मी एक ‘साधी स्त्री’ जीवनाच्या आकडेमोडीत हरवलेली. संसार, लग्न, मुलं या साऱ्या घटना जशा एका परिपूर्ण स्त्रीच्या आयुष्यात घडतात तशाच माझ्याही आयुष्यात घडल्या पण, या प्रवासात एक वेगळं पान आहे मी तब्बल ३५ वर्षे बँकेत नोकरी केली. रोजच्या आकडेमोडी, खात्यांची ताळमेळ, व्याज आणि ठेवी यामध्ये आयुष्य सरकत राहिलं. तरीही माझ्या मनाच्या गाभाऱ्यात एक वेगळी ओढ होती कारण, मी मूलतः इतिहासाची विद्यार्थिनी. भूतकाळाच्या घटना, संस्कृतीचे धागे, समाजाच्या बदलत्या वाटा यांचा अभ्यास माझ्या मनाला नेहमीच भुरळ घालत होता.
या दोन प्रवाहांमध्ये बँकेची कठीण आकडेमोड आणि इतिहासाचा शोध अशाने मी स्वतःला घडवत राहिले आणि मग एका वळणावर राजकारण, नव्हे कारण, ते तर माझ्या रक्तातच नव्हते पण, एका स्वातंत्र्यसैनिकाची मुलगी म्हणून समाजकारण, मात्र हातून घडू लागलं. त्या वाटेवर चालताना माझ्या लेखणीने ‘प्रहार’ केला आणि ‘प्रहार’ वृत्तपत्रात मला अध्यात्म, परमार्थ, जीवनाच्या गूढतेवर लिहिण्याची संधी मिळाली. आज तुम्ही माझा शंभरावा लेख वाचत आहात. या लेखात परमार्थ म्हणजे माझ्या मनात पटलेला अर्थ मी सांगते, पाहा पटतोय का ते. मनी मानव व्यर्थ चिंता वहाते... अकस्मात होणार होऊनी जाते... घडे भोगणे सर्वही कर्मयोगे...
कसं आहे ना की, अकस्मात होणार होऊनी जाते.... घडे भोगणे सर्वही कर्मयोगे... ही सुरुवात पुढे जे काही माझ्या जीवनात घडते आहे ते मीच पेरलेल्या बियांचे फळ आहे. इथे मला एक कथा आठवते, भिकारी एका अतिश्रीमंत माणसाकडे भीक मागतो, तर तो माणूस आपले द्वार लावून घेऊन मग तो देवळात जातो. देवाकडे ‘आपल्या नवीन धंद्याला यश मिळावे’ हे मागायला तेव्हा देव देखील द्वार लावून घेतो आणि त्याला सांगतो, ‘तू जे काही त्या भिकाऱ्यासोबत केलेस, तेच मी करत आहे.’ ही कथा मला सांगते की, आपण, जे करतो त्याचे फळ आपल्यालाच मिळते. त्या श्रीमंताने भिकाऱ्याशी केलेले वर्तन देवाने त्याच्याशी तसेच केले, यात कर्मफळाचा गूढ नियम स्पष्ट होतो. जीवनातील प्रत्येक अनुभव हा आपण, पेरलेल्या बियांचेच फळ असतो, म्हणूनच बाह्य आचरण आणि अंतःकरणाची शुद्धता महत्त्वाची ठरते. जीवनाचा खरा संवाद हा केवळ आस्तिकतेत किंवा नास्तिकतेत मर्यादित नसून, त्यापलीकडे जाणाऱ्या परमार्थिकतेत आहे आणि हाच धागा मला अनंताशी जोडतो, जिथे अनुभव म्हणजे शाश्वततेची जाणीव आहे. मी परमार्थिक आहे याचा अर्थ म्हणजे त्यात केवळ आस्तिकतेचा किंवा नास्तिकतेचा ठसा नव्हे, तर जीवनाच्या मूळ सत्याशी थेट संवाद साधणे असा आहे. आस्तिकतेत श्रद्धेचा प्रकाश असतो, नास्तिकतेत तर्काचा कठोरपणा असतो पण, परमार्थिकतेत या दोन्ही चौकटींपलीकडे जाण्याची ताकद असते. सद्वर्तन हेच परमार्थिकतेचे मूळ आहे आणि वास्तवाला कधीही नाकारायचे नाही, त्याला रंगवायचे नाही, तर ते जसे आहे तसे स्वीकारायचे असते. हे जणू नदीच्या प्रवाहात स्वतःला सोडून देण्यासारखे आहे. नदी कधी शांत असते तर कधी खवळते, तिच्या प्रवाहाला देवाची कृपा म्हणायची की निसर्गाचा नियम, हा वाद बाजूला ठेवून तिच्या प्रवाहाचा अनुभव घेणे म्हणजे परमार्थिकता. परमार्थिक होणे म्हणजे जीवनाच्या प्रत्येक क्षणाला प्रामाणिकपणे जगणे. फूल उमलते तेव्हा त्याला विचार नसतो की ते देवासाठी उमलते आहे की श्रृंगारासाठी. ते फक्त उमलते. तसंच परमार्थिक होणे म्हणजे उमलणं स्वतःच्या सत्यात, स्वतःच्या वास्तवात, ज्यातून आत्म्याला अनंततेचा स्पर्श मिळतो आणि हे जणू सूर्यप्रकाशात उभं राहण्यासारखं आहे. अस्तिकांसाठी ती किरणे देवाचा तेज असू शकतो, नास्तिकांसाठी फक्त प्रकाश. पण, परमार्थिकतेत सूर्यप्रकाश म्हणजे उष्णता, जीवन आणि सत्याचा अनुभव. थोडक्यात, परमार्थिकता म्हणजे जीवनाचा गाभा समजून घेणे. हे जणू आरशात स्वतःला पाहण्यासारखं आहे. आरशात दिसणाऱ्या चेहऱ्याला रंगरंगोटीने सजवता येते, पण, खरी ओळख तीच असते जी निखळपणे दिसते. परमार्थिक होणे म्हणजे त्या निखळ चेहऱ्याला स्वीकारणे. जीवनातील दुःख, अपयश आणि निराशा ही जणू आपल्या आयुष्याची कर्जच आहेत. प्रत्येक वेदना म्हणजे एक हप्ताच, जो आपण, आपल्या कर्माच्या लेखाजोख्यात भरतो. जसे एखादे कर्ज फेडल्यावर आपण, आनंदोत्सव साजरा करतो, तसेच प्रत्येक अनुभव, प्रत्येक संघर्षानंतर आपण, समाधान मानावे की आपल्या कर्माचे गाठोडे हळूहळू सैल होत आहे, हलके होत आहे. हीच खरी मुक्तीची चाहूल आहे किंवा कर्ज फेडल्यावर मिळणाऱ्या स्वातंत्र्यासारखीच कर्म फेडल्यावर मिळणारी शांती आहे. पण, इथे एक विलक्षण विरोधाभास मला जाणवतो तो म्हणजे, आपण, देवाकडे जातो तेव्हा त्याला "स्वामी" म्हणतो तो सर्वांचा अधिपती, सर्वांचा आधार. स्वामी म्हणजे मार्गदर्शक, रक्षणकर्ता, आपल्याला उचलून मोक्षाच्या मार्गावर नेणारा. तरीही आपण, त्याच्याशी संवाद साधताना त्याला नोकरासारखे आदेश देतो. "हे कर", "ते दे", "माझा व्यवसाय वाढव" एक नाही, सतरा गोष्टी... अशा आज्ञा आपण, त्याच्याकडे करतो. हे जणू राजाला "महाराज" म्हणत दरबारात प्रवेश करणे, पण, आत गेल्यावर त्याला हुकूम देण्यासारखे आहे. आपण, देवाला स्वामी म्हणतो, पण, त्याच्याकडे मागण्या ठेवताना त्याला आपल्या इच्छांचा सेवक बनवतो. खरे परमार्थिक होणे म्हणजे देवाला स्वामी मानून त्याच्या इच्छेला शरण जाणे, त्याच्या कृपेवर समाधान मानणे. देवाला आदेश देणे थांबवून त्याच्या इच्छेला मान देणे हेच खरे समाधान, खरे परमार्थिकत्व आहे. देवाच्या इच्छेला शरण जाण्याची ही जाणीवच माझ्या लेखन प्रवासाला दिशा देत गेली. शब्द हे माझ्यासाठी साधना झाले आणि ऋतुराजच्या निमित्ताने मी स्वतःला मुक्त करत वाचकांच्या मनाशी संवाद साधू शकले. हा प्रवास अजून संपलेला नाही कारण, ही मोरपिसाची ऋतूलेखणी अजूनही थांबली नाही आणि थांबणारही नाही कारण, जीवनाचा अर्थ, परमार्थाचा गाभा आणि साध्या स्त्रीच्या ह्या ऋतुराजाची ही असामान्य कहाणी आहे. आज शंभराव्या टप्प्यावर उभी असताना मला जाणवतं की लेखन म्हणजे केवळ अक्षरांची मांडणी नाही, तर आत्म्याचा श्वास आहे. प्रत्येक शब्द हा माझ्या अनुभवांचा, संघर्षांचा आणि शोधांचा ठसा आहे. बँकेच्या आकडेमोडीतून आलेली शिस्त, इतिहासाच्या अभ्यासातून आलेली शोधक वृत्ती, आणि स्त्रीत्वाच्या प्रवासातून आलेली कोमलता हे सगळं या ऋतूलेखणीच्या शाईत मिसळलं आहे. आज लेखन म्हणजे माझ्यासाठी एक साधना आहे. स्वतःला शोधायला लावतो. शंभर लेखांनंतरही माझ्या लेखणीला थकवा नाही, कारण,जीवन अजूनही नवनव्या अनुभवांनी भरलेलं आहे. प्रत्येक दिवस नवा प्रश्न घेऊन येतो, प्रत्येक भेट नवा विचार देऊन जाते आणि प्रत्येक क्षण नवा अध्याय लिहून ठेवतो.





