Thursday, January 29, 2026

हातातील ‘घड्याळ’ हीच ठरली शेवटची ओळख!

हातातील ‘घड्याळ’ हीच ठरली  शेवटची ओळख!

पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह पाच जणांचा बुधवारी सकाळी बारामती येथे झालेल्या भीषण विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. या अपघाताने महाराष्ट्र हादरला असून राज्यावर शोककळा पसरली आहे. या अपघातात मृतदेहांची ओळख पटवणेही कठीण झाले होते. हातातील घड्याळावरून अजित दादांची ओळख पटल्याचे समोर आले आहे.

अपघात झाला तेव्हा जवळच असलेल्या ग्रामस्थांनी मदतीसाठी धाव घेतली. एका महिलेने घटनेचे वर्णन करताना सांगितले की, ‘आम्ही आमच्या म्हशींजवळ होतो. स्फोट व आगीच्या ज्वाळा इतक्या भयानक होत्या की आम्ही बादल्यांमध्ये पाणी घेऊन धावत सुटलो. तिथे मृतदेह विखुरलेले होते. एका मृतदेहाचे शिर धडावेगळे झाले होते. आम्ही ब्लँकेट आणि कपडे आणले आणि ते विखुरलेले मृतदेह झाकले. पोलिसांना येण्यासाठी वेळ लागणार होता, तोपर्यंत आम्ही तिथे उभे होतो.’

आगीमुळे ओळख पटणे मुश्कील

अपघात इतका भीषण होता की, मृतदेहांची अवस्था पाहून उपस्थितांचा थरकाप उडाला. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून १५-२० मिनिटांत आग आटोक्यात आणली. मृतदेहांचे चेहरे ओळखता येत नव्हते, एक मृतदेह पूर्णपणे जळालेला आणि सुजलेला होता. मात्र, त्या मृतदेहाच्या हातातील घड्याळावरून हा मृतदेह उपमुख्यमंत्री अजित पवार यांचाच असल्याचे पोलीस आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांना स्पष्ट झाले. योगायोगाने, ‘घड्याळ’ हेच त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत निवडणूक चिन्ह आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >