परमेश्वराने सारासारविवेकसंपन्न, सर्वोत्कृष्ट, दुर्लभ असा जो नरदेह दिला त्यात, प्रत्येक मानवाने स्वस्वरूपाचे ज्ञान करून घेऊन अखंड आनंद भोगावा हाच एक त्याचा उद्देश आहे. पण नरदेहाचे महत्त्व न कळल्यामुळे त्याचा उपयोग केवळ विषयभोगासाठीच असे मनुष्य समजतो. त्यामुळे दु:संगतीच्या योगे वासनेच्या आधीन होऊन मनुष्य पशूप्रमाणे आहार, निद्रा, भय व मैथुनादी गोष्टींच्या मागे लागतो आणि तेणेकरून देवाने दिलेल्या देणगीचे त्यास पूर्ण विस्मरण होते. जपाच्या सुरुवातीला व पूर्णतेला स्मरणीतील मेरुमणी जसा कारणीभूत असतो त्याप्रमाणे चौऱ्यांशी लक्ष योनी असो किंवा इंद्रचंद्रादी उच्च योनी असो, त्या प्राप्त होण्यासाठी जे कर्म करावे लागते त्याचे मुख्य ठिकाण नरदेह हेच होय. नरदेह हा शेताप्रमाणे आहे. शेतामध्ये मिरच्यांची लागवड केली तर मिरची पिकते आणि उसाची लागवड केली असता ऊस पिकतो. त्याप्रमाणे मनुष्याने नरदेहात येऊन कुकर्म केले असता त्याला जन्ममरणाच्या चक्रात सापडावे लागते आणि सुकर्म केले तर तो ईशकृपा संपादन करू शकतो.
देह हा मातापितरांच्या रक्त व रेताने तयार झालेला आहे. हाडामांसाचा पिंजरा आहे. स्नायु-मांसाने भरलेला, चर्माने वेष्टिलेला, अस्थिपंजर असून क्षणभंगूर म्हणजे नाश पावणारा आहे. सकाळी उठल्याबरोबर नाक, डोळे, तोंड इत्यादी सर्व द्वारे घाणीने भरलेली असतात. तोंड धुतल्याशिवाय तसेच स्नान केल्याशिवाय त्याला शुचिर्भूतपणा येत नाही. लहानपणात जो देह गोंडस व सुंदर दिसतो त्याचे ते रूप दिवसेंदिवस बदलत जाऊन म्हातारपणी सर्वांगाला सुरकुत्या पडून अगदीच तो वेगळा दिसू लागतो. या संधीत मूत्रविकार, हृदयविकार, पक्षवात, रक्तदाब, आम्लपित्त, जलोदर, क्षय, अपस्मारादी रोग त्यास छळण्यास टपून असतात. करिता, त्याच्या ध्यानात निमग्न राहून मनुष्य सुखी होऊ शकत नाही. एकंदरित देह हा सर्व प्रकारे त्याज्य आहे. तरी आत्मदेवाची ओळख करून घेण्यास देहाशिवाय दुसरे साधन नसल्याने देह हा सर्वश्रेष्ठ गणला जात आहे. याकरिता देह त्याज्य म्हणून त्याकडे संपूर्ण दुर्लक्षही करू नये आणि ग्राह्य म्हणून त्याचे चोचले पुरविण्यात मग्नही राहू नये. देह हा केवळ आत्मोद्धाराचे साधन आहे ही जागृती सदैव ठेवून देहाच्या जोपासनेकडेही लक्ष पुरवावे आणि देहापासून आपले ध्येय गाठण्याचे कार्यही आपण साधून घ्यावे.





