार आहे. या स्पर्धेत भारताला पाकिस्तान, नामिबिया व नेदरलँड्सचा सामना करणार आहे. घरच्या मैदानावर खेळण्याचा फायदा असला तरी, जेतेपदाचे प्रचंड दडपण संघावर आहे. न्यूझीलंडविरुद्धची टी-२० मालिका ही वर्ल्ड कपच्या तयारीची शेवटची संधी होती, ज्यात भारताला काही प्रश्नांची उत्तरे मिळाली, तर काही नवीन चिंता निर्माण
झाल्या आहेत. एखाद्या सामन्यात अपयश येऊ शकते, मात्र सलग चार सामन्यांत एकाच प्रकारच्या चुकीची पुनरावृत्ती होत असेल, तर ती गंभीर बाब आहे. भारतीय संघाच्या सलामी जोडीतील सातत्यपूर्ण अपयशामुळे आता संघ व्यवस्थापनासमोर मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. मालिका विजयामुळे पहिल्या तीन सामन्यांतील खराब सुरुवातीकडे दुर्लक्ष करण्यात आले. मात्र, चौथ्या सामन्यातील पराभवानंतर संघाचे हे कच्चे दुवे स्पष्टपणे समोर आले आहेत. मधल्या फळीने डाव सावरल्यामुळे विजय मिळत असले, तरी सलामीच्या जोडीचे अपयश आगामी विश्वचषकात भारताला महागात पडू शकते.
शुभमन गिलची निवड न झाल्याने संजू सॅमसन हा सलामीवीर म्हणून आघाडीवर आला, परंतु त्यालाही सातत्याने अपयश आलेले दिसतेय. त्यामुळे इशान किशनला वर्ल्ड कपमध्ये अभिषेक शर्मासह सलामीला संधी मिळू शकते. इशानने संघात पुनरागमन करताना धडाकेबाज खेळी केली आहे. इशान-अभिषेक ही जोडी प्रतिस्पर्धी गोलंदाजांची लय बिघडवण्यास समर्थ आहे. तिलक वर्मा दुखापतीतून पूर्णपणे बरा झाला असून तो तिसऱ्या क्रमांकावर खेळेल. चौथ्या स्थानावर सूर्यकुमार यादव खेळणार आहे. त्यानंतर हार्दिक पांड्या व शिवम दुबे हे अष्टपैलू खेळाडू आहेतच.
भारताचा १५ सदस्यीय टी-२० विश्वचषक संघ :
फलंदाज : सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, रिंकू सिंग.
यष्टिरक्षक : संजू सॅमसन, इशान किशन.
अष्टपैलू : हार्दिक पांड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल (उपकर्णधार), वॉशिंग्टन सुंदर.
गोलंदाज : जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, वरुण चक्रवर्ती, कुलदीप यादव, हर्षित राणा.
भारतीयांच्या आशा
आणखी उंचावल्या
सूर्यकुमारचा फॉर्म परतल्याने भारतीयांच्या आशा आणखी उंचावल्या आहेत. पांड्या व दुबे यांनीही सातत्य दाखवले आहे. फिरकी अष्टपैलू म्हणून अक्षर पटेल संघात दिसेल, तर जलदगती गोलंदाजीची जबाबदारी जसप्रीत बुमराह व अर्शदीप सिंग यांच्या खांद्यावर असेल. स्पेशालिस्ट फिरकीपटू म्हणून वरुण चक्रवर्थीचे पारडे जड आहे आणि त्यामुळे कुलदीप यादवला संधी मिळण्याची फार शक्यता नाही. रिंकू सिंग किंवा हर्षित राणा यापैकी एकाला संधी मिळू शकते.