बारामतीजवळ झालेल्या अत्यंत दुर्दैवी विमान अपघातात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह पाच जणांचे निधन झाल्याच्या वृत्ताने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. या बातमीमुळे राज्याच्या राजकीय पटलावर कधीही न भरून निघणारी पोकळी निर्माण झाली असून संपूर्ण राज्यावर शोककळा पसरली आहे. अजित दादांच्या निधनाची बातमी समजताच पत्नी सुनेत्रा पवार, जय पवार आणि खासदार सुप्रिया सुळे दिल्लीहून बारामतीत दाखल झाले. विमानतळावर पोहोचल्यावर सुनेत्रा पवार, सुप्रिया सुळे यांना अश्रू अनावर झाले. सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार बारामती विमानतळावर दाखल झाले तेव्हा वातावरण भावुक झालं होतं.
बारामतीचा विकास हा शरद पवार यांच्यासोबतच अजित पवार यांच्या नावाशीही जोडला जातो. पाणी, शिक्षण, उद्योग आणि पायाभूत सुविधा या क्षेत्रांत त्यांनी ठोस कामगिरी करून त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली. जाणून घेऊया अजितदादा यांच्या काही खास गोष्टी
१) कुटुंब आणि वैयक्तिक आयुष्य :
अजित पवार यांच्या पश्चात पत्नी सुनेत्रा पवार आणि दोन मुले पार्थ आणि जय पवार हे आहेत. डिसेंबरमध्ये त्यांच्या मुलाचे लग्न झाले होते. राजकीय जीवनात व्यस्त असतानाही कुटुंबाशी असलेले नाते त्यांनी कायम जपले.
२) चार मुख्यमंत्र्यांसोबत उपमुख्यमंत्री :
अजित पवार हे महाराष्ट्राच्या राजकारणातील एकमेव असे नेते ठरले, ज्यांनी चार वेगवेगळ्या मुख्यमंत्र्यांसोबत उपमुख्यमंत्री म्हणून काम केले. पृथ्वीराज चव्हाण, देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे या मुख्यमंत्र्यांच्या मंत्रिमंडळात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. एकूण सहा वेळा उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊन त्यांनी जवळपास दहा वर्षे हे पद भूषवले, जो एक विक्रम मानला जातो.
३) घड्याळाची ओळख आणि राष्ट्रवादीशी नाते :
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी आजीवन निष्ठा राखणारे अजित पवार ‘घड्याळ’ या चिन्हाशी कायम जोडले गेले. महागड्या घड्याळांची त्यांना आवड होती. दुर्दैवाने, अपघातानंतर त्यांची ओळख घड्याळावरूनच पटवावी लागली, ही बाब अनेकांच्या मनाला चटका लावणारी ठरली.
४) धर्मनिरपेक्ष आणि विकासाभिमुख भूमिका :
अजित पवार यांनी नेहमीच विकासाचे राजकारण केले. जाती-धर्माच्या पलीकडे जाऊन त्यांनी सर्व समाजघटकांना सोबत घेण्याचा प्रयत्न केला. अल्पसंख्याक समाजाच्या प्रश्नांवर ते ठाम भूमिका घेत आणि धर्मनिरपेक्ष प्रतिमा कायम राखत.
५) स्पष्टवक्तेपणा आणि थेट शैली :
स्पष्ट बोलणे हीच त्यांची ओळख होती. मनातले थेट बोलण्याची त्यांची शैली अनेकदा वादग्रस्त ठरली, पण त्याच शैलीमुळे कार्यकर्त्यांमध्ये त्यांच्याविषयी आपुलकी निर्माण झाली. वेगळ्या राजकीय वाटा निवडल्या तरी शरद पवार यांच्याशी असलेले नाते त्यांनी कधीही तोडले नाही.
६) नोकरशाहीवर मजबूत पकड :
प्रशासनावर असलेली त्यांची पकड आणि निर्णयक्षमता यामुळेच ते प्रभावी प्रशासक म्हणून ओळखले जात. राज्याच्या समस्या, आर्थिक गणिते आणि विकासाच्या गरजा यांची त्यांना सखोल जाण होती.
७) पहाटे सुरू होणारे कामकाज :
अजित पवार हे ‘सकाळी पाच वाजता काम सुरू करणारे’ नेते म्हणून प्रसिद्ध होते. थेट लोकांमध्ये जाऊन संवाद साधणे, तक्रारी ऐकून त्यावर तातडीने निर्णय घेणे, ही त्यांची कार्यपद्धत होती. पिंपरी-चिंचवडच्या विकासातही त्यांचे योगदान लक्षणीय राहिले.
८) आरएसएस मुख्यालयापासून अंतर राखले :
महाराष्ट्राच्या राजकारणात भाजपशी जुळवून घेतल्यानंतरही अजित पवार यांनी तत्वे आणि विचारसरणीशी तडजोड केली नाही. त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (आरएसएस) मुख्यालयापासून अंतर राखले. महायुती सरकारमध्ये उपमुख्यमंत्री झाल्यानंतर ते रेशमबागला गेले नाहीत. शाहू, आंबेडकर आणि फुले यांच्या पुरोगामी विचारांवर ते ठाम राहिले.
९) वेगळा रक्तगट :
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार नेहमीच जिंकत असत, त्यांच्या नावाप्रमाणेच त्यांचा रक्तगट वेगळा होता. ते A (पॉझिटिव्ह) रक्तगटाचे होते. असे म्हटले जाते की या रक्तगटाच्या लोकांमध्ये संतुलित व्यक्तिमत्व आणि स्वभाव असतो. शिवाय, या रक्तगटाच्या लोकांमध्ये नेतृत्वगुण देखील असतात. A+ रक्तगटाचे लोक संवेदनशील आणि दयाळू असतात. असं वैज्ञानिक दृष्ट्या सांगितले जाते.






