Thursday, January 29, 2026

संजय गांधी.. माधवराव सिंधिया ते अजितदादा; विमान अपघातात देशाने मोठे नेते गमविले

संजय गांधी.. माधवराव सिंधिया ते अजितदादा; विमान अपघातात देशाने मोठे नेते गमविले

नवी दिल्ली : बारामती येथे झालेल्या विमान अपघातात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली आणि अपघाती निधनामुळे देशातील विमान अपघातांत मृत्युमुखी पडलेल्या राजकीय नेत्यांच्या आठवणी पुन्हा एकदा ताज्या झाल्या आहेत. गेल्या सुमारे ४६ वर्षांत, काँग्रेस नेते संजय गांधी यांच्या अपघाती मृत्यूपासून ते आताच्या या घटनेपर्यंत अनेक नामवंत नेत्यांना हवाई अपघातांत आपले प्राण गमवावे लागले आहेत. आतापर्यंत लोकसभेचे तत्कालीन अध्यक्ष, दोन तत्कालीन मुख्यमंत्री, एक माजी मुख्यमंत्री, विविध राज्यांतील तीन मंत्री आणि एका केंद्रीय मंत्र्याचा अशा अपघातांत मृत्यू झाला आहे.

  1. विजय रुपाणी (२०२५) : गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचा १२ जून २०२५ रोजी अहमदाबाद येथे झालेल्या भीषण विमान अपघातात मृत्यू झाला. लंडनसाठी रवाना झालेले एअर इंडियाचे बोईंग ड्रीमलाईनर विमान अहमदाबाद विमानतळावरून उड्डाणानंतर अवघ्या काही मिनिटांतच कोसळले. प्रवासी, विमानातील कर्मचारी तसेच ज्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या परिसरात विमान कोसळले तेथील नागरिक मिळून सुमारे २६५ जणांचा या अपघातात मृत्यू झाला. डीएनए तपासणीद्वारे विजय रुपाणी यांच्या पार्थिवाची ओळख पटविण्यात आली.
  2. दोर्जी खांडू (२०११) : अरुणाचल प्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री दोर्जी खांडू आणि अन्य चार जणांचा ३० एप्रिल २०११ रोजी हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू झाला. तवांगहून इटानगरकडे जात असताना पश्चिम कामेंग जिल्ह्यात हे हेलिकॉप्टर अपघातग्रस्त झाले. उड्डाणानंतर काही वेळातच हेलिकॉप्टरचा संपर्क तुटला होता. हिमालयाच्या घनदाट डोंगररांगांमध्ये बेपत्ता झालेले हेलिकॉप्टर अनेक दिवसांच्या शोधमोहीमेनंतर सापडले. या अपघातात खांडू यांच्यासह अन्य चौघांचा मृत्यू झाला.
  3. वाय. एस. राजशेखर रेड्डी (२००९) : आंध्र प्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री वाय. एस. राजशेखर रेड्डी यांचा २ सप्टेंबर २००९ रोजी हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू झाला. हैदराबादहून चित्तूरकडे जात असताना बेल-४३० हेलिकॉप्टरचा प्रवासादरम्यान संपर्क तुटला. मोठ्या शोधमोहीमेनंतर नल्लामला जंगल परिसरात हेलिकॉप्टरचे अवशेष सापडले. या अपघातात रेड्डी यांच्यासह पाच जणांचा मृत्यू झाला. खराब हवामान, मुसळधार पाऊस आणि कमी दृश्यमानता ही अपघाताची प्रमुख कारणे असल्याचे तपासात निष्पन्न झाले.
  4. ओ. पी. जिंदाल आणि सुरेंद्र सिंह (२००५) : उद्योगपती तसेच हरियाणाचे ऊर्जा मंत्री ओमप्रकाश जिंदाल आणि कृषी मंत्री सुरेंद्र सिंह यांचा ३ मार्च २००५ रोजी हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू झाला. दिल्लीहून चंदीगडच्या दिशेने निघालेले हे हेलिकॉप्टर उत्तर प्रदेशातील सहारनपूर येथे कोसळले. तांत्रिक बिघाड आणि कमी दृश्यमानतेमुळे हा अपघात झाल्याचे तपासात उघड झाले. ओ. पी. जिंदाल हे जिंदाल समूहाचे संस्थापक होते.
  5. जी. एम. सी. बालयोगी (२००२) : लोकसभेचे तत्कालीन अध्यक्ष आणि तेलुगु देशम पक्षाचे नेते जी. एम. सी. बालयोगी यांचा ३ मार्च २००२ रोजी हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू झाला. आंध्र प्रदेशातील कृष्णा जिल्ह्यात कायकलूरजवळील तलावात हे हेलिकॉप्टर कोसळले. खराब हवामान आणि कमी दृश्यमानतेमुळे हा अपघात झाल्याचे निष्पन्न झाले. सर्वात कमी वयाचे लोकसभा अध्यक्ष ठरलेले बालयोगी त्यांच्या निष्पक्षतेमुळे ओळखले जात होते.
  6. सायप्रियन संगमा (२००४) : मेघालयचे ग्राम विकास मंत्री सायप्रियन संगमा आणि अन्य नऊ जणांचा २२ सप्टेंबर २००४ रोजी हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू झाला. गुवाहाटीहून शिलाँगकडे जात असताना बारापाणी तलावाजवळ हा अपघात झाला.
  7. माधवराव शिंदे (२००१) : ज्येष्ठ काँग्रेस नेते आणि तत्कालीन नागरी विमान वाहतूक मंत्री माधवराव शिंदे यांचा ३० सप्टेंबर २००१ रोजी मृत्यू झाला. कानपूर येथे राजकीय सभेसाठी जात असताना उत्तर प्रदेशातील मैनपुरी येथे त्यांचे खासगी विमान कोसळले. इंजिनातील बिघाड आणि खराब हवामानामुळे हा अपघात झाल्याचे तपासात स्पष्ट झाले.
  8. संजय गांधी (१९८०) : माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे पुत्र आणि काँग्रेस नेते संजय गांधी यांचा २३ जून १९८० रोजी विमान अपघातात मृत्यू झाला. स्वतंत्र भारताच्या इतिहासात एखाद्या प्रमुख राजकीय नेत्याचा हवाई अपघातात मृत्यू झाल्याची ही पहिली घटना ठरली. १९७० च्या दशकात भारतीय राजकारणातील प्रभावी नेते म्हणून संजय गांधी ओळखले जात होते.
Comments
Add Comment